आत्मनिर्भर होण्यास प्रत्येकाचे सहकार्य हवे : मुख्यमंत्री

0
170

आपले सरकार हे गोव्यातील प्रत्येक नागरिकांचे आहे. सरकारला मूळ गोमंतकीयांपर्यंत पोचायचे आहे. त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच संपूर्ण गोवा आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण होण्यास जनतेची साथ हवी आहे. सध्या साखळी शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. साखळी शहराचा सर्वांगीण विकास साधताना आरोग्य, स्वच्छता ठेवण्यास नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल व्यक्त केले.

साखळी नगरपालिकाक्षेत्रात काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीन लोकोपयोगी विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला पालिकेचे मुख्याधिकारी दीपक वायंगणकर, नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक आंनद काणेकर, दयानंद बोर्येकर, ब्रम्हा देसाई, रश्मी देसाई, शुभदा सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

साखळी रुद्रेश्वर कॉलनी येथे सभामंडपाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. कचरा प्रकल्पात वर्गीकरण यंत्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. साखळी शहर स्वच्छ ठेवणे ही आम्हा सर्वांची जवाबदारी आहे. साखळी नगरपालिका प्रशासन चांगले कचरा व्यवस्थापन सांभाळत असल्याने त्यांनी प्रशंसोद्गार काढले.