राजधानी पणजीसह वाळपई, साखळी, फोंंडा, पेडणे, सांगे व इतर भागांना जोरदार पावसाने काल पुन्हा एकदा झोडपून काढल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत ६० इंच पावसाची नोंद झाली आहे. सध्या सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण १७ टक्के जास्त आहे, अशी माहिती पणजी हवामान विभागाने दिली.
पावसाबरोबरच जोरदार वार्यामुळे झाडांची पडझड सुरू आहे. रेडेघाट, वाळपई येथे मुख्य मार्गावर झाडे मोडून पडल्याने सुमारे दोन तास वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. वाळपईत पाऊस इंचाच्या पाऊण शतकाच्या उंबरठ्यावर आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत सर्वाधिक ७३.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे ७० इंच, फोंडा येथे ६६.०९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
वाळपई परिसरात मागील चोवीस तासात सुमारे ५ इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी, फोंडा, ओल्ड गोवा, पेडणे, सांगे, केपे या भागात जोरदार पाऊस पडला. संततधार पावसामुळे नदी, नाले यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे.
ओल्ड गोवा येथे ६५.९२ इंच, सांगे येथे ६२.५९ इंच, साखळी येथे ५९.९४ इंच, पणजी येथे ५९.१८ इंच, दाबोली येथे ५७.१८ इंच, म्हापसा येथे ५६.५५ इंच, मुरगाव येथे ५५.९५ इंच, काणकोण येथे ५४.५४ इंच, केपे येथे ५४.१७ इंच, मडगाव येथे ५३.६१ इंच पावसाची नोंद झाली आहे.