>> राज्यात मास्क सक्तीची कडक अंमलबजावणी
राज्य कार्यकारी समितीने मास्क वापर सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना केली असून नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो रेशन या सारखे उपक्रम हाती घेण्याची सूचना केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्या १ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी राज्य कार्यकारी समितीला दिली आहे. मास्कचा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याबाबत केलेल्या कारवाईचा दरदिवशी अहवाल सादर करण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीने केली आहे.
अबकरी खात्याने घाऊक मद्य विक्रीच्या दुकानाबरोबरच १९३ मद्य विक्रीची दुकाने आणि बारना सील ठोकले आहे. पेडणे तालुक्यात सर्वांधिक मद्याची दुकाने सील करण्यात आली आहेत. त्यानंतर सासष्टी, सत्तरी आणि बार्देश तालुक्यात मद्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. नगरपालिका क्षेत्रातील ५० टक्के दुकाने आणि पंचायत क्षेत्रातील ६० टक्के दुकाने सुरू करण्यात आली आहेत.
माहिती तंत्रज्ञान खात्याने ६१ आयटी, आयटीईएस कंपन्या सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू असलेल्या ११९ कामांना चालना दिली आहे. वैद्यकीय उपचारासाठी परराज्यात जाण्यासाठी सादर केलेल्या अर्जांची योग्य प्रकारे पडताळणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी, सचिवांना करण्यात आली आहे.