…आणि कॉंग्रेसचे स्वप्न हवेत विरले

0
128

विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी कॉंग्रेसची काल सकाळी पणजीत बैठक झाली, परंतु सकाळच्या सत्रात नेतृत्वाबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे भोजनोत्तर बैठक सुरू ठेवण्याचे ठरले. त्यावेळी नेते निवडीसाठी गुप्त मतदानही घेण्यात आले. लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, रवी नाईक व प्रतापसिंह राणे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा होती. कॉंग्रेसमध्ये सरकारचे नेतृत्व कोणी करायचे यावर दुमत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते.

तत्पूर्वी सुदिन ढवळीकर यांचा बंगला हे राजकीय घडामोडींचे केंद्र होते. दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात होते. अपक्ष आमदार रोहन खंवटे हेही सुदिन यांना भेटले. केंद्रीय मंत्री व भाजपचे गोवा प्रभारी नितीन गडकरी शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर इतर पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात झाली. सर्वप्रथम मगो पक्षाशी संपर्क साधला गेला. सुदिन ढवळीकर व बाबू आजगावकर गडकरींना त्यांच्या हॉटेलात जाऊन भेटले.

विरोधी पक्षनेतेपदी कवळेकर
कॉंग्रेसचे सरकार स्थापन होत असल्यास मुख्यमंत्रिपदासाठी दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक अशी अनेक नावे पुढे होती, परंतु विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याची वेळ ओढवल्यावर मात्र, या सर्व नेत्यांऐवजी बाबू कवळेकर व आलेक्स रेजिनाल्ड यांची नावे पुढे करण्यात आली. शेवटी बाबू कवळेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा निर्णय झाला.