काय होणार?

0
108

गोव्यासह पाच राज्यांचे विधानसभा निवडणूक निकाल आज येणार आहेत. विविध मतदानोत्तर पाहण्यांचे अंदाज खरे मानले, तर पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बाजी मारील असाही अंदाज या पाहण्यांनी वर्तवला आहे. अर्थात, मतदानोत्तर पाहण्यांचे अंदाजही चुकीचे ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे मतदारराजाचा कौल प्रत्यक्षात काय राहील हे पाहणे औत्सुक्याचे असेल. गोव्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी हा कसोटीचा क्षण आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपाने गोव्यात केलेली विकासकामे आणि विविध विषयांत घेतलेले ‘यू टर्न’ यापैकी कशाला मतदारांनी अधिक महत्त्व दिले ते हा निकाल सांगणार आहे. गेल्या वेळी भाजपा मगोच्या साथीने निवडणुकीत उतरला होता. यावेळी सत्तेत सोबत करणार्‍या मगो पक्षाने ऐन निवडणुकीत विभक्त होऊन गोवा सुरक्षा मंचासोबत मोट बांधली. त्यामुळे ही निवडणूक भाजपा विरुद्ध सर्व पक्ष अशीच झाली. बहुतेक मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती झाल्या आहेत. त्यात सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार हिरीरीने उतरवले आहेत. मुळातच इतर राज्यांच्या तुलनेत कमी मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघांमधील या बहुरंगी लढतींचे निकाल अनपेक्षित लागणेही असंभव नाही, कारण विजेत्याची मतांची आघाडी तशी कमीच असेल. भारतीय जनता पक्षाची पक्की मतपेढी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंड हे या निवडणुकीत त्या पक्षासाठी एक आव्हान बनले होते. या बंडाळीचा फटका उमेदवारांना कितपत बसतो याकडेही देशाची नजर आहे. भाजपाचे राज्यात स्वतःचे बळकट असे बूथ पातळीवरील संघटन आहे. त्यामुळे संघ कार्यकर्त्यांची कमी त्यांनी भरून काढली आहे. प्रचारामध्येही भाजपाने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विजय संकल्प मेळाव्यांचा धडाका लावून आघाडी घेतली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांना तयारीसाठी अवधीही कमी मिळाला. त्यातच विरोधी कॉंग्रेसने महाआघाडीचे गुर्‍हाळ चालवून शेवटी एकला चलो रे चा मार्ग स्वीकारल्याने अनेक राजकीय पक्षांची समीकरणे उलटीपालटी झाली. अकल्पित नोटबंदीनेही पक्षांची भंबेरी उडविली. या सगळ्याचा फायदा भाजपाला मिळाला असला तरी एकूण मतदारांची या निवडणुकीवेळची मानसिकता, केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविषयीची त्यांची भावना, विविध प्रश्नांवरची त्याची मते या सगळ्याच्या गोळाबेरजेतून त्याने आपला मताधिकार बजावलेला आहे हे विसरून चालणार नाही. अल्पसंख्यक मतांना साद घालणारा एक नवा राजकीय पर्याय या निवडणुकीत अवतरला तो म्हणजे आम आदमी पक्ष. सोशल मीडियावरून ‘आप’विषयी गदारोळ माजवला गेला, घरोघरी शिस्तबद्ध प्रचार केला गेला, तरी ‘आप’चे बुद्धिवादी नेते तळागाळात उतरण्यात किती यशस्वी झाले तेही हा निकाल सांगणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसची गोव्यात वाताहत झाली. यावेळी स्वबळावर लढलेल्या कॉंग्रेसला आपली परिस्थिती सुधारण्यात यश येते की इतर विरोधी पक्ष त्यात खिंडारे पाडतात हेही पाहावे लागेल. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो ‘एकला चलो रे’ चा जो जुगार या निवडणुकीत खेळले, त्याचा किती फायदा मतदार देणार, गोव्यातील घसरण थांबवण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरणार का हेही प्रश्न आहेत. भाजपाविरोधात लढलेला मगो पक्ष पुन्हा भाजपाशी हातमिळवणी करायला सिद्ध झालेला आहे. भाजपा अपक्षांशीही संधान बांधून आहे. पुन्हा सत्तास्थापनेची पूर्ण सज्जता भाजपाने ठेवलेली दिसते. विरोधी पक्षांना निवडणुकीत एकजुटीने उतरता आले नाही. निकालानंतरही त्याबाबत साशंकताच आहे. काय होणार? हातच्या काकणाला आता आरसा कशाला?