आणखी 3 गुन्हे नोंद; 2 महिलांना अटक

0
5

>> नौदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक; मडगाव व वास्को पोलिसांत गुन्हा नोंद; ठकसेन पूजा नाईकचे कारनामे संपेनात

>> सी-बर्ड नौदल तळावर नोकरीच्या आमिषाने 16 लाखांची फसवणूक

कारवार येथील सी-बर्ड नौदल तळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून 16 लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नागमोडे-नावेली येथील सुनील बोरकर यांनी काल दोन महिलांविरुद्ध मडगाव पोलिसांत दाखल केली. ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी विषया गावडे (53, रा सां जुझे आरियल) आणि सोनिया उर्फ रोशन आचारी (53, रा. आचारीवाडा, सदाशिवगड कारवार) या दोघांना अटक केली.

20 जानेवारी 2020 ते 30 जून 2020 या दरम्यान नौदलात नोकरी देण्याचे आमिष दाखवून सदर दोन महिलांनी सुनील बोरकर यांच्याकडे 16,12,500 रुपयांची रक्कम घेतली होती. ही रक्कम वेगवेगळ्या वेळी घेतली; पण नोकरी दिली नाही. तक्रार दाखल होताच पोलिसांनी दोन्ही संशयित महिलांनी अटक केली.
‘त्या’ 2 महिलांनी 28 लाख उकळले

राजेशनगर-फातोर्डा येथील साईश पी. कोमरपंत यांनी दि. 27 एप्रिल 2023 रोजी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात विषया गावडे आणि सोनिया आचारी यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध 28 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार नोंदविली होती.

दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी विजया गावडे, सोनिया आचारी, राजेश नाईक, पौर्णिमा कोळंबकर, अक्षता गावडे यांनी साईश कोमरपंत यांना नौदलात लेफ्टनंट कमांडर पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून 27,72,956 रुपये एवढी रक्कम घेतली. त्या कित्येकदा प्रत्यक्ष भेटून रोख व ऑनलाईनद्वारे रक्कम घेतली. त्यावेळी त्या प्रकरणात सर्व 5 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यातील दोघा महिलांना काल मडगाव पोलिसांनी अटक केली.

पूजा नाईक हिच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद

पणजी पोलिसांनी नोकरी घोटाळा प्रकरणी संशयित आरोपी पूजा नाईक (रा. जुने गोवे) हिच्या विरोधात काल आणखी एक गुन्हा दाखल केला. कालापूर-तिसवाडी येथील एका महिलेला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुमारे 6 लाख रुपये उकळल्याचा आरोप तिच्यावर आहे. संशयित पूजा नाईक हिने 5 सप्टेंबर 2020 ते 9 सप्टेंबर 2020 या कालावधीत तक्रारदाराकडून सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने 6 लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी पणजी पोलीस तपास करीत आहेत. पूजा नाईक हिच्या विरोधात राज्यातील अनेक पोलीस स्थानकात गुन्हे नोंद झालेले आहेत.

उमा पाटीलकडून चक्क नौदलात नोकरीचे आमिष

1.7 लाखांची फसवणूक; दुसरा गुन्हा नोंद

नौदलात शिपायाची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बायणा-वास्को येथील महिलेची 1.7 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली उमा पाटील (रा. पांडुरंगवाडी, बायणा) हिच्याविरुद्ध वास्को पोलिसांनी आणखी एक गुन्हा काल दाखल केला. दरम्यान, पहिल्या गुन्ह्यात उमा पाटील व तिचा मुलगा शिवम पाटील याला काल प्रथम श्रेणी न्यायालयात उभे केले असता, त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

बायणा-वास्को येथे राहणाऱ्या तक्रारदार श्रीमती केंचव्वा रघुनाथ मदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यमनुर दुर्गाप्पा हरिजन या त्यांच्या नातेवाईकाला नौदलात शिपायाची नोकरी देण्यासाठी उमा पाटील हिने 1,70,000 रुपयांची रक्कम उकळली. मात्र त्याला नोकरी दिली नाही किंवा रक्कमही परत केली नाही. आपण फसलो गेल्याचे समजताच केंचव्वा रघुनाथ मदार यांनी काल वास्को पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार वास्को पोलिसांनी उमा पाटीलविरुद्ध आणखी 1 गुन्हा दाखल केला.

पहिल्या प्रकरणात उमा पाटील व तिचा मुलगा शिवम पाटील याने पोलीस दलात शिपाईची नोकरी देण्याचे आमिष दाखवून 6 लाख उकळले होते.