आणखी ५ मृत्यू; ३५६ नवे बाधित

0
292

राज्यात चोवीस तासांत नवे ३५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतामध्ये १ वर्षाचा बालकाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या ५१९ झाली आहे.

राज्यातील कोविड तपासणी स्वॅब नमुन्यांच्या चाचण्यांची संख्या कमी झाल्याने नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. चोवीस तासांत नवीन १४८३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एक चतुर्थांश नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७६ हजार ४५७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ४३८ झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४१८८ एवढी झाली आहे.

४७९ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आणखी ४७९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४ हजार ७३१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०६ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या २६८ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. पणजीत नवे १४ रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील रुग्णांची संख्या २१५ एवढी झाली आहे. करंजाळे, पणजी शहर, सांतइनेज बांध, टोक, पाटो – रायबंदर, केरांत करंजाळे आदी भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तर गोव्यात पर्वरी येथे सर्वाधिक ३०४ रुग्ण आहेत. चिंबल येथे २६६ रुग्ण, म्हापसा येथे २३० रुग्ण, पणजी आणि साखळी येथे प्रत्येकी २१५ रुग्ण, कांदोळी येथे २०० रुग्ण, शिवोली येथे १२४ रुग्ण, वाळपई येथे ११७ रुग्ण, डिचोली येथे ११४ रुग्ण, पेडणे आणि हळदोणा येथे प्रत्येकी १०२ रुग्ण आणि इतर ठिकाणी रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक २८७ रुग्ण आहेत. फोंडा येथे २६५ रुग्ण, वास्को येथे २३२ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १८२ रुग्ण, कुडचडे येथे १११ रुग्ण, काणकोण येथे १०८ रुग्ण आहेत.

आणखी पाच जणांचा बळी
बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या फोंडा येथील १ वर्षाच्या बालकाला मूत्रपिंडाचा आजार होता, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. मडकई फोंडा येथील ६३ वर्षांचा पुरुष रुग्ण, सत्तरी येथील ५१ वर्षांची महिला रुग्ण, कांदोळी येथील ६५ वर्षांचा पुरुष रुग्ण, चिंबल येथील ७६ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.