- लोपामुद्रा सुशांत कळंगुटकर
देवळाय, खांडोळा, माशेल- गोवा
‘सर्व काही बदलले. पण त्या नव्या घरात आल्यावर अजूनही दादांनी बांधलेल्या घराची आठवण येते. बागेत दादांनी लावलेल्या आंब्याखाली बसल्यावर वाऱ्याबरोबर बोलत असलेल्या आंब्याच्या पानांच्या थोड्या गप्पागोष्टी कानावर पडतात. आंब्याची पानेसुद्धा दादांविषयीच बोलत असावीत का?’ 30 जून 1925 हा दादांचा जन्मदिवस. उद्या त्यांची जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या नातीने जागवलेल्या या काही आठवणी…
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
कधीकधी असं वाटायचं की माझ्या मामाचा गाव कुळे हा जणू काही ग. दि. माडगूळकरांच्या या कवितेमधून उचलून ठेवलेला आहे. क्षितिजाजवळ निवांत पसरलेला सह्याद्री पर्वत, कौलारू घरं, चहूकडे सुरू असलेला पक्ष्यांचा गुंजारव, आंब्याच्या झाडावरून पेरूच्या झाडावर उड्या टाकणारे माकड, त्यांना नेहमी हाकलत असणारे गावकरी, गावातून वाहणारी दूधसागर नदी आणि गावातून हवेत धूर सोडत जाणारी आगगाडी या सगळ्यामधून कुळे गाव साकार होते.
हिवाळ्याच्या सुट्टीत कुळे गावात ख्रिसमसची गडबड असायची. सकाळी हवेत गुलाबी थंडी असायची, त्यामुळे सहजासहजी झोपेतून जाग यायची नाही. मध्ये जाग आली तर ती आगगाडीच्या आवाजामुळेच. पण कूस बदलून मी पुन्हा झोपी जायची. मग मला झोपेतून उठवायचे ते दादाच!
‘उठ बाबी… सकाळ झाली, ऊठ…’ अशा आपल्या मृदू स्वरात ते मला उठवायचे. चहा घेत खुर्चीवर बसायचे. संध्याकाळी मला कुळे गावात फिरायला घेऊन जायचे. रामायण- महाभारतातल्या निरनिराळ्या गोष्टी सांगायचे. काजूच्या बागेत न्यायचे. खाली पडलेल्या काजू आम्ही घरी आणून आजीला द्यायचो. मग आजी परसात काजूच्या बिया भाजत असे. तोपर्यंत आम्ही बोंडे खाऊन मोकळे व्हायचो.
दादांना दिवसातून एक-दोन तरी पत्रे यायची. पण मी दादांची नात असूनसुद्धा त्यांच्याशी पत्राद्वारे फार जास्त कधी बोललेच नाही. आता त्याची खूप खंत वाटते. आठ वर्षांची असताना मी दादांना पहिले (आणि कदाचित शेवटचे) पत्र लिहिले होते. दादांनी टपोऱ्या अक्षरात लिहिलेले पत्राचे उत्तर मात्र अजूनही माझ्यापाशी आहे. त्यात दादा लिहितात- ‘तू उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे कुळे गावात यावे म्हणजे तुला निसर्गाचे दर्शन होईल. फिरायला गेल्यावर चालण्याचा व्यायाम होईल. वाटेत मी तुला गोष्टी सांगेन. वाचनालयात नेऊन तुला हवी ती पुस्तके देईन.’
आणि दादांनी आपले हे वचन प्रत्येक सुट्टीत पाळले. शाळेला सुट्टी पडली रे पडली की आई माझे गाठोडे कुळ्याला रवाना करायची. आजीसोबत आंबे खाणे, दादांबरोबर वाचनालयात जाणे अशा गडबडीत सुट्टी कधी संपायची ते कळायचे नाही.
‘द्युतचक्र’ आणि ‘कुरुक्षेत्र’ अशी महाभारतावरील पुस्तके दादांनी लिहिली असली तरी दादांना रामायण जास्त आवडायचे. अजूनही दादांच्या पुस्तकसंग्रहात अनेक रामायणे व त्यावरील समीक्षाग्रंथ आहेत. गीत रामायणातले ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडकेंनी गायलेले ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गाणे त्यांना अतिशय प्रिय होते. कदाचित ते गाणे ऐकल्यावर त्यांना स्वतःच्या जीवनप्रवाहाची आठवण येत असेल. ग. दि. माडगूळकर लिहितात-
दैवजात दुःखे भरता
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा
दादांचे पूर्वायुष्य काहीसे या गाण्याप्रमाणेच गेले. दादांचे वडील दादा चार वर्षांचे असतानाच वारले. त्यामुळे त्यांना त्यांच्या चुलत्यानेच वाढवले. आधी त्यांच्या काकांचा व्यवसाय चांगला चालत होता. दादांना डॉक्टर किंवा वकील बनविण्याचे त्यांच्या मनात होते. पण नियतीच्या मनात काहीतरी दुसरेच होते. दादांच्या काकांची प्रकृती खालावत चालली. त्यांचा व्यवसायही बंद पडला. त्यामुळे दादांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच थांबले. पुढील त्यांचे शिक्षण झाले ते वेगवेगळ्या प्रतिभावंत लेखकांच्या ग्रंथांतूनच.
दादांचं वाचन दांडगं आणि चौफेर होतं. मग ती पुस्तके असो, वर्तमानपत्रे असो किंवा दिवाळी विशेषांक असो. दादा बघावे तेव्हा पुस्तकात मग्न असायचे. लिहिताना फार जास्त आढळायचे नाहीत. म्हणून मी जेव्हा एखादा लेखक डोळ्यांसमोर आणते तेव्हा माझ्या मनात तो लिहिण्यापेक्षा वाचनात बुडून गेलेला असतो. दादांपाशी अनेक पुस्तके होती. अजूनही आहेत. या सर्व पुस्तकांना कव्हर घालून त्यांना दादा लहान बाळांसारखे कपाटात ठेवायचे. त्यामध्ये ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भगवद्गीता’ यांसारखे ग्रंथ आहेतच; पण पु. ल. देशपांडे आणि चिं. वि. जोशी यांचे हलकेफुलके आणि हसवणारे साहित्यसुद्धा आहे. बंकिमचंद्र चटर्जी, शरदचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर आणि सुनील गंगोपाध्याय यांचे अनुवादित साहित्य आहे. ‘चू षूेीशप र्ीीींर्लीश्रशपलश ळप घरीहाळी’ या जगमोहनांच्या अनुवादित पुस्तकाबरोबरच जिम कॉर्बेटचे ‘ढहश ाशप शरींळपस श्रशेरीिव ेष र्ठीवीरीिरूरस’सुद्धा आहे. वि. स. खांडेकर आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या खांद्याला खांदा लावून इरावती कर्वे आणि दुर्गा भागवतही बसल्या आहेत आणि मजेशीर गोष्ट म्हणजे, त्यात अनेक पाश्चात्त्य लेखकांची अनुवादित पुस्तके जशी की शेक्सपिअर, टॉलस्टॉय, होमर यांचीसुद्धा पुस्तके आहेत. दादांनी स्वतः मोजकीच पुस्तके लिहिली. पण जी लिहिली ती मोत्यांसारखी.
मोत्यांसारखी पुस्तके मोत्यांसारख्याच अक्षरात लिहून दादा आपले हस्तलिखित प्रकाशकांना पाठवायचे. दादांचे अक्षर फार सुंदर. अगदी छापल्यासारखे वाटायचे. असे म्हटले जाते की सुंदर अक्षर असलेली व्यक्ती एक चांगली चित्रकारही असली पाहिजे. खरे खोटे माहीत नाही, पण दादांचे अक्षर त्यांच्या अंगातल्या चित्रकाराची साक्ष देत असे. दादा कोल्हापूरला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते, पण काही कारणामुळे त्यांचा उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यांनी तरीसुद्धा चित्रकलेचा ध्यास सोडला नाही. वेगवेगळी पुस्तके आणून चित्रकलेचा अभ्यास केला. त्यांची सगळी चित्रे कुळेच्या दिवाणखान्यात आणि काही आमच्या घरात लावलेली आहेत. जणू ती चित्रे एका कोमेजलेल्या परंतु तरीही सुगंध पसरवणाऱ्या स्वप्नाच्या फुलाबद्दल गोष्टी सांगतात.
दादांनी आपले लेखन मात्र कायम ठेवले. ज्या पुस्तकांनी त्यांना एवढे सारे दिले त्या पुस्तकजगतालाच पुस्तकरूपानेच काहीतरी परत द्यावे असा त्यांचा विचार असावा. आई सांगायची की तिच्या लहानपणी दादा दिवसा अकौंटंट म्हणून साकोर्ड्याला काम करायचे आणि रात्री लिहायचे. ते नेहमी रोरितो पेन वापरायचे. त्यांचे ते पेन अजूनही त्यांच्या कपाटात आहे. आई मला लहानपणी दादांकडेच अक्षर सुधारायला पाठवायची. दोन-तीन दिवस ते सुधारायचेही, पण मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. त्यामुळे माझे अक्षर कधी दादांसारखे होऊ शकले नाहीच, पण दादांमुळेच मला वाचन आणि चित्रकलेची आवड लागली.
दादांना ‘दादा’ हे नाव कसे ठेवले गेले हे जसे कोणाला आठवत नाही तसेच आजीला आम्हा नातवंडांपैकी ‘फाई’ म्हणून हाक मारायला कोणी सुरुवात केली हेसुद्धा कोणाला माहीत नाही. पण बहुतेक हे काम माझ्या मोठ्या मावसभावाचेच असावे. दादा आणि फाई संध्याकाळी घराच्या बाहेर व्हरांड्यात बसायची. फाईने केलेला चहा पीत दोघेही आपल्या मुलाबाळांबद्दल गप्पा मारायचे. जुन्या आठवणीत रंगून जायचे. मी कधीकधी त्यांच्यासोबत बसायची. माझी नवीन कविता दादांना वाचून दाखवायची. दादा शाबासकी द्यायचे. मग आम्ही तिघेही ‘रवीसंगे दिसती न तारे’ हे गाणे म्हणायचो. फाई इयत्ता मराठी चौथीपर्यंत शिकलेली होती. तिला एक-दोन गाणी यायची. पूर्वी दादा कधीकधी फाईला सोपी पुस्तके वाचनालयातून आणून द्यायचे. फाई ती वाचायची. पण जशी वर्षे लोटली तसे फाईचे वाचन कमी झाले. केव्हा केव्हा माझ्या मनात यायचे की, सुधा मूर्तीने आपल्या आजीला जसे वाचायला शिकवले तसे आपणही आपल्या आजीला वाचायला शिकवावे. मग मी एक वर्तमानपत्र घेऊन फाईजवळ बसायची. तिला मथळे वाचायला सांगितले की फाई एक एक अक्षर लावत हळूहळू मथळे वाचायची. दादांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकायचे.
दादा कधीकधी फाईबरोबर माशेलात यायचे. एक-दोन महिने आमच्या घरी राहायचे. नार्वेकर बुकस्टॉलमध्ये नेऊन मला पुस्तके घेऊन द्यायचे. माशेलमध्ये असतानासुद्धा मला फिरायला न्यायचे. माझ्यासाठी बाजारात जाऊन सुरंगीचा गजरा मुद्दामहून घेऊन यायचे. त्या गजऱ्याच्या सुवासाने आमचे घर खूश होऊन जायचे. दादा गीतरामायणातील गीते स्वतःच गुणगुणत. मग त्या तालावर घरही डोलू लागायचे.
मला गोव्यातील मराठी साहित्याविषयी फारसे माहीत नसले तरी आपले दादा हे चांगले लेखक आहेत याची जाणीव होती. लहान असताना मी दादांना त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ निवडण्यासाठी मदत करायचे. दादा आपल्या लहानपणाच्या गोष्टी सांगायचे. आपले आयुष्य एखाद्या पिंपळपानाप्रमाणेच वाहत गेले अशी खंत व्यक्त करायचे. तेव्हा मला दादांनी एका खेडेगावात राहून, साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या व्यवसायामध्ये काम करूनसुद्धा मराठीची साहित्यसेवा कशी केली याचे आश्चर्य वाटायचे. जेव्हा दादा सत्ताविसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा मी तिथे उपस्थित होते. त्यावेळी मी आठ वर्षांची होते.
कुळेला आमच्या घराच्या पुढे आणि मागे परसात अनेक झाडे लावलेली आहेत. आंबा, फणस, माड, पेरू, चाफा, चमेली, चिकू आणि बरंच काही… मला अजूनही आठवते की मी लहान असताना मला घेऊन दादांनी अंगणात एक लहान माड लावलेला होता. तो माड आता मोठा झाला आहे. त्या माडाला मी सुट्टीत आले की पाणी घालायचे. बाकी वर्षभर दादाच त्या माडाला पाणी द्यायचे. कधीकधी मला सांगायचे, माहीत आहे का तुला? ही झाडे माझ्याशी बोलतात. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘जो झाडे लावतो आणि जाणतो की तो कधीच त्यांच्या सावलीत बसणार नाही, त्याने आयुष्याचा अर्थ समजण्याला सुरुवात केलेली आहे. दादा हयात नसले तरी त्यांनी लावलेली झाडे अजूनही आम्हाला फुले-फळे देतात. आमच्याशी बोलतात. दादांना कदाचित आयुष्याचा अर्थ समजला असावा.
दादांना मृत्यूची केव्हा भीती वाटली नसावी. त्यांचा जीवन-मरणाबद्दलचा दृष्टिकोन काय होता हे त्यांच्या एका पत्रात आढळते. लेखिका शैला राव यांना लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात- ‘आपला इच्छामरण हा लेख वाचला. मन उदास झाले. विषय रात्री झोप लागेतोवर मनात कानाजवळ भुंग्याने गुंगुऽऽ करावे तसा फिरत राहिला. वाटले असे मरण येण्यापेक्षा आपण आधीच जावे. सकाळी उठल्यावर मागच्या परसात गेलो. मनात तुमच्या लेखातून आलेली खिन्नता होतीच. काय आश्चर्य! परसातला चमेली वृक्ष फुलला होता. (वर्षातून एक-दोनदाच हा चमत्कार होतो.) सबंध परसात फुलांचा दाट सडा पडला होता. पांढराशुभ्र मंद सुवास पसरला होता. पाहतच राहिलो. माणसाच्या जगण्यातला हेतू समजला. अशा कविमनाच्या माझ्या दादांना मरण आले तेसुद्धा अगदी अकस्मातच. जसा कित्येक वर्षांपासून उंच ताठ उभा असलेला वटवृक्ष एका रात्री वीज पडून प्राणहीन होतो, तशीच दादांची प्राणज्योत एक आठवडाभर ‘कोरोना’शी लढताना हॉस्पिटलमध्ये एका पहाटे अचानक मालवली.
दादा गेल्यावर दोन वर्षांनी मामांनी कुळेचे कौलारू घर पुन्हा बांधायला काढले. त्या पन्नासएक वर्षांच्या भिंती पाडण्यात आल्या. सिमेंटची जमीन फोडून तिच्या जागी मार्बल घालण्यात आले. ऐसपैस व्हरांडा मोडून त्याजागी एक छोटासा व्हरांडा तयार केला गेला. चुलीवर तापवलेल्या पाण्याच्या हंड्याच्या जागी गिझर आला. सर्व काही बदलले. पण त्या नव्या घरात आल्यावर अजूनही दादांनी बांधलेल्या घराची आठवण येते. बागेत दादांनी लावलेल्या आंब्याखाली बसल्यावर वाऱ्याबरोबर बोलत असलेल्या आंब्याच्या पानांच्या थोड्या गप्पागोष्टी कानावर पडतात. आंब्याची पानेसुद्धा दादांविषयीच बोलत असावीत का?
मी लहान असताना आणि कुळे गावात आलेले असताना दादा चावी घेऊन आपले पुस्तकांचे कपाट उघडायचे. पाने सुटलेले एक पुस्तक काढायचे. पुस्तक बाईंडिंगला पाठवायचे असायचे. एक धागा आणि कात्री घेऊन दादा बसायचे. मला बोलवायचे. म्हणायचे, धागा पुस्तकाभोवती बांधताना तुझे बोट तू धाग्यावर ठेव, नाहीतर गाठ सैल होणार.
दादा वारल्यास आता तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. मी नेहमी दादांच्या बाजूला बसून त्यांच्याशी बडबडायची. वाचलेल्या पुस्तकांवर आमची चर्चा चालूच असायची. त्यांचे नेमके शब्द आठवत नाहीत. माझीच चूक. मी त्यांच्याबरोबर झालेल्या गप्पा कधी लिहूनच ठेवल्या नाहीत. पण त्यांचा तो मृदू आवाज आणि त्यांच्यासोबतच्या अशा छोट्या-छोट्या प्रसंगांची आठवण येते. आयुष्याची गाठसुद्धा अशीच असते. त्यावर अर्थपूर्णतेचे बोट ठेवले नाही तर आयुष्य भरकटू शकते. दादा एक अर्थपूर्ण आयुष्य जगले.