आजपासून शाळांची घंटा घणघणणार

0
23

>> राज्यात पहिली ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार

>> काही विद्यालयांत पालकांकडून हमीपत्राची सक्ती

राज्यातील सरकारी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, खास मुलांच्या विद्यालयाचे पहिली ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग आज सोमवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे विद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग बंद होते. मुलांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देऊन परीक्षा घेतली जात होती. राज्यातील विद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर ऑनलाइन पद्धतीचे वर्ग बंद केले जाणार आहेत.

शाळा व्यवस्थापनाने मुलांना गणवेशाची सक्ती करू नये, मुलांना शाळेच्या वेळात गरज भासल्यास सवलत द्यावी, अशा सूचना शिक्षण खात्याने केल्या आहेत. शिक्षण खात्याच्या या सूचनांबाबत पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

शैक्षणिक वर्ष समाप्तीला केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने शालेय गणवेशामध्ये सवलत देण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. विद्यालयाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार असल्याने पालकांची स्कूल बॅग, बूट आदी शालेय वस्तूच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येत आहे.

राज्य सरकारने विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिलेला असला तरी शाळा व्यवस्थापनाकडून उपलब्ध साधनसुविधांना अनुसरून विद्यालयाचे वर्ग घेतले जाणार आहेत. विद्यालयातील वर्ग खोल्या, आसपासच्या परिसराचे सॅनिटायझाशेन करण्यात आले आहे. मुलांची थर्मल गनद्वारे तपासणी केली जाणार आहे. मुलांना सॅनिटायझर्स उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुलांचा वर्गात नियमानुसार समावेश केला जाणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाबाबत
७७ टक्के विद्यार्थी असमाधानी

ऑनलाइन शिक्षणातून मिळणार्‍या ज्ञानाबाबत ७७ टक्के विद्यार्थी समाधानी नाही, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. शिवोली येथील कीर्ती विद्यालयाच्या पुढाकाराने राज्यातील सुमारे १०,०२७ विद्यार्थ्यांशी सर्वेक्षणासाठी संपर्क साधण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेली २ वर्षे ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेतले जात आहेत. आता प्रत्यक्ष वर्ग घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विद्यार्थ्यांना आरोग्य समस्या
ऑनलाइन वर्गात ९० टक्के विद्यार्थ्यांनी नित्यनेमाने सहभाग घेतला. ७४ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था परिणामकारक वाटली. १७ टक्के विद्यार्थ्यांना तात्पुरती शिक्षण व्यवस्थेचा प्रभाव दिसला नाही. ५६ टक्के विद्यार्थ्यांना फेस टू फेस शिक्षण पाहिजे. या नवीन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य समस्या भेडसावत आहे. २१ विद्यार्थ्यांना झोपेची, १७ टक्के विद्यार्थ्यांना डोकेदुखी आणि १७ टक्के विद्यार्थ्यांना मानदुखीची समस्या भेडसावत आहे, असे आढळून आले आहे.

शिक्षण संचालकांनी परिपत्रकाद्वारे शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. या परिपत्रकामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र वातावरण दिसून आले. काही पालकांना आनंद झाला तर काही पालकांनी मुलांच्या आरोग्याच्याबाबतीत काळजी व्यक्त केली आहे.

पालकांना हमीपत्राची सक्ती
कोविडच्या पार्श्‍वभूमीवर विद्यालयाचे वर्ग सुरू होत असताना एखादे मुल शाळेत येऊन बाधित झाल्यास त्याची जबाबदारी विद्यालय व्यवस्थापनाकडून स्वीकारली जाणार नाही. त्यासाठी राज्यातील काही विद्यालयाच्या व्यवस्थापनांनी पालकांना हमीपत्र देण्याची सूचना केली आहे. विद्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला विद्यालय व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाणार नाही. मुलांकडून कोविड एसओपीचे पालन केले जाणार आहे. पालकाकडून विद्यालयाचे वर्ग सुरळीतपणे घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार आहे, असे हमीपत्रातून लिहून घेतले जात आहे.

सासष्टीत शाळा व्यवस्थापनांची तयारी

सासष्टीतील सर्व शैक्षणिक संस्थांनी शनिवारी व रविवारी शाळेतील वर्गांची साफसफाई केली. औषधी फवारे मारले. तसेच आज शाळेत प्रवेश देताना आनंदाने छोट्या मुलांचे स्वागत करण्याचेही ठरले. पहिली, दुसरी तसेच पाचवीत प्रवेश घेतलेल्या मुलांनी शाळेच्या आवारात पाय ठेवला नव्हता. त्यांचा शिक्षकांशी परिचय नाही. तसेच शिक्षकांनीही मुलांना पाहिले नाही. दोन वर्षेे ऑनलाइन पद्धतीने शिकवण्या दिल्या. पाठ घेतले, पण खेळ तसेच इतर सर्व उपक्रम मात्र घेता आले नाहीत. हे सर्व आता प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्यामुळे सुरू होणार आहे.

काही पालकांनी भीतीच्या छायेपोटी काही शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आहे. किती टक्के विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जाणार आहे याचा अंदाज शाळा सुरू झाल्यानंतर तीन दिवसांत समजणार आहे. कित्येक पालकांनी फोन करून कोरोनाची भीती व्यक्त केली. विद्यार्थ्यांची हजेरी कशी असेल हे दोन दिवसांत समजेल. पण ऑनलाइन वर्गांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हवा होता असा झाला नाही. प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सातवी पर्यतच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असे बर्‍याच पालकांचे मत आहे. आता त्या विद्यार्थ्यांना त्या स्तरावर पोहचविण्यासाठी शिक्षक व व्यवस्थापनाला पालकांच्या सहयोगाने प्रयत्न करावे लागणार आहेत.

दोन सत्रांत वर्ग
मडगाव येथील काही शाळांत जागेअभावी वर्ग दोन सत्रांत भरतात. सकाळी आठवी ते दहावी, दुपारी पाचवी ते सातवी, तसेच प्राथमिक, पूर्णप्राथमिक वर्गाची स्थिती असल्याने सामाजिक अंतर ठेवण्यावर मर्यादा येणार आहे. मात्र मास्क वापरण्यास सक्ती केल्याचे सांगण्यात आले. पालक शिक्षक संघाची बैठक घेऊन सामाजिक अंतरासाठी ५० टक्के विद्यार्थ्यांचे सकाळी तर ५० टक्के विद्यार्थ्यांचे संध्याकाळी वर्ग घ्यावेत यावर चर्चा करण्याचेही व्यवस्थापनने ठरविले आहे. वर्ग सुरू करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर शिक्षण खात्याने सोपविली आहे.