येथील हवामान विभागाने राज्यात ९ ते १२ जून २०२२ दरम्यान पावसाच्या प्रमाणात वाढ, ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता काल वर्तविली आहे. तसेच, ११ व १२ जूनला राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात चोवीस तासांत पेडणे, पणजी, काणकोण या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्याच बरोबर म्हापसा, जुने गोवे, साखळी, वाळपई, दाबोळी, मुरगाव या भागात पावसाची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमानात येत्या दोन दिवसांत बदल होण्याची शक्यता नाही; मात्र त्यानंतरच्या पुढील तीन दिवसात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबले आहे. मोसमी पाऊस गोव्याच्या सीमेवर कारवारच्या आसपास पोषक हवामानाच्या अभावामुळे अडकून पडला आहे. केरळमध्ये सामान्य तारखेच्या तीन दिवस अगोदर २९ मे रोजी मोसमी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मोसमी पावसाची केरळमधून गोव्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. गोव्यात सामान्य तारखेनुसार ५ जूनला मोसमी पावसाचे आगमन होते. तथापि, अजूनपर्यंत मोसमी पावसाचे आगमन झालेले नाही. मागील २२ वर्षांत ९ वेळा कारवार येथून गोव्यात मोसमी पावसाचे आगमन होण्यास विलंब झाला आहे.