कोरोना रुग्णांमध्ये वाढ निर्बंधांबाबत अनुत्सुकता

0
13

>> मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलाचा विचार नाही : आरोग्यमंत्री

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असला, तरी राज्यात कोरोना मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काल जून महिन्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सक्रिय रुग्णसंख्या ३७६ वर पोहोचली आहे; मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून काही निर्बंध लागू करण्याबाबत सरकार आग्रही नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला असून, कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे; मात्र असे असले तरी कोविड मार्गदर्शक सूचनांच्या नावाखाली लोकांवर निर्बंध लादण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून, त्याची गरज देखील नसल्याचे विश्‍वजीत राणे यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कोविड तज्ज्ञ समितीची बैठक गुरुवारी होणार होती; मात्र ती गुरुवारऐवजी काल बुधवारीच घेतल्याचे राणे यांनी सांगितले. राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत थोडीशी वाढ होऊ लागली असली तरी घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क परिधान करावे आणि कोविड नियमांचे पालन करावे, अशी सूचना राणे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व साथरोगांचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर हे उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांनी विनाविलंब बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन विश्‍वजीत राणे यांनी केले. आरोग्य खाते ज्येष्ठ नागरिकांना ते वास्तव्य करणार्‍या एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत देखील बूस्टर डोस द्यायला तयार आहे; मात्र अशावेळी तेथील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी एकत्र आणण्याची जबाबदारी कुणी तरी घ्यावी लागेल. ज्येष्ठ नागरिकांनी आणि ज्या व्यक्तींना अन्य स्वरूपाचे गंभीर आजार आहेत, त्यांनी विनाविलंब बूस्टर डोस घ्यावा, अशी सूचना देखील राणेंनी केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत असून, रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम
राज्यात गेल्या चोवीस तासात नवीन ७७ कोरोनाबाधित आढळून आले असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ३७६ एवढी झाली आहे. राज्यातील बाधित रुग्णांचे प्रमाण ८.०२ टक्के एवढे आहे. जून महिन्यापासून नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू आहे. या महिन्यात आत्तापर्यंत नवे ३८५ बाधित आढळून आले आहेत. राज्यात मागील २४ तासांत नवीन ९६० जणांची कोविड चाचणी करण्यात आली, त्यात ७७ जण बाधित सापडले. विशेष म्हणजे चोवीस तासात एका रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागले आहेत. चोवीस तासांत आणखी २९ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२९ टक्के एवढे आहे. दरम्यान, राज्यात आणखी कोरोना बळींची नोंद नसून, बळींची एकूण संख्या ३८३२ एवढी आहे.