आजपासून तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस

0
114

पणजी हवामान खात्याने पुढील तीन दिवस म्हणजेच आज सोमवार दि. १२, उद्या मंगळवार दि. १३ व बुधवार दि. १४ जुलै रोजी राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या तीन दिवसांत किनारपट्टीवरून ताशी ४५ ते ५५ व प्रसंगी ६५ कि.मी. एवढ्या वेगाने वारे वाहणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले आहे. आज दि. १२ ते पुढील दोन दिवस म्हणजेच १३ व १४ पर्यंत राज्यातील काही भागात मुुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून राज्याला केशरी अलर्टचा इशारा दिलेला आहे.

मागील काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा राज्यात हजेरी लावलेली असून गेल्या आठवड्यात राज्यात दमदार पाऊस कोसळल्याने शेतकरी वर्गही आनंदात आहे.

एका बाजूने कोरोनाच्या लाटेमुळे राज्यात असलेली संचारबंदी व दुसर्‍या बाजूने कोसळणारा पाऊस यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असून राजधानी पणजीसह, मडगाव, फोंडा, म्हापसा, वास्को आदी शहरातीलही रस्तेही सध्या निर्जन बनलेले असून परिणामी शहरांनाही भकास रुप प्राप्त झालेले आहे.