- गिरीश कुबेर (संपादक, लोकसत्ता)
( राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त काल पणजीत दैनिक लोकसत्ताचे संपादक श्री. गिरीश कुबेर यांचे प्रसार माध्यमांपुढील आव्हाने’ या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाचा हा गोषवारा –
शब्दांकन ः
परेश प्रभू )
आपण बदलायला हवे. नाही तर आपण समाजासाठी आदरणीय राहणार नाही! त्यासाठी आपण स्वतः शिकावे लागेल, लिहिताना गांभीर्य सांभाळावे लागेल. अन्यथा इतर व्यवसायांबद्दल लोक आज बोलतात तसे उद्या आपल्याबद्दल बोलू लागतील…
आपण पत्रकारितेमध्ये प्रवेश करताना जे काही शिकलो, ते आज कालबाह्य झाले आहे. केवळ बातम्या देणे ही प्रसारमाध्यमांची मुख्य जबाबदारी नव्हे. निव्वळ बातमी देण्यासाठी आज फेसबुक, ट्वीटरसारखी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. मग असे असताना केवळ बातम्यांसाठी लोकांनी वृत्तपत्रासाठी का थांबावे? आपल्या व्यवसायामध्ये गेल्या काही वर्षांत आमूलाग्र स्थित्यंतरे झाली आहेत, परंतु माझ्या पिढीत ज्या प्रकारची पत्रकारिता केली जात असे, त्याच प्रकारची पत्रकारिता आजच्या बदलत्या परिस्थितीतही चालवली जात आहे. आज वाचकांना बातमी ही तात्काळ हवी आहे आणि ती त्यांना जगभरात तात्काळ उपलब्ध होते. अगदी त्यांच्या मोबाईलवर त्यांना ती मिळते. त्यामुळे पत्रकारितेमधील लोकांनी समजून घ्यायला हवे की, निव्वळ बातमी देणे ही यापुढे आपली प्राथमिक जबाबदारी राहणार नाही.
बातमी आणि मत
आपल्याला पत्रकारितेमध्ये शिकवले जाते की, न्यूज आणि व्ह्यूज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची गल्लत होता कामा नये. परंतु तो निकष आज कालबाह्य झाला आहे. ‘व्ह्यूज ऍड व्हॅल्यू टू द न्यूज.’ बातमीत येणारी तुमची मते तुमच्या बातमीचे मूल्यवर्धन करीत असतात. नुसत्या बातम्या फेसबुक आणि ट्वीटरवर मिळतील, परंतु अशा मूल्यवर्धित बातम्यांसाठी लोक वृत्तपत्रांकडे वळतील. चांगला आशय हा नेहमीच महत्त्वाचा असतो. एखाद्या वर्तमानपत्राचा खप किती आहे किंवा त्याची पाने किती आहेत, त्यावर त्याची प्रतिष्ठा अवलंबून नसते. त्या वर्तमानपत्राचा आशय वाचकांच्या मनात ठसला पाहिजे. त्यावर त्याची प्रतिष्ठा ठरत असते.
पत्रकारितेमध्ये आपल्याला ‘फाईव्ह डब्ल्यू अँड वन एच’ (व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हीच, व्हाय अँड हाऊ) हा मंत्र दिला जायचा. आज त्यामध्ये आणखी डब्ल्यूची भर पडलेली आहे ती म्हणजे ‘व्हॉट नेक्स्ट?’ पुढे काय? बातम्या आज ‘ऑटो पायलट’ मोडमध्ये मिळत असतात. वर्तमानपत्राचा आशय एवढा भक्कम हवा की त्यावरून त्या वर्तमानपत्राबद्दल वाचकाच्या मनात प्रेम निर्माण व्हावे.
ही नकारात्मकता नव्हे
मुख्यमंत्री या कार्यक्रमात नकारात्मक पत्रकारिता करू नका असे म्हणाले. पत्रकारांवर युगानुयुगे हा नकारात्मकतेचा आरोप होत आला आहे. पण सगळे काही छान आहे, गुलाबी आहे, महान आहे हे सांगायला अवघे जग आहे. पण जे वाईट आहे, ते सांगायला आम्ही पत्रकार आहोत. तिला नकारात्मकता म्हणता येत नाही. कोळशासारखा विषय जेव्हा पत्रकार लावून धरतात, तेव्हा तो समाजाच्या हितासाठी हाती घेतलेला विषय असतो. ती नकारात्मकता नव्हे. सकारात्मकता पेरायला सरकारचे माहिती खाते आहेच की! सकारात्मकता पसरवायला, भारत महान राष्ट्र आहे हे सांगायला केंद्र सरकारचे अकरा हजार कोटींचे बजेट आहे! आम्हा पत्रकारांचे काम त्रुटी शोधणे, त्यावर टीका करणे हे आहे. कोणी याला नकारात्मकता म्हणेल, परंतु व्यवस्थेला प्रश्न विचारणे हेच आपले काम आहे. ती आपली प्राथमिक जबाबदारी आहे. असे असताना जर कोणी तिला नकारात्मकता म्हणत असेल तर ती आपण आपल्या कामाबाबतची प्रशस्ती समजले पाहिजे.
हेन्री फोर्डने आपल्या सेकंड इन कमांडला सांगितले होते की, जर एकाच मताचे दोघे असतील, तर त्यातला एक जातो! सरकार आणि माध्यमे जर एकाच बाजूला राहणार असतील, तर माध्यमे आपले अस्तित्व गमावून बसतील. पत्रकारितेच्या ज्या अनेक व्याख्या आपल्याला शिकवल्या गेल्या, त्यातीलल ‘व्हॉटेवर बिइंग सप्रेस्ड इज न्यूज. रेस्ट ऑल इज ऍन ऍडव्हर्टायझमेंट’ (जे दाबले जाते ती बातमी असते. बाकी सगळी जाहिरातबाजी) ही व्याख्या मला भावते. ‘ऍनिमल फार्म’चा लेखक जॉर्ज ऑर्वेल याची ही व्याख्या आहे की, जे छापले जाऊ नये असे वाटते तीच खरी बातमी असते. ते छापणे म्हणजेच पत्रकारिता असते. व्यवस्थेला प्रश्न विचारणे ही म्हणूनच आपली जबाबदारी आहे. मग कोणी तिला सकारात्मकता म्हणो वा नकारात्मकता. आज व्यवस्थेला प्रश्न विचारले जात नाहीत, पत्रकारिता हा व्यवस्थेचा भाग बनू लागली आहे हा मला प्रसारमाध्यमांपुढील पहिला धोका वाटतो.
विचारधारेपासून मुक्त व्हा
प्रसारमाध्यमांपुढील दुसरा धोका आहे तो पत्रकाराच्या विचारधारेचा. पत्रकाराने पत्रकारितेत आल्यावर आपली विचारधारा त्यागली पाहिजे असे माझे मत आहे. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा म्हणजे ८५, ८६ साली पत्रकारितेत ‘संघी’ (रा. स्व. संघाचे), ‘डावे’ (साम्यवादी), ‘सेवादल’ (समाजवादी) असे पत्रकारांवर शिक्के असायचे. तेव्हाचे ठीक होते, परंतु आज अशी विचारधारा असून चालणार नाही. ‘आयडिऑलॉजी ब्लाईंडस् जर्नालिझम’ (तुमची विचारधारा तुमच्या पत्रकारितेला आंधळी बनवते) आपल्या विचारधारेची माणसे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा आपण त्यांचे समर्थन करू लागतो व जेव्हा आपल्या विरोधी विचारांची माणसे सत्तारूढ होतात तेव्हा त्यावर टीका करू लागतो. आपण पत्रकारांनी पूर्ण व्यावसायिक (प्रोफेशनल) असायला हवे. पत्रकारितेने विचारधारेच्या वर आले पाहिजे. विचारधारेची चिंता आपण करू नये. कोण सत्तेत आहे हे आपल्याला लागू नये. पण काही पत्रकार आपल्या व्यवसायापेक्षा आपल्या विचारधारेशी जास्त बांधील असतात. पण या मानसिकतेने आपण फार काळ वाटचाल करू शकणार नाही. ‘हा आपला’, ‘हा त्यांचा’ हे पत्रकारितेत असू शकत नाही. रामनाथ गोयंकांचा इंदिरा गांधींशी संघर्ष झडला, तेव्हा ‘एक्स्प्रेस’च्या एका पत्रकाराची एका राजकारण्याने स्तुती केल्याचे कळले, तेव्हा गोयंका म्हणाले की तसे असेल तर ही त्याला घरी पाठवण्याची वेळ आहे. राजकारणी जर असे ठरवत असतील की, हा आपला वार्ताहर, तो आपला नव्हे, तर तो पत्रकारितेवरील मोठा कलंक आहे. पत्रकार हा निष्पक्ष असू शकत नाही. केवळ मृतदेह निष्पक्ष असू शकतो. पत्रकारिता करणार्यांना आपण काय करायला हवे हे माहीत हवे.
निष्ठेचा व बांधिलकीचा अभाव
प्रसारमाध्यमांपुढील तिसरे महत्त्वाचे आव्हान मला वाटते ते म्हणजे या क्षेत्रावरील निष्ठेचा अभाव. आपली स्वतःची मूल्यव्यवस्थाच धोक्यात आली आहे. आपली मूल्ये आपण हरवत चाललो आहोत. त्याला व्यवस्था जबाबदार नाही. आपण जबाबदार आहोत. आपण सर्वांना माहिती हक्क अधिकाराखाली आणण्याचा आग्रह धरत असतो, पण माध्यमांचे पत्रकार माहिती हक्क कायद्याखाली का नसावेत? त्यांची या व्यवसायात येतानाची संपत्ती आणि काही काळ या क्षेत्रात घालवल्यानंतरची संपत्ती याची मोजदाद का करू नये? त्यांचे जीवन कसे बदलले हे का पाहू नये? त्याबाबत त्यांना प्रश्न का विचारू नये?
आपलेच काही सहकारी हे राज्यसभेवर जाण्याचे स्वप्न पाहात असतात. हे कींव करण्यासारखे आहे. दुर्दैवाने आपल्याकडे तीन व्यवसायांत उतरण्यासाठी काही पात्रता लागत नाही, ते म्हणजे १. राजकारण, २. कंत्राटदार बनणे आणि आपण बदललो नाही तर ३. पत्रकारिता असे म्हणण्याची पाळी ओढवेल! पत्रकारांना व्यावसायिक प्रशिक्षण गरजेचे आहे. आमच्याकडे मुंबईत विधिमंडळ वार्ताहर संघात राज्याचा अर्थसंकल्प असतो तेव्हा बजेटच्या कागदपत्रांसह बॅगा दिल्या जातात. पत्रकारांची या बॅगा मिळवण्यासाठी झुंबड उडते. त्यातली कागदपत्रे फेकून दिली जातात आणि नुसत्या बॅगा घेऊन पत्रकार घरी जातात! अर्थसंकल्पाची ही कागदपत्रे कशी वाचायची हेच अनेक पत्रकारांना ठाऊक नसते. हे दुर्दैवी आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे. गोव्यातही हीच परिस्थिती असावी. पत्रकारांना बजेटपेक्षा बॅगेत रस अधिक दिसतो! अर्थसंकल्पातील शेवटच्या परिच्छेदावर, त्यात तो अर्थसंकल्प शिलकी आहे की तुटीचा आहे एवढ्यावरच पत्रकारांची चर्चा होत असते. त्यापलीकडे ती वेगवेगळी कागदपत्रे थोडेच पत्रकार अभ्यासतात. आपण बदलायला हवे. नाही तर आपण समाजासाठी आदरणीय राहणार नाही! त्यासाठी आपण स्वतः शिकावे लागेल, लिहिताना गांभीर्य सांभाळावे लागेल. अन्यथा इतर व्यवसायांबद्दल लोक आज बोलतात तसे उद्या आपल्याबद्दल बोलू लागतील. आपल्या क्षेत्रातील माणसांच्या अपात्रतेसंबंधी चर्चा झडतील. हे कदाचित आपल्याला आवडणार नाही, परंतु हे सांगणे आज आवश्यक आहे.
मी काही काळ फायनान्शियल टाइम्स, गार्डियनमध्ये काम केले आहे. तेथे संपादक सांगायचे की ब्रेकिंग न्यूज मध्ये आम्हाला रस नाही. पण जी बातमी द्याल ती शंभर टक्के अचूक हवी व तिची समाजात दखल घेतली गेली पाहिजे. हा तेथील पत्रकारितेचा दर्जा आहे. आपण मात्र विधानपरिषदेवर किंवा राज्यसभेवर निवडले जाण्याची वाट पाहात असतो. पत्रकारांनी जबाबदारीने वागले पाहिजे. तरच ती आपली प्रतिष्ठा टिकवील.