गोव्याची आगामी विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असेल. त्यापुढील विधानसभा निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक नसून युवा नेत्याला संधी देण्यात येणार असल्याचे मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल स्पष्ट केले.
काल कुडचडे येथे एका कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मगो पक्षाने राज्यात शिक्षण व उद्योगाची गंगा आणल्याचेही ते यावेळी म्हणाले. शेतकर्यांचे हीत डोळ्यांपुढे ठेवून मगो पक्षाने राज्यात साळावली व हणजुणे ही धरणे बांधल्याचे ते म्हणाले. मगोने राज्यात संजीवनी साखर कारखानाही सुरू केला होता. आता भाजप सरकारने भाऊसाहेबांची तत्त्वे पायदळी तुडवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विकासासाठी येऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.