आगरवाड्यातील अपघातात तरुण ठार

0
3

>> टेम्पो-दुचाकीत अपघात; अन्य 1 गंभीर

आगरवाडा येथे सोमवारी सकाळी टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात आजगाव-सावंतवाडी येथील रामकृष्ण प्रदीप निखार्गे (29) हा तरुण मृत्यूमुखी पडला, तर दुचाकीचालक गणपत रमाकांत केरकर (तिरोडा-सावंतवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर म्हापसा येथील आझिलो इस्पितळात उपचार चालू आहेत.

सविस्तर माहितीनुसार, काल सकाळी आगरवडा-मांद्रे दरम्यान बोडकोधेनू देवस्थानजवळ हा अपघात घडला. टेम्पो (क्र. जीए-08-व्ही-4998) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्या दिशेने जात होता, तर विरुद्ध दिशेने दुचाकी (क्र. एमएच-07-एके-9206) वरून दोघे जण येत होते. त्याचवेळी भरधाव टेम्पोची धडक दुचाकीला बसली. त्याबरोबरच दुचाकीवर मागे बसलेला रामकृष्ण निखार्गे हा तरुण खाली कोसळला आणि टेम्पोच्या चाकाखाली सापडला, तर दुचाकीचालक गणपत केरकर हाही गंभीर जखमी झाला. रामकृष्ण निखार्गे याला तातडीने तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेताना त्याचा वाटेत मृत्यू झाला, तर गणपत केरकर याच्यावर आझिलो इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघात प्रकरणी टेम्पोचालक रत्नाकर दत्ताराम नाईक (66) उपासनगर- सांकवाळ याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संजय महादेव पेडणेकर (मांद्रे) यांनी या प्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली आहे. मांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 281,106,125 अ या कलमांखाली गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास चालू आहे.