सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याची कोविड चाचणी अहवाल येणार असेल तर अशा कर्मचार्यांनी अहवाल येईपर्यंत कामावर येऊ नये, अशा आशयाचे परिपत्रक सर्वसाधारण प्रशासन विभागाने काल जारी केले आहे.
सरकारी कर्मचार्याने अशा प्रकाराची माहिती आपल्या वरिष्ठांना त्वरित द्यावी. त्या कर्मचार्याला अहवाल येईपर्यंत घरातून काम करण्याची मोकळीक संबंधितांनी दिली पाहिजे. घरातून काम करणारा कर्मचारी फोनवर उपलब्ध असला पाहिजे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
कुचेलीत मायक्रो कंटेनमेंट झोन
उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी कुचेली म्हापसा येेथे वॉर्ड क्र. १ मध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. या वॉर्डातील ८ घरांचा मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये समावेश केला असून १३ घरांचा बफर झोनमध्ये समावेश केला आहे.
राज्यपालांसोबत आज बैठक
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कोविड या विषयावर बुधवारी आयोजित उच्चस्तरीय बैठक काही कारणास्तव पुढे ढकलली असून ही बैठक गुरूवारी सकाळी ११ वाजता घेतली जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. गोम्स कुटुंबीयांची
चाचणी निगेटिव्ह
डॉ. एडवीन गोम्स यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉ. गोम्स यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाची कोविड चाचणी करण्यात आली होती. डॉ. गोम्स मडगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.