241 प्रवाशांचा मृत्यू;केवळ 1 जण वाचला
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू
विमान कोसळले वसतिगृहावर; मृतांचा एकूण आकडा 265 वर
गुजरातच्या अहमदाबादमध्ये काल दुपारी 1.40 च्या सुमारास एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर केवळ 1 प्रवासी सुदैवाने बचावला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (68) यांचा समावेश आहे. तसेच विमानाचे 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स देखील या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.38 च्या सुमारास उड्डाण केल्यानंतर पुढील अवघ्या 2 मिनिटांत 625 फूट उंचीवरून एआय-171 (बोईंग 787 ड्रीमलायनर) हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगर रहिवासी भागात कोसळले. तसेच त्या विमानाचा काही भाग बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावरही कोसळला. या दुर्घटनेत शिक्षण घेणाऱ्या काही डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त होत आहे. तसेच काही डॉक्टर आणि स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर अहमदाबादच्या रुग्णालयात एकूण 265 मृतदेह आणण्यात आले असून, डीएनए चाचणीनंतरच मृतदेहांची ओळख पटणार आहे. या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या विमान दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, टाटा समूहाने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
5 विद्यार्थी डॉक्टरांचा मृत्यू?
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या वसतिगृहावर विमान कोसळले, त्यात निवासी डॉक्टर राहत होते. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी 50 ते 60 विद्यार्थी डॉक्टर वसतिगृहात होते. त्यातील बहुतांश वसतिगृहाच्या मेसमध्ये जेवण करत होते. प्राथमिक माहितीनुसार 5 विद्यार्थी डॉक्टरांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. या घटनेत काही जणांच्या मृतदेहांचे तुकडे झाल्याची माहिती आहे.
दोन्ही वैमानिकांना मोठा अनुभव
कॅप्टन सुमित सभरवाल हे विमान चालवत होते. त्यांना 8200 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या सोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते, त्यांना 1100 तासांचा अनुभव होता.
अनेक मृतदेह जळून खाक;
ओळख पटवणेही कठीण
विमान अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीमुळे प्रवाशांचे मृतदेह पूर्णत: जळून खाक झाले. अनेक मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये जळालेल्या अवस्थेतील अनेक मृतदेह आणण्यात आले आहेत.
मोठी जीवित व वित्त हानी
अहमदाबादच्या मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ व बीएसएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले होते.
50 रहिवासी जखमी
गुजरातच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबाद बी. जे. मेडिकल हॉस्पिटल, स्टाफ क्वार्टर्स, वसतिगृह व इतर निवासी भागात कोसळले. त्यामुळे रहिवासी भागात मोठी हानी झाली आहे. 50 हून अधिक जखमी रहिवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती स्थिर आहे.
उड्डाणानंतर दोन मिनिटांत अपघात
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले होते. अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे 1.40 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही क्षणातच विमानाने ‘मे डे कॉल’ पाठवला आणि त्यानंतर विमान मेघानीनगर भागात कोसळले.
विमानतळापासून 6 किमी.
अंतरावर कोसळले विमान
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वसतिगृह इमारतीवर कोसळले. विमानतळ ते वसतिगृह या दोघांमधील अंतर अवघे 6 किलोमीटर असून, विमानतळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही ही दुर्घटना कैद झाली आहे.
दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल
या विमान अपघाताचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका नागरिकाने टिपलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसून येत असून, ते लगेचच खाली कोसळून आग व धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमानाचे उड्डाण ते अपघात याचे दृश्य कैद झाले आहे.
टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटीची मदत
टाटा समूहाने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय ज्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व वसतिगृहावर कोसळले, त्या इमारतीच्या दुरुस्तीचा खर्च उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
विमान कोसळल्यानंतर परिसरात तीव्र स्फोटाचा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.
गोवा सरकारकडून आज दुखवटा जाहीर
अहमदाबादमध्ये काल झालेल्या भीषण विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, गोवा सरकारने शुक्रवार दि. 13 जून रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. या दिवशीचे सर्व सरकारने पुरस्कृत कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव आणि सरकारी मनोरंजन कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत, असे सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
विमान अपघातातून बचावला फक्त रमेश कुमार
अहमदाबाद विमान अपघातात भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हा फक्त एकच प्रवासी बचावला. तो विमानाच्या 11अ सीटवर बसला होता. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्वतःहून घटनास्थळावरून बाहेर पडताना दिसत आहे. या घटनेत त्याच्या छाती, पाय आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठी जीवित व वित्त हानी
अहमदाबादच्या मेघानीनगरच्या रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ व बीएसएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले होते.
वसतिगृहामध्ये घुसले विमान;
आगीमुळे काळी पडली इमारत
कोसळण्यापूर्वी एअर इंडियाचे विमान बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाला धडकले.
या ठिकाणी असलेल्या 4 इमारतींत ते विमान घुसले. त्यामुळे इमारतीच्या विविध भागांमध्ये विमानाचे अवशेष दिसून आले.
तसेच स्फोटानंतर काही इमारती आग व धुरामुळे पूर्णत: काळ्या पडल्याचे आणि त्यातही आग लागल्याचे चित्र दिसून आले.
तसेच घटनेची आणखी काही छायाचित्रे समोर आली आहेत, त्यापैकी छायाचित्रात ज्या ठिकाणी विद्यार्थी डॉक्टर जेवण करत होते, तेथील टेबल आणि त्यावरील जेवणाची ताट जशीच्या तशी असल्याचे दिसून आले.
म्हणून कुणालाच वाचवू शकलो नाही : अमित शहा
या विमानात देशातले आणि परदेशातले असे 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. यापैकी फक्त एक प्रवासी वाचला आहे. मी त्यांना भेटून आलो आहे. नेमकी मृत्यू संख्या किती ती डीएनए चाचणी आणि ओळख पटल्यानंतरच कळू शकणार आहे. विमानात सव्वा लाख लिटर इंधन होते. त्यामुळे कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळी भेट दिली असून, डीएनए चाचणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. साधारण 1 हजार डीएनए चाचण्या कराव्या लागतील आणि त्या गुजरातमध्येच होतील, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
मृतांमध्ये माजी मुख्यमंत्री
विजय रुपाणींचा समावेश
या विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या अपघातात त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये 12 व्या क्रमांकावर विजय रमणिकलाल रुपाणी असे नाव होते. 2 डी हा त्यांचा सीट नंबर होता. त्यांचा विमानाचा बोर्डिंग पास व विमानात बसल्यानंतरचा एक फोटो समोर आला होता.
विजय रुपाणींनी 5 वर्षे सांभाळले गुजरातचे मुख्यमंत्रिपद
नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर गेल्या 10 वर्षांत ज्या भाजप नेत्यांनी गुजरातवर नियंत्रण ठेवले, त्यापैकी एक नाव म्हणजे विजय रुपाणी. ते गुजरातचे 16 मे मुख्यमंत्री होते. त्यांनी 5 वर्षे 37 दिवस या राज्याचा कारभार सांभाळला होता.
माझे वाचणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही
- रमेश कुमार
उड्डाणानंतर विमानात मोठा आवाज सुरू झाला आणि अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. जेव्हा मी शुद्धीवर आलो, तेव्हा माझ्याभोवती सर्वत्र मृतदेह होते. विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरलेले होते. कोणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. माझा भाऊही माझ्यासोबत विमानात प्रवास करत होता. कृपया त्याला शोधण्यात मला मदत करा, असे रमेश कुमार याने म्हटले आहे.
अहमदाबाद येथील दुर्घटनेने आपल्याला धक्का बसला असून, अतीव
दु:ख झाले आहे. हे दु:ख शब्दात सांगता येणार नाही. या दु:खाच्या क्षणी या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकाबाबत माझ्या संवेदना व्यक्त करतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघाताची वेदना शब्दांत व्यक्त करता येण्याच्या पलीकडची आहे. आपत्ती प्रतिसाद दलांना तातडीने दुर्घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघात हा हृदयद्रावक आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना होत असलेल्या वेदना आणि त्यांची चिंता याची कल्पना करता येणार नाही.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते