- संप्रवी कशाळीकर
कुणाला आपल्याला टाळायचे असेल तर हा जबरदस्त काम करतो. म्हणजे पहा ना… तुम्हाला कॉल आला, तुम्ही टाळू शकता. फोन सायलेंटवर ठेवा अथवा मोठ्याने हॅलो हॅलो करत रहा. वर कंपनीला अधिकारवाणीने चार शिव्या घाला…
२१व्या शतकातील लोकांसाठी एक मोठं वरदान. शिकलेल्यांसाठी एक प्रमाणपत्र (मी शिकलोय) म्हणजे मोबाईल. कोकणीत ‘मोगाली बायल्’ याच्याविषयी मी काही नव्या दृष्टीने पाहात माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. मोठेपणा मिरविण्यासाठी काही साधनांची आवश्यकता असते. पूर्वी हातात घड्याळ, खिशाला पेन, डोळ्यावर चष्मा की समाजात त्याला मान. यात आता भर पडली ती म्हणजे मोबाईल. कितीही मोठी पर्स असू देत किंवा खिसा, मोबाईल मात्र हातातच हवा आणि हो डबी नव्हे बरं का…एन्ड्रॉइड… अशी व्यक्ती समाजमान्य बनते. मोबाईलच्या आकार- कंपनी आणि किंमतीवर माणसाची किंमतही ठरते. ती केवळ आजच्या या व्यवहारी जगात. स्वतःला नको एवढं सिद्ध करण्यासाठी ही माणसे रेंज असो वा नसो, मोबाईल हातात घेऊन निष्फळ प्रयत्न करत अस्वस्थ होताना दिसतात.
मित्र हो, हा आपला छोटा मित्र याच्या अनेक फायदेशीर बाबींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. कुणाला आपल्याला टाळायचे असेल तर हा जबरदस्त काम करतो. म्हणजे पहा ना…तुम्हाला कॉल आला, तुम्ही टाळू शकता. फोन सायलेंटवर ठेवा अथवा मोठ्याने हॅलो हॅलो करत रहा. वर कंपनीला अधिकारवाणीने चार शिव्या घाला (पलीकडील व्यक्तीला ऐकू येण्याइतपत्) आणि कदाचित ती व्यक्ती समोर आली तर ठोकून द्या मोबाईल बिघडलाय. सहीसलामत सुटाल.
कधी नंबर डायल करत रहा. रिंग होण्याआधी कट करा. समोर व्यक्ती भेटल्यास डायल केलेला आकडा दाखवा. किंवा सरळ सभ्यपणे चेहरा स्थिर ठेवत सरावलेल्या गुन्हेगाराप्रमाणे सांगा…‘बरं झालं तुम्ही भेटलात, अहो किती वेळा कॉल केला…. मोबाईल फोडावासा वाटला पण कॉल लागत नव्हता…’(बेमालूम खोटं).
तुम्ही रस्त्याने जात आहात, समोरून नावडती व्यक्ती येतेय. तिला टाळायचंच तर फोन कानाला लावा, थोडा चेहरा गंभीर ठेवतच त्याच्याकडे पाहून हसल्याचं नाटक करा, पुढे चला. काही पत्ता लागणार नाही.
आम्हा महिलांना घरातील काम टाळण्यासाठी खूपच उपयोगी. ‘एक कॉल करून येते, जरा कुकर लावाल का? कानाने अंदाज घ्या. तीन शिट्ट्या झाल्या की बंद करा’. परत आमटी फोडणीला घालतेवेळी तीच कृती. जेवायला बसताना मात्र मोठ्याने म्हणा, ‘आता सायलेंटवर ठेवते नाहीतर जेवायलाच मिळणार नाही या मोबाईलमुळे…’ पण हा उपाय रोज नाही बरं चालणार.. कधीतरी… प्रत्येकाने असे प्रयोग आपल्या जबाबदारीवर करावेत. तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
पुरुषवर्गासाठी हा खूपच उपयोगी. सामान आणायला बाजारात गेलात की फोनवरही लिस्ट येते. फोन घेऊ नका. स्विच ऑफ करून ठेवा, आल्यावर साखरपेरणी करा- ‘अगं किती कॉल्स केले तुला! अजुन काही राहिलं तर नाही…? ’ इकडे गृहलक्ष्मी खुश… तुम्हीही खुश!
असा हा बहुपयोगी, इज्जत वाढवणारा मोबाईल गमतीचा भाग वगळता खरंच उपयोगी आहे. याचे बरेच चांगले फायदेही आहेत. हे एक त्वरित संपर्काचे साधन आहे. मेसेज किंवा प्रत्यक्ष बोलणं असा दुहेरी लाभ निश्चितच होतो. जाण्या-येण्याचा त्रास वाचवतो हा असा भ्रमणध्वनी तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा, एक महत्त्वाचे संपर्काचे माध्यम, तिच्या फायदेशीर बाबींचा विचार करुया आणि याच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू या..!