असे रंगले २८ वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन

0
92
  • निवृत्ती शिरोडकर

पेडणे तालुका हा मराठीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोणतेही साहित्यसंमेलन पेडणे तालुक्यातील कोणत्याही भागात आयोजित केले तरी ते आतापर्यंत यशस्वीच झालेले आहे. कारण साहित्यसंमेलन म्हटले की मराठी साहित्यप्रेमींना एक पर्वणीच असते. आयोजन करण्यापासून ते बॅनर लावणे, निमंत्रण देणे; मंडप उभारण्यापासून ते उपस्थितांची चहापान, जेवण, निवासाची सोय करणे; पाहुण्यांना आमंत्रित करण्यापासून ते समारोप होईपर्यंत मराठीप्रेमी कार्यकर्ते तन-मन-धन अर्पून काम करत असतात. यामागे हाच उद्देश असतो की, मराठीची पालखी खांद्यावर घेऊन त्यातून नवोदित कवी म्हणा किंवा साहित्यिक या संमेलनातून घडावा! आपल्याला व्यासपीठावर मिरवायला मिळावे म्हणून ते धडपडत नसतात, तर आपल्या तालुक्यातील, आपल्या परिसरातील नवोदित कवी, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यांची कला चारचौघांत सादर व्हावी, यासाठी ही धडपड असते.

कोणतेही संमेलन म्हणा किंवा एखादा कार्यक्रम- मग तो यशस्वी झाला काय किंवा अयशस्वी ठरला काय- टीकाकार, निंदक निंदा-नालस्ती करतातच. म्हणूनच म्हटले जाते- ‘निंदकाचे घर असावे शेजारी!’ त्यामुळे खरेतर समोरच्यांना आणखी सुधारण्याची, माणसे ओळखण्याची संधी मिळते.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे २८ वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन २७ व २८ डिसेंबर २०२१ रोजी पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या संत सोहिरोबानाथ आंबिये नगरीत संपन्न झाले. तब्बल ३० वर्षांनंतर आणि एका तपानंतर साहित्य सेवक मंडळाचे साहित्यसंमेलन दुसर्‍यांदा पेडणे तालुक्यात आयोजित करण्याचा मान पेडणेकरांना मिळाला. आयोजन समितीने टीकाकारांची टीका सहन करून आपले जे उद्दिष्ट होते ते यशस्वीपणे साध्य केले.

मागच्या दीड वर्षापासून आयोजक या संमेलनाची तयारी करत होते. कोरोना महामारीमुळे ते दिवसेंदिवस लांबणीवर पडत होते. अखेर २७ आणि २८ डिसेंबर रोजी हे संमेलन यशस्वी झाले. सर्वच मराठी वृत्तपत्रांनी या संमेलनाला प्रसिद्धी दिली आणि हे संमेलन उचलून धरले, त्यामुळे ते गोवाभर गाजले. संमेलनाध्यक्ष म्हणून विजय कापडी, स्वागताध्यक्ष म्हणून मांद्य्राचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये, कार्यवाह- सुहास बेळेकर, निवृत्ती शिरोडकर, चित्रा क्षीरसागर यांची निवड करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खास निमंत्रित- केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, डॉ. सदानंदराव मोरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांपैकी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक हे काही कामामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उद्घाटन करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर येऊन ठेपली.

सुरुवातीला स्वागताध्यक्ष दयानंद सोपटे, कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, साहित्यिक नारायण महाले, दत्ताराम मोपकर, चंद्रकांत सांगळे, सुभाष पार्सेकर, राजन शेटगावकर, उमेश गाड, प्रभाकर नारूलकर, चंद्रकांत सावळ-देसाई आदींनी पेडणे येथील श्रीभगवती मंदिरात श्रीदेवीचे आशीर्वाद घेतले व दिंडीला प्रारंभ झाला. मराठीची पालखी स्वागताध्यक्ष आमदार दयानंद सोपटे आणि कार्याध्यक्ष राजमोहन शेट्ये यांनी खांद्यावर घेऊन संमेलनाची सुरुवात केली. मोरजी येथील श्रीसत्पुरुष मोरजाई दिंडी पथकाने मराठीचा जगर करत साहित्याच्या जागरात उत्साह निर्माण केला. दिंडी संत सोहिरोबानाथ आंबियेनगरीत पोचल्यावर साहित्यदिंडीची पालखी थोडा वेळा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आपल्या खांद्यावर घेतली.

त्यानंतर ‘नटसम्राट प्रभाकर पणशीकर व्यासपीठा’वरून २८ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. उद्घाटन सत्रावेळी निमंत्रणपत्रिकेवर माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांचे नाव नसतानाही त्यांना व्यासपीठावर बसवण्याचा अचानक आयोजकांनी निर्णय घेतला आणि त्यांना मानाचे स्थान दिले. उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी अनेकांनी आपले फोटो यावेत म्हणून समई प्रज्वलित करताना व्यासपीठावर धाव घेतली. ज्या पंचायत क्षेत्रात हे संमेलन होत होते तिथल्या प्रथम नागरिक तथा सरपंच अपर्णा परब यांना व्यासपीठ देण्याचे सौजन्य दाखवण्यात आले नसल्याने थोडी कुजबूज दिसून आली. या संमेलनाला साहित्यप्रेमींची अपेक्षित उपस्थिती नव्हती; मात्र गर्दीपेक्षा दर्दी खूप होते हे यावेळी दिसून आले.
संत सोहिरोबानाथ आंबियेनगरीत प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शिवाय ग्रंथ-पुस्तकांची दालने, आणि त्यांत अधूनमधून मराठीप्रेमी पुस्तके चाळत असल्याचे चित्र दिसत होते. बरेच लोक पुस्तके विकत घेत होते.
उद्घाटनानंतर श्रीमोरजाई संघाने बाजी प्रभू यांच्या जीवनावर आधारित सुंदर पोवाडा सादर करून वाहवा मिळवली आणि भाषणांना सुरुवात झाली.

उद्घाटक या नात्याने बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी ‘आपण मराठीप्रेमी आहे, आपली मातृभाषा मराठी आहे. ही भाषा म्हणजे आपला श्‍वास आहे’ असे सांगून कोंकणीला जसा राजभाषेचा मान दिला, त्याचप्रमाणे मराठीलाही राजभाषेचा मान द्यावा अशी मागणी करत पेडणे तालुक्यातील नियोजित क्रीडानगरीसाठी ३० हजार चौ.मी. जमीन कला आणि संस्कृतीच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. संमेलनाध्यक्ष श्री. कापडी, खास निमंत्रित डॉ. मोरे यांचीही यावेळी भाषणे झाली.
उद्घाटन सत्र संपल्यानंतर लगेच दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ‘२००० नंतरचे गोमंतकीय मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. यात प्रा. अरुण नाईक (काव्य), जयप्रभू कांबळे (कथा), प्रा. विनय बापट (कादंबरी), राजू नाईक (बाल साहित्य) यांनी विचार मांडले. परिसंवादाचे अध्यक्ष संपादक परेश प्रभू म्हणाले की, ‘समाजाचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. साहित्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. दरवर्षी गोव्यात शेकडो पुस्तके प्रकाशित होतात. पण चांगल्या पुस्तकांची निर्मिती होते की नाही यावर विचार करण्याची गरज आहे. अनुदान मिळते म्हणून पुस्तके प्रकाशित केली जात असताना त्यांचा दर्जा राखणेही महत्त्वाचे आहे. पुस्तक प्रकाशनाबरोबरच आता अनेकांना पुरस्कारही मिळत आहेत.’ हा परिसंवाद खूपच रंगला. त्यानंतर एक कविसंमेलन झाले. मात्र कवींव्यतिरिक्त इतर कुणाची उपस्थिती वा दादही मिळाली नाही. त्यानंतर काही नाट्यप्रवेश झाले आणि पहिल्या दिवसाचे सत्र मध्यरात्री संपले.

नाट्यप्रवेश सादरीकरण
या संमेलनात नाट्यकलाकारांना खास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजन समितीने पुढाकार घेतला, त्यामुळे शेकडो कलाकारांना आपली कला सादर करता आली. त्यात गुरुकृपा संगीत संस्था, तांबोसे- संगीत मंदारमाला; श्रींची इच्छा थिएटर, हरमल- ‘चांदणे शिंपित जा’; अभिनव कला थिएटर, मांद्रे- ‘ययाती आणि देवयानी’; मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव, सांस्कृतिक आणि क्रीडा संघ- ‘शिक्का कट्यार’ या गाजलेल्या नाटकांचे नाट्यप्रवेश सादर करण्यात आले. या प्रवेशातून अनेक नाट्यप्रेमींचे मनोरंजन झाले.

गोमंतकीय मराठी साहित्यातील महिलांचे योगदान
‘गोमंतकीय मराठी साहित्यातील महिलांचे योगदान’ या विषयावरील परिसंवाद डॉ. अनिता तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यात प्रा. पौर्णिमा केरकर, प्राची जोशी, डॉ. प्रमदा देसाई व सोनाली सावळ-देसाई यांनी दिलेल्या विषयावर कमी वेळात जास्त आशय सादर करून प्रेक्षकांना आसनावर खिळवून ठेवण्याची किमया साधली.

‘पगडी जाऊन, आली पक्षाची टोपी’
या संमेलनात आकर्षण ठरली ती डॉ. सदानंदराव मोरे यांची डॉ. संगीत अभ्यंकर यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत. २८ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंदराव मोरे यांची प्रकट मुलाखत संत सोहिरोबानाथ आंबियेनगरीत प्रा. संगीता अभ्यंकर यांनी विविध पैलूंतून घेतली. आधुनिक इतिहास लिखाणात तुकोबांचा प्रभाव आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांवर महात्मा फुले व तुकाराम महाराज यांचा प्रभाव पडलेला आहे. त्यानंतर पगडी जाऊन, गांधी टोपी कशी आली याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला. गांधीतत्त्वांना पूर्ण स्वीकारायचे असेल तर ती टोपी घालायलाच हवी, असे डॉ. सदानंदराव मोरे मिस्कीलपणे म्हणाले. मुलाखती दरम्यान ही काही प्रश्‍नोत्तरे…
प्रा. संगीता : एकाच वेळी तत्त्वज्ञान व इतिहासाचे पैलू आपल्या लेखनात कसे दिसतात?
डॉ. सदानंदराव : मी सर्व मुद्द्यांना, विषयांना स्पर्श करून लेखन केले. लेखनाला पोषक वातावरण आणि पाठिंबा मिळाला. मी विविध विषयशास्त्रांचा अभ्यास केला. मानवी जीवन एकसंध आहे म्हणून मी सर्व विषयांवर चर्चा करत असतो.
‘कलेच्या किंवा शास्त्राच्या अंगाने जीवनाला भिडा’ असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत ढकलले गेले, हेसुद्धा त्यांनी प्रांजळपणे सांगितले. तत्त्वज्ञानाच्या आधारे अभ्यास करून घ्यावा, विविध विषय, शास्त्र समजून घ्यायला हवे.
प्रा. संगीता : संतसाहित्य आणि समाजकारण यांची सांगड कशी घातली?
डॉ. सदानंदराव : वयाच्या १७ व्या वर्षी प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराजांचे वंशज आहोत हे मी माझे भाग्य समजतो. माझे वडील साहित्यप्रेमी असल्याने अनेक पुस्तके त्यांच्या संग्रही होती. समाजकारण, राजकारण, विज्ञान या विषयांची पुस्तके घरी मुबलक होती. त्यांचे मी वाचन केले. कीर्तन संप्रदायातून केले. संतसाहित्य हा संप्रदाय म्हणून काही लोक पाहतात, पण संतसाहित्य हे जीवनाचा एक भाग बनू शकते. संतसाहित्याचा राजकारण, समाजकारणावर चांगलाच परिमाण झाला आहे. भगवद्गीता हे मानवी तत्त्वज्ञान आहे. तत्त्वज्ञान व जगणे यांचीही सांगड घालायला हवी.
प्रा. संगीता : १८ व्या व १९ व्या शतकांबाबत आपण काय सांगाल?
डॉ. सदानंदराव : १८ व्या शतकात महाराष्ट्रातील मराठे देशभर गेले. राज्य चालवण्याची क्षमता होती म्हणूनच कर्तृत्व गाजवले. त्यानंतर अचानक धूमकेतूप्रमाणे गांधीजी आले. ते अहिंसावादी, तर मराठे संघर्ष करणारे महापराक्रमी- ज्यांच्या कृती, घटनांतून इतिहास दिसतो. लढाई जिंकणारे नुसते सेनापती नसतात; योद्धेही महापराक्रमी असतात. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे नेते… त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर राजकारण, समाजकारण आले.
प्रा. संगीता : अभंग, कीर्तन यात सामाजिक फरक कोणता?
डॉ. सदानंदराव : कीर्तनाचीसुद्धा एक मर्यादा आहे. तुकोबा महाराजांचे अभंग समाजप्रबोधनासह राजकारणावरही भाष्य करणारे आहेत. कीर्तनाला विषयाची मर्यादा नाही. कृष्णाची लीला कीर्तनातही सांगितले जाते. तमाशात ज्या काही गोष्टी करता येतात, त्या सध्या कीर्तनातही येत आहेत. मात्र, ते योग्य नव्हे. भक्तिरस, शांतरस हे घटक पूर्वी कीर्तनात होते. आता समाजात घडलेल्या समस्यांवर कीर्तन होते. पण ते व्यवस्थित मांडले जात नाही.
प्रा. संगीता : कवितांबाबत काय सांगणार?
डॉ. सदानंदराव : कविता राजकीय असो किंवा अन्य कुठलीही, मात्र ती मनातून यायला हवी. ती जगण्यासाठी महत्त्वाची ठरावी. जातीच्या पलीकडे जाऊन आपण लेखन करतो. मात्र त्या जाती समजून घेणे महत्त्वाचे आहे. मला एका विषयात अडकून राहायला आवडत नाही.
प्रा. संगीता : जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत काय सांगाल?
डॉ. सदानंदराव : जगाच्या पटलावर वेगवेगळी विचारसरणी आहे. जबरदस्तीने राष्ट्रावर ताबा मिळवणे हा विचार भयानक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणार्‍या व्यक्तीही आहेत. विश्वातील युद्धे अजून संपलेली नाहीत. अर्थकारणासाठी जग जिंकण्याची वृत्ती वाढत आहे. युवकांनी स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर गेले पाहिजे. ग्लोबल आणि लोकल एकत्रित असायला हवे.
प्रा. संगीता : तुकाराम महाराजांचे आपण वंशज नसता तर विपुल लेखन केले असते का?
डॉ. सदानंदराव : आव्हानात्मक नजरेतून लेखनसंधी मिळाली. मी त्याचा पुरेपूर लाभ घेतला. लोकांनाही माझे लेखन भावले. संत तुकारामांचेही प्रसिद्धीवलय मला लाभले. लोकांनीही भरभरून प्रेम दिले.

प्रा. संगीता : लेखनप्रेरणेवर कुणाचा प्रभाव होता?
डॉ. सदानंदराव : भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास लिहिताना सामाजिक समतेचा इतिहास लिहायला हवा. नाटकांबाबत पहिल्यापासून माझ्यावर आचार्य अत्रे यांचा प्रभाव पडला. त्याचा राजकारणावर प्रभाव पडला. जो प्रभाव माझ्यावर बालपणी पडला त्यावर लेखन केले आणि लोकांनीही त्याला दाद दिली, ही त्याची पोचपावती नव्हे का?
‘मराठी भाषा आणि समाजमाध्यमे’ या परिसंवादात नीता तोरणे, नरेंद्र नाईक, परेश व प्रा. विनय मडगावकर यांनी विचार मांडले.
साहित्यसंमेलनात ‘गोव्याची नव्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल चालू आहे का’ यावर परिसंवाद झाला. यात माजी मंत्री रमाकांत खलप (राजकारण), किशोर शेट-मांद्रेकर (पत्रकारिता), डॉ. मनोज कामत (अर्थकारण), प्रा. अनिल सामंत (शिक्षण), डॉ. प्रदीप सरमुकादम (पर्यावरण) यांनी भाग घेतला.
किशोर शेट-मांद्रेकर (पत्रकारिता)
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना किशोर शेट मांद्रेकर म्हणाले की, परिवर्तन सतत घडत असते, ते घडत जाणार. परिवर्तनातून चांगले घडू शकते म्हणून परिवर्तनाच्या दिशेने जायला हवे असे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतही परिवर्तन घडत आहे. हा चौथा स्तंभ ढासळत आहे. विविध अंगांनी पत्रकारिता बदलत चालली आहे. पूर्वी गोमंतकीय पत्रकारांनी आपल्या भूमीला न्याय देण्यासाठी लेखन केले. आताची पत्रकारिता व्यवसायाकडे वळली आहे. पत्रकारांची भूमिका बदलली आहे. जबाबदारी वाढलेली आहे. नागरिकांनी जागृत राहावे, असे ते म्हणाले.
चित्रकार राजमोहन शेट्ये यांनी ‘पुनव’ या स्मरणिकेसाठी तयार केलेले मुखपृष्ठ लक्ष वेधून घेत होते. संमेलनाच्या स्मरणिकेचे विमोचन करण्याबरोबरच इतर गोमंतकीय लेखकांच्या पुस्तकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. शिवाय दिवाळी अंकाचेही प्रकाशन झाले. या संमेलनाच्या समारोह सत्रात आणि उद्घाटन सत्रात विविध क्षेत्रांत योगदान दिलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

समारोहाच्या सत्रात गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर थोडे भावनावंश झाले. त्यांनी कार्याचा धावता आढावा घेतला. त्यानंतर प्रसाद सावंत लिखित व दिग्दर्शित महलक्ष्मी युवक संघ, तळवली-फोंडा यांनी ‘तुका आकाशा एवढा’ या नाटकाचा प्रयोग सादर केला.