असे केले पाकिस्तानशी दोन हात…

0
127

भारताचे माजी उपपंतप्रधान तथा थोर दलित नेते बाबू जगजीवनराम यांची आज ६ जुलै रोजी ३२ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून पाकिस्तानशी दोन हात केले, ते त्यांच्याच शब्दांत…

बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा तेथील युवा, विद्यार्थी यांनी लढा सुरू केला, तेव्हा पाकिस्तानने भारताच्या एक लाख फौजेला त्रास देण्यास सुरुवात केली. माझे सहकारी मला विचारत की, ‘या माध्यमातून बांगला देश स्वतंत्र होईल का?’ मी सांगत असे की, याचे उत्तर याह्याखान देत आहेत. याह्याखान म्हणाले की, ‘स्वातंत्र्यासाठी झटणार्‍या या युवकांनी बांगलादेशचा थोडा जरी भूखंड स्वतंत्र केला तर भारतावर युद्ध लादले जाईल.’ हे ऐकून मी गप्प राहिलो. संरक्षणमंत्री या नात्याने गप्प राहिलो. वेड्या माणसाच्या प्रत्येक कृतीला उत्तर देता येत नाही. मी यावर काही उत्तर दिले नाही. पण जेव्हा वेड्या व्यक्ती हातात दगड घेऊन धावत सुटतात, तेव्हा काही ना काही उपाययोजना करावी लागते. जोपर्यंत धमकावणे सुरू होते, तोपर्यंत आम्ही गप्प होतो, पण जेव्हा त्यांनी आपल्या फौजांना छावण्यांमधून काढून भारताच्या पश्‍चिम सीमेवर बसवले, तर मग आम्ही काय गप्प राहू? तेव्हा आमच्यासमोर दुसरा मार्ग नव्हता. आम्ही पण भारतीय फौजांना पश्‍चिम सीमेवर बसवले. तेव्हा कुठे जगाचे डोळे उघडले.

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आमची सहानुभूती होती हे मी लपवत नाही. आमच्या मदतीने बांगलादेश जसजसा स्वातंत्र्यापर्यंत पोहचत होता, तसतसे याह्याखान यांचे मानसिक संतुलन ढासळत गेले. बांगलादेशात लोक पुढे जात होते. युद्धाची घोषणा झाली नव्हती. तुम्हाला आठवत असेल की, तेथून अमेरिकी जहाज गेले होते. यावेळी काही लोकांना वाटले की ‘आम्ही कमकुवत आहोत’. त्यावेळी आगरतळा, करीमगंज, वनगाव या ठिकाणाहून पाकिस्तानच्या फौजेवर गोळीबार होत होता. बॉम्बवर्षाव होत होता. मी आमच्या बंदुका बंद करण्यास सांगितले. तेव्हाही त्या बंद झाल्या नाहीत. मी बंदुका बंद करण्यास सांगितले याचा अर्थ आपल्या सीमेवरून पलीकडील बंदुका बंद कराव्यात. आमच्या बहाद्दूर जवानांनी माझे म्हणणे खरे करून दाखविले.
पंतप्रधानांना सगळीकडे लक्ष द्यावे लागते. शेवटी लोकसभेत जेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा त्या म्हणाल्या की देशाच्या सुरक्षेसाठी शत्रूच्या प्रदेशातही जावे लागते. चर्चा सुरूच राहिली. आता हा सर्व इतिहास आहे. अखेर ३ तारखेला याह्याखान यांच्या मित्रांनी- जे पाकिस्तानला वाचवू पाहत होते, त्यांनी मंत्र दिला. त्या दिवशी पंतप्रधान कलकत्त्यामध्ये होत्या. मी पाटण्यास होतो. ज्यावेळी पाकिस्तानची विमाने आमच्या देशात आली, तेव्हा मी पाटण्यात एका जनसभेला संबोधित करत होतो. काही तरुणांनी विचारले,‘कधीपर्यंत वाट पाहायची?’ मी म्हणालो,‘याह्याखान जोपर्यंत आपल्याला संधी देत नाहीत, तोपर्यंत वाट पाहायची.’ आणि त्यांनी तशी ती संधी दिली.

मी गेस्टहाऊसमध्ये पोहोचल्यानंतर मला सचिवांचा दूरध्वनी आला की, पावणेसहा वाजता पाकिस्तानची काही विमाने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, आदमपूर, आग्रा याठिकाणी बॉम्ब टाकत आहेत. मी निर्णय घेतला. आता आणखी काही विचार करायची गरज नाही. तिन्ही सेनादलांना आदेश दिला की, ‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यांनी ते केले. त्यानंतर काय घडले ते आपणा सर्वांनाच माहित आहे. युद्ध आम्ही करू इच्छित नव्हतो. युद्धाचा उद्देश एकच होता की जे एक कोटी शरणार्थी आले आहेत, त्यांना आपल्याला घरी परत पाठवणे.

युद्धापूर्वी आम्ही एक आराखडा तयार केला होता. मला आठवते, १७ ऑक्टोबरचा तो दिवस. तेव्हा जालंधर येथून मी म्हणालो होतो की, ‘आम्ही युद्ध करू इच्छित नाही. पण पाकिस्तानने आमच्या सीमेवर आगळिक केली, तर युद्ध आमच्या भूमीवर नाही, तर पाकिस्तानच्या भूमीवर होईल.’ हे मी पूर्ण विचारांती बोललो होतो. आमच्या पंतप्रधानांचीही हीच इच्छा होती की, युद्ध होऊ नये. मलाही तेच वाटत होते. पण अवघ्या १२ दिवसांतच भारतीय सैन्याने पाकिस्तानची तटबंदी खिळीखिळी केली. खरे तर हे काम १२ दिवसांपेक्षाही लवकर झाले असते. पण माझ्यामुळेच दोन-तीन दिवस उशीर झाला. मला वाटत होते की, भारतीय सैन्याते कमीत कमी नुकसान व्हावे. जैसोर शहरावर पाकिस्तानचा पहारा होता. ते शहर घेण्यास वेळ लागला. जर दोन दिवसांत घ्यायचे असते तर आमचे फार नुकसान झाले असते. तसेच पूल, विजेच्या तारा या तोडल्यानंतर आम्हालाच पुन्हा त्या दुरुस्त कराव्या लागल्या असत्या. म्हणून कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी आम्ही घेतली. ढाकासुद्धा लवकरच ताब्यात घेऊ हा विश्‍वास आम्हाला होता. ढाक्यातून व बांगलादेशातून जाणारे सर्व रस्ते भारतीय सैन्याने बंद केले होते. युद्ध न करताही दोन महिन्यांनंतर पाकिस्तान आम्हाला शरण आला असता, कारण कराचीहून चितगावला जाता येत नव्हते. तुम्ही पाहिले असेल की आमच्या तिन्ही दलांच्या समन्वयाने आम्ही युद्ध जिंकले.

या घटनेच्या एक दिवस आधी मी मुंबईत होतो. तेव्हा एक मित्र म्हणाला होता, ‘तुमचे नाविक दल म्हणजे शोभेची वस्तू आहे.’ तेव्हा मी म्हणालो होतो की, ‘तसे तुम्हाला वाटत असेल, पण वेळ आल्यानंतर ते सिद्ध करतील की ती शोभेची वस्तू नाही तर कामाची वस्तू आहे.’