असुरक्षिततेचे भांडवल

0
97

आसाममधील उल्फाशी अल कायदाने संधान साधले असल्याची भीती त्या राज्याचे मुख्यमंंत्री तरुण गोगोई यांनी व्यक्त केली आहे, ती अनाठायी नाही. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमधील भारतविरोधी दहशतवादी शक्ती नक्षलवाद्यांशी आणि ईशान्येकडील फुटीर गटांशी हातमिळवणी करण्यासाठी धडपडत असल्याच्या वार्ता गुप्तचर यंत्रणांना मिळत आल्या आहेत. त्यामुळे सध्या बंदी असलेल्या पण एकेकाळी आसाम पेटवलेल्या उल्फाशी खरोखरच अल कायदाने संपर्क प्रस्थापित केलेला असेल, तर ती चिंतेची बाब म्हणायला हवी. काही दिवसांपूर्वीच अल कायदाने एक व्हिडिओ जारी करून भारतामध्ये नव्याने जिहाद पुकारण्याची आणि त्यासाठी भारतात आपली शाखा निर्माण केल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर गोगोई यांनी व्यक्त केलेली शक्यता पडताळली गेली पाहिजे. अलीकडील काही वर्षांत एकेकाळचे प्राग्ज्योतिषपूर आणि आजचे आसाम वांशिक हिंसाचाराने खदखदत राहिले आहे. विशेषतः तेथील आदिवासी बोडो आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यातील संघर्ष सतत सुरू असतो. दोन वर्षांपूर्वी जवळजवळ चारशे गावांमध्ये या हिंसाचाराचे लोण पसरले होते आणि लाखो लोक बेघर झाले होते. त्यानंतरही असे हल्ले सुरूच आहेत. हे हल्ले समर्थनीय नसले, तरी त्यामागची कारणे आपण समजून घेतली पाहिजेत. आधीच रोजीरोटीच्या मर्यादित संधी असताना बांगलादेशी घुसखोरांचे तांडेच्या तांडे आसाममध्ये घुसत राहिल्याने तेथील मूळ निवासी जमातींच्या रोजीरोटीच्या संधी हिरावून घेतल्या जाऊ लागल्या आहेत आणि त्यातूनच बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध असंतोष धुमसत राहिलेला आहे. सध्या आसाममध्ये ३१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या या बांगलादेशी घुसखोरांची आहे आणि त्यामध्ये दरवर्षी सात टक्क्यांनी वाढ होत चालल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे एकेका जिल्ह्यातून स्थानिक आदिवासी अल्पसंख्यक बनू लागलेले आहेत. आसामच्या २७ पैकी अकरा जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित बांगलादेशी आज बहुसंख्य बनलेले आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे बोडोंच्या आक्रमक गटांच्या त्यांच्याशी हिंसक चकमकी झडतात आणि याचाच फायदा उठवून अल कायदा आपले बस्तान आसाममध्ये बसवू पाहते आहे. त्यासाठी उल्फासारख्या बंदी असलेल्या संघटनेची मदत घेण्याचा त्यांनी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले अस्तित्व हळूहळू आसाममध्ये निर्माण करायला सुरूवात केली, त्यामागेही हा संघर्ष आहे. असुरक्षिततेतून समाजघटकांना असे संघटनात्मक पाठबळ हवेसे वाटत असते. जेथे जेथे अशी असुरक्षितता आहे, तेथे तेथे हातपाय पसरण्याचा प्रयत्न जिहादी शक्तीही सतत करीत असतात. तामीळनाडूमध्ये काही दिवसांपूर्वी इराकमधील आयएसआयएसआयच्या समर्थनार्थ एका गटाने काळी टीशर्ट घालून छायाचित्रे झळकवली. लगेच आयएसआयएसआयचा प्रमुख अबुबकर अल बगदादीचा व्हिडिओ संदेश हिंदी आणि ऊर्दूबरोबर तामीळमधूनही जारी करण्यात आला. म्हणजे हे जिहादी आपली गिर्‍हाईके शोधत असतात. मध्ये गुजरातमधील दंगलीचा फायदा उठवून आपल्या हस्तकांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आसाममध्ये अल कायदा सध्या हातपाय पसरू पाहते आहे, तीही तेथील बोडोंच्या हल्ल्यांनी त्रस्त असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना चिथावून. हे फूट पाडण्याचे डावपेच उधळायचे असतील, तर अल्पसंख्यकांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हाच त्यावरील उपाय आहे. त्यांना लक्ष्य करणे सुरू राहिले, तर त्यातून केवळ अविश्वास आणि अविश्वासच वाढत जाईल. पंतप्रधानपदी आलेल्या नरेंद्र मोदींना हे पुरेपूर उमगलेले आहे. त्यामुळे आपल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी जी भूमिका मांडली आहे, ती त्यांच्या पक्षातील कडव्या शक्तींनीही ध्यानात घेतली पाहिजे. तेढ पसरवून निवडणुका जिंकायचे दिवस इतिहासजमा झालेले आहेत, हे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतून सिद्ध झालेच आहे. त्यामुळे नवी झेप घेऊ पाहणार्‍या नव्या भारताच्या आशा आकांक्षांमध्ये विद्वेषाचा अडसर आणू पाहणार्‍या प्रवृत्तींना पायबंद घातला गेला, तरच देशद्रोही शक्तींना भारतात हातपाय पसरवण्याची संधी मिळणार नाही!