असह्य उकाड्यामुळे आज शाळांना सुट्टी

0
9

>> विद्यार्थ्यांना थोडा दिलासा; राज्य सरकारकडून काँग्रेस, आम आदमी पक्ष, एनएसयूआयची मागणी काही अंशी मान्य

राज्यात मान्सूनला झालेला विलंब आणि वाढते तापमान व उकाडा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज (शनिवार दि. 10 जून) राज्यातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. उद्या रविवार असून, वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना सलग दोन दिवस घरी राहता येणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर काही तासांतच काल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पावसाने पणजी, पर्वरीसह राज्याच्या अन्य भागात हजेरी लावली. त्यामुळे वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच एनएसयूआय आदींनी पावसाचा अभाव व असह्य उकाड्याच्या पार्श्वभूमीवर शाळांना पुढील काही दिवस सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काल सरकारने शाळांना एका दिवसाची सुट्टी जाहीर करून काही अंशी त्यांची मागणी पूर्ण केली. सर्व सरकारी शाळा, तसेच सरकारी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा शनिवारी बंद राहतील. या सर्व शाळांच्या संस्था प्रमुखांना त्याविषयी कळविण्यात आले आहे.

मंगळवारपर्यंत राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. मान्सूनला झालेल्या विलंबामुळे तसेच यंदा राज्यात मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने राज्यातील धरणातील पाण्याची पातळीही बरीच खाली गेली आहे. त्यामुळे राज्यावर पाणीटंचाईचे संकटही घोंघावत आहे.
पावसाच्या अभावी राज्यातील तापमानात बरीच वाढ झालेली असून, पणजीतील तापमान 35.5 अंश सेल्सिअसवर गेल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांना बराच त्रास सहन करावे लागत आहे. राज्यातील अन्य शहरे व गावातील परिस्थितीही जवळपास तशीच आहे.

बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल नाही

राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने विद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर केलेली असली, तरी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या जूनमधील पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. शनिवार दि. 10 जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाणार आहे, असे शिक्षण मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी कळविले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.