असहकार

0
47
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

असहकार हे असे अस्त्र आहे की ते संभाव्य धोक्यापासून आपले संरक्षण करते. दुर्जनाशी असहकार आणि सज्जनाशी सहकार केल्याने आपलाच शिल्पकार आपण बनतो. म्हणून विचारपूर्वक असहकाराचा मार्ग स्वीकारावा.

महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांशी असहकार आंदोलन पुकारले. या आंदोलनात लाखो भारतीय सामील झाले. सर्वसामान्य जनतेला या कृतीचा अर्थ समजणे अगदीच कठीण होते. न बोलता मूकपणे बहिष्कार घालणे व कोणत्याच हुकुमाला प्रतिसाद न देणे हे खूपच धाडसाचे काम होते. आपल्या इच्छेप्रमाणे कामे होत नाहीत म्हणून ब्रिटिशांनी लाठीमारदेखील केला. पण गांधीजींचे सांगणे होते की तुम्ही प्रतिकार करू नका. लाठ्या मारून त्यांचे हात थकतील, पण आपली प्रतिज्ञा मोडता कामा नये. तुम्हाला जर जगायचे असेल तर मरायला अगोदर तयार व्हा. तुमच्या धाडसाची भीती ब्रिटिशांना वाटायला हवी.

गांधीजींचे शब्द खरे ठरले. असहकारामुळे ब्रिटिशांचे प्रशासन कोलमडले. कामकाजात सुरळीतपणा येण्यासाठी मनधरणी करण्यापर्यंत त्यांना उपाय शोधावा लागला.
दक्षिण आफ्रिकेत असताना हाच प्रयोग अगोदर गांधीजींनी केला होता, आणि त्यात ते यशस्वी ठरले होते. पाशवी सत्तेपुढे त्यांना मार जरूर खावा लागला होता; पण उद्दिष्ट साध्य होऊन या मार्गाचे महत्त्व आंदोलक जनतेला समजले होते.

कोणत्याही नियमाचे व कायद्याचे विनम्रपणे पालन करायचे नाही, तर त्याविरुद्ध असहकार दाखवायचा. त्यातूनच विदेशी कपड्यांवर बहिष्कार व त्यांची सामूहिक होळी असे तंत्र वापरले गेले. मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रा त्याच तत्त्वाने सुरू झाली. अशिक्षित शेतकरी, गरीब मजूर, रोजंदारीवरील कामगार… अगदी सगळेच या असहकारात सामील झाले. मुख्य म्हणजे यामध्ये गांधीजींचा कोणताच वैयक्तिक स्वार्थ त्यांना दिसला नाही. आणि त्यागाच्या व बलिदानाच्या या मोर्चामध्ये प्रथमस्थानी गांधीजी असायचे. जेव्हा पुढारी निर्भय असतो तेव्हा त्या निर्भयतेतून कोट्यवधी निर्भय चेहरे निर्माण होतात. असहकार करताना प्रत्येक क्षणाला माणूस जिवावर उदार असायला हवा. मृत्यू आला तरी आम्ही आमच्या निष्ठेपासून पाऊलभरदेखील मागे हटणार नाही, हा निश्‍चय हवा.

‘भारत छोडो’ अर्थात ‘क्विट इंडिया’ या सर्वव्यापी आंदोलनाला असहकाराचे पाठबळ होते. जनशक्ती एवढी आग्रहपूर्ण होती की ब्रिटिशांना भारत सोडण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. जाता-जाता फाळणीचा मध्यस्थीपणा त्यांनी साधला. भारत व पाकिस्तान असे दोन तुकडे बनवण्यात त्यांना यश आले. येथे गांधीजींच्या भावनेचा कोणीच विचार केला नाही. फाळणी होऊ नये म्हणून त्यांना उपोषणही करता आले नाही. कारण हिंदू व मुसलमान यांच्या रक्ताने संपूर्ण परिसर रक्तबंबाळ व्हायला लागला. बॅरिस्टर जीना आपल्या फाळणीच्या मागणीशी ठाम राहिले. गांधीजींना अपरिहार्यतेने परिस्थितीशी तडजोड करावी लागली. १४ व १५ ऑगस्टला अनुक्रमे पाकिस्तान व भारताचे ध्वज आकाशात स्वतंत्रपणे फडकायला लागले. एकाच भूमीचे दोन राष्ट्रांत विभाजन झाले. पाकिस्तानला द्यायचे ५५ कोटी रुपये देण्यासाठी माघार दिसल्यावर गांधीजींना उपोषण करावे लागले. ‘मुस्लिमधार्जिणे बापूजी’ असा आरोपही गांधीजींवर करण्यात आला. गांधीजी वचनपूर्तीची भाषा बोलत होते. त्याचा अर्थ आपले इतर नेते समजून घेत नव्हते.

आपल्या तत्त्वासाठी आणि ‘बोले तैसा चाले’ या कृतीसाठी देहाचे बलिदान महात्मा गांधीजींना करावे लागले. इथपर्यंत ‘असहकार’ आपली सत्त्वपरीक्षा घेत असतो. असहकार हा फक्त परकीयांशी नसतो तर स्वकीयांशीदेखील करावा लागतो.

जेव्हा जीवनामध्ये आपण चांगले विचार सांगतो, त्याचे महत्त्व कोणीच ओळखत नाही आणि विचार सांगणार्‍याचीच थट्टा होते. इथपर्यंत मजल जाते की चांगला विचार सांगणार्‍यावरच बहिष्कार घातला जातो, इतर सगळ्यांचाच कंपूशाहीने एक गट होऊन त्याच्याशीच असहकार पुकारला जातो.

गप्प राहून संयमाने दिवस ढकलण्याशिवाय दुसरा मार्गच उपलब्ध नसतो. चांगल्या विचारांचा परिणाम लगेच दिसत नाही. काळ पुढे गेल्यावर खरा प्रकार लक्षात येतो. पण त्याच्यावर उपाय करता येत नाही. कारण योग्य वेळ टळून गेलेली असते.
‘असहकार’ किती दिवसांपर्यंत चालू ठेवावा याला निश्‍चित बंधन नसते. खूपदा असहकाराचा चुकीचा अर्थ माणसे काढतात आणि असहकार करणार्‍यालाच वाळीत टाकतात. आपल्या मनात जे करायचे असते ते करून मोकळे होतात. असहकार करणार्‍याचीच टिंगल-टवाळी करतात आणि एकलकोंडा किंवा तुसडा अशी विशेषणे चिकटवतात.
दुसरा गैरवर्तन स्वीकारतो म्हणून आपणही ते स्वीकारावे का? आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी जरूर वापरावी. आपल्या सकारात्मक बुद्धीला जर ती कृती पटत नसेल तर सरळ ठोकरून द्यावी. थोड्या वेळापुरता मनस्ताप आपल्याला जरूर सहन करावा लागेल; पण पुढे आपलाच आपल्याला अभिमान वाटेल. आपण चुकलो नाही हे समाधान फारच मोठे असते.

मोहाचे कित्येक क्षण आपल्या जीवनात येतात. थोडी अशी आमिषे आपल्या कारस्थानी हितशत्रूंकडून नियोजितपणे आपल्यासमोर आणली जातात. त्यावेळी होय किंवा नाही एवढाच निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. हा निर्णय आपल्या संपूर्ण जीवनालाच कलाटणी देणारा असतो. सावध राहिलात तर जिंकलात; बेसावध राहिलात तर आयुष्यातूनच उठलात. आजपर्यंतची सगळी सत्यनिष्ठा वाया गेली हे नंतर आपल्याला कळते; पण मग कळून काय उपयोग?
असहकार जेव्हा गरजेचा होता तेव्हा आपली बुद्धी चळली. असहकार हे असे अस्त्र आहे की ते संभाव्य धोक्यापासून आपले संरक्षण करते. ‘असहकार’ समर्थपणे वापरण्याची कला आपण शिकून घेण्याची गरज आहे.
दुर्जनाशी असहकार आणि सज्जनाशी सहकार केल्याने आपलाच शिल्पकार आपण बनतो. म्हणून विचारपूर्वक असहकाराचा मार्ग स्वीकारावा.