>> कॉंग्रेस नेते एल्विस गोम्स यांचा आरोप; चौकशीची मागणी
राजधानी पणजीतील अष्टमीच्या फेरीतील स्टॉल्ससाठीच्या अर्जांचा काळाबाजार चालू असून, पणजी महानगरपालिकेतील काही नगरसेवकांचा या काळाबाजारात हात असल्याचा आरोप काल कॉंग्रेस नेते एल्विन गोम्स यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. काही नगरसेवकांनी स्टॉल्ससाठीचे हे अर्ज काळ्या बाजारात विकले असून, या एकूण प्रकरणाची दक्षता खात्यातर्फे चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून पणजी शहरात अष्टमीची फेरी भरत आहे; मात्र अशा प्रकारे या फेरीतील स्टॉल्ससाठीच्या अर्जांचा काळाबाजार झालेला नाही. हे अर्ज नेण्यासाठी आलेल्या लोकांवर लाठीहल्ला करणे ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब असल्याचे गोम्स म्हणाले. अष्टमीच्या फेरीत स्टॉल्स लावणारे विक्रेते हे आपल्या स्टॉल्सवरून गरजेच्या वस्तूंची विक्री करून लोकांना एकप्रकारे सेवा देत असतात. त्यांना दिवसभर पणजी मनपासमोर अर्जांसाठी ताटकळत ठेवणे व नंतर त्यांना अर्ज न देता त्यांच्यावर लाठीमार करणे हे अन्यायकारक व अमानवी असल्याचे गोम्स म्हणाले. महापालिकेतील महापौर, उपमहापौर, अन्य नगरसेवक व अधिकारी यांचा जो लवाजमा आहे, त्यांना जर हे अर्जही इच्छुकांना देणे जमत नसेल तर या लोकांचा उपयोग काय, असा सवालही गोम्स यांनी उपस्थित केला.
भाजप सरकारने १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील जनतेला आपल्या घरांवर तिरंगा फडकवण्यास सांगितले. आणि गोव्यातील भाजप सरकारने त्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी अष्टमीच्या फेरीतील स्टॉल्ससाठीचे अर्ज नेण्यास आलेल्या गरीब लोकांवर लाठीहल्ला करून आपल्या हुकूमशाहीचे दर्शन घडवल्याचा आरोपही त्यांनी केला.