>> मनपाच्या खास बैठकीत निर्णय
पणजी महानगरपालिकेने कला अकादमीचा दर्यासंगम आरक्षित असल्याने २ ते १४ सप्टेंबर या काळात फेरीधक्का ते कांपाल या भागात वार्षिक अष्टमी फेरीचे आयोजन करण्याचा निर्णय काल घेतला. गतवर्षाप्रमाणे यंदा फेरीच्या आयोजनामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून फेरीसाठी सरकारी पातळीवरून आवश्यक परवानगी घेण्याचे बैठकीत ठरले आहे.
मांडवीच्या तीरावर पणजी फेरीधक्का ते कांपाल दरम्यान फेरी भरविण्यात येणार आहे. महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार या फेरीला सरकारी पातळीवरून मान्यता घेतली जाणार आहे. मांडवीच्या तीरावर सात मीटरचा पदपथ आहे. त्यातील तीन मीटरची जागा पदपथासाठी राखीव ठेवली जाणार असून चार मीटरच्या जागेत दुकाने थाटण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे अशी माहिती महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मनपाने वार्षिक अष्टमीच्या फेरीवर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांची खास बैठक घेतली. यंदाच्या फेरीच्या आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून महानगरपालिका मंडळाने आवश्यक परवाने घेण्याची सूचना नगरसेवकांनी बैठकीत केली आहे. गतवर्षी अष्टमीची फेरी कांपाल येथे आयोजित करण्यात आल्याने पदपथ अडविण्यात आल्याने वादाचा विषय बनला होता. अखेर, महानगरपालिका प्रशासनाला फेरीतील दुकानांना कला अकादमीच्या आवारात ऐनवेळी जागा उपलब्ध करून देणे भाग पडले होते.