- दत्ताराम प्रभू साळगावकर
मोठं काहीतरी घबाड आलं म्हणून बँकेचे व्यवस्थापक खूश झाले. उघडून बघतात तर काय? अत्तराचा घमघमाट असलेलं गुलाबी पत्र! वाचून बघितलं. विशेषणं, क्रियापदांमधून प्रेमाचा वर्षाव असलेली ती साहित्यशोभाच होती! प्रकार काय तो कळेचना! मग…
पल्याला आपल्या आयुष्यात काही अनपेक्षित असे अनुभव येतात. काही मजेशीर, काही उपयुक्त तर काही विचित्र. आपण त्यातून काही शिकतो, मनोरंजन करून घेतो, काही वेळा आपण किंवा कोणीतरी निष्काळजीपणा करतो व अर्थाचा अनर्थ होतो; तर काहीवेळा हसून हसून मुरकुंडीही वळते.
एक आखाती देशात काम करणारा माणूस. नोकरी फार मोठीशी नव्हती. कुटुंबाला पुरून उरेशी. थोड्या लोकांना आखाती देशात काम करणं हे थ्रिल असतं. जे काम तिकडे करतात तसलंच काम आपल्या येथे करायला लाज किंवा कमीपणाचं वाटतं; प्रतिष्ठा मिळत नसते! आखाती देशात इकडच्यापेक्षा थोडा जास्त पैसा मिळत असावा, सुखसोयीही कदाचित मिळत असाव्यात!
त्याचं लग्न ठरलं. लग्न बरंच मजेत पण केलं. महिनाभर झाल्यावर आखाती देशात नोकरीनिमित्त जाणं आलंच. जायच्या अगोदर बायकोचं बँकेत खातं उघडून दिलं. आतापर्यंत तो महिन्याकाठी आपल्या घरच्यांच्या नावावर पैसे पाठवायचा; आता बायकोच्या! विरहानं, व्याकूळतेनं शेवटी एक दिवस आखाती देशात निघून गेला. जाताना बायकोला सांगून गेला की, महिन्याकाठी तुझ्या नावाचा डिमांड ड्राफ्ट डायरेक्ट बँकेकडेच पाठवून देतो; ते तो तुझ्या नावावर जमा करतील. त्याबद्दल तुला पत्र लिहून कळवीन. त्यानंतर दहाआठ दिवसांनी बँकेत जाऊन विचारणा कर.
महिन्याचा पगार हातात पडल्यावर त्याला वाटलं की मी प्रथमच बायकोला पैसे पाठवत आहे. एवढी आपली नवीन लग्न झालेली बायको! ‘तुझ्या खात्यावर पैसे पाठवले आहेत…’ असं काहीतरी रुक्ष पत्र पाठवण्यापेक्षा एक छानसं प्रेमपत्र पाठवावं! विचार करून करून आपल्या पद्धतीनं व आपल्याला जमेत तेवढ्या प्रकारे अतिशय रोमँटिक पत्र लिहिलं. जणू काही कालिदासाच्या मेघदूतला मागे पाडणारं! पण गफलत झाली ती इकडेच! दोन लखोटे; एक बँकेला व एक बायकोला. लखोट्यावर पत्ता लिहिताना चूक झाली. प्रेमपत्राच्या लखोट्यावर बँकेचा पत्ता लिहिला व ड्राफ्टच्या लखोट्यावर बायकोचा!
मोठं काहीतरी घबाड आलं म्हणून बँकेचे व्यवस्थापक खूश झाले. उघडून बघतात तर काय? अत्तराचा घमघमाट असलेलं गुलाबी पत्र! वाचून बघितलं. विशेषणं, क्रियापदांमधून प्रेमाचा वर्षाव असलेली ती साहित्यशोभाच होती! असलं पत्र त्यांनी कधी कोणाला लिहिलं नव्हतं व वाचलंही नव्हतं. मला त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलावलं व नवनवलाईचा तो अध्याय माझ्या हाती दिला. मी पण वाचून चकित झालो. प्रकार काय तो कळेचना!
आम्ही असे बसून हसत व विचार करत असतानाच त्याची बायको ड्राफ्ट असलेला लिफाफा घेऊन केबिनमध्ये आली. आम्ही तो घेतला व तिच्या नवर्यानं पाठवलेला प्रेमाचा नजराणा तिच्या हाती दिला. तिनं तो वाचला; थोडी लज्जित पण खूश झाली! पत्रातून नवर्याच्या प्रेमाचा घमघमाट मिळाला!
असा हा गोंधळातला गोंधळ… आपण प्रेमाचे किस्से अनेक ऐकले असतील, परंतु या सम हाच!
असे किस्से किती सांगावे? थोडे वेगळ्या प्रकारचेही आहेत. एका व्यक्तीने धंद्यासाठी म्हणून आमच्या बँकेकडून कर्ज घेतले होते. तो सुशिक्षित नव्हता; अर्धशिक्षित होता. ते कर्ज धंद्यासाठी नव्हतंच मुळी. आखाती देशात जायची त्याला क्रेझ होती. तिकडे चांगला पगार मिळेल; चार-पाच वर्षे नोकरी करून पैसा जमवायचा व येऊन सुखात जगायचं असा काहीसा त्याचा मनसुबा होता. कर्जाचा एखाद दुसरा हप्ता भरून तो नाहीसा झाला. नोटिशी, रिमायंडर वगैरे सोपस्कार झाले, पण व्यर्थ! घरी व्हिजिटपण झाल्या, पण त्याच्याविषयी कोण काही सांगायला तयार नव्हता. शेवटी आम्हाला कळलं की तो बाहेर आखाती देशात नोकरीला गेला म्हणून. पण पत्ता द्यायला कोणीच तयार नव्हता. कशीतरी युक्ती काढून आम्ही त्याचा पत्ता मिळवला. आम्ही विचार केला की, त्या पत्त्यावर साधं पत्र पाठवून काही उपयोग नाही; त्यापेक्षा वकिलाची नोटीसच काढली!
पंधराएक दिवसांनी एक पत्र आलं. ते बटलर इंग्रजीत होतं-
‘-मॅनेजर, आय नॉट डेड
अलाइव
गॉड इज देअर
आय एम नॉट चोर
धिस इज युवर मनी’
पत्रासोबत कर्जाच्या रकमेचा ड्राफ्ट होता.
पत्र वाचून आम्ही सगळे हसलो. तो डेड असो वा नसो, चोर असो वा नसो, जगात गॉड असो वा नसो- आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नव्हतं. आमचे पैसे वसूल झाले. त्यासाठी आम्हाला विशेष परिश्रम करावे लागलेच, पण ते व्यर्थ गेले नाहीत तर सार्थकी लागले.
अशाच प्रकारचा आणखीही एक मनुष्य भेटला. धंदा करण्यासाठी म्हणून कर्ज घेतलेला. सुरुवातीला थोडे पैसे भरले व नंतर गायब झाला. कर्ज घेताना दिलेल्या पत्त्यावर भेटत नव्हता, ते घर सोडून दुसरीकडे गेला होता. पण त्याचा नवीन पत्ता कोणीही सांगू शकत नव्हता. शोधून शोधून नाकी नऊ आले. आमचा एक कर्जदार होता. त्याच्याकडे सहज म्हणून चौकशी केली असता कळलं की तो एक लहानशी खोली भाड्यानं घेऊन राहतो. अंदाजाने त्याने त्याचा पत्ता सांगितला. आम्ही उशीर केला नाही. दुसर्याच दिवशी सकाळी लवकर त्या भागात गेलो व त्याचा ठीक ठावठिकाणा शोधून त्याच्या दारात दत्त म्हणून उभे राहिलो. तो आश्चर्यचकित झाला. म्हणाला-
‘‘हा माझा पत्ता तुम्हाला कसा कळला?’’
मी म्हटलं, ‘‘मी बँकर आहे. मला कर्जदारांचा वास येतो. त्या वासावरून मी इथपर्यंत पोचलो.’’
‘‘मला आठ दिवसांत पैसे मिळायचे आहेत. मी त्यातून तुमचं कर्ज भरून टाकतो.’’
आता आम्हाला त्याचा ठावठिकाणा समजला. त्याला म्हटलं, ‘‘ठीक आहे, भर. पण आठ दिवसांत आला नाहीस तर नवव्या दिवशी आम्ही पुन्हा इकडे हजर होऊन बसणार!’’
बरोबर आठ दिवसांनी तो आला व पैसे भरून गेला.
काहीवेळा लोकांना आर्थिक अडचणी असतात. त्यामुळे पैसे भरायला उशीर होतो. अशावेळी आपणही सौजन्याने वागायचं असतं; सर्कशीतल्या रिंगमास्टरप्रमाणे नव्हे! सर्वच लोक काही अप्रामाणिक नसतात, पण या गोष्टी अनुभवाने कळतात.
विश्वासाने विश्वास