अव्वल दहांत परतली सायना

0
92

नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने काल गुरुवारी जाहीर केलेल्या ४२व्या आठवड्यातील क्रमवारीत पुरुष एकेरीच्या अव्वल दहामध्ये कोणताही बदल झालेला नाही. महिला एकेरीत केवळ एकच बदल झाला असून सायना नेहवाल ‘टॉप १०’मध्ये परतली आहे. अमेरिकेच्या बिवेन झांग हिची ११व्या स्थानी घसरण झाली आहे.
महिला एकेरीतील अन्य भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास वैष्णवी रेड्डी जक्का (-३, ६२वे स्थान) व रितुपर्ण दास (-२, ६३वे स्थान) यांची घसरण झाली आहे. रुत्विका शिवानी गड्डे (-११, ९९वे स्थान) अव्वल शंभरातून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. श्रीकृष्णप्रिया कुदरावली (+ १, ७६वे स्थान), साई उत्तेजिता राव चुक्का (+ ६, ९५वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईने सात स्थानांची मोठी प्रगती साधताना १५,११० गुणांसह ११४वा क्रमांक मिळविला आहे.
पुरुष एकेरीत सौरभ वर्मा अव्वल पन्नासांत दाखल झाला आहे. १२ स्थानांची सुधारणा करत त्याने ५०वे स्थान प्राप्त केले आहे. पारुपल्ली कश्यप (+ ४, ५७वे स्थान) हा देखील पुढे सरकला आहे. अजय जयराम (-१, ५६वे स्थान), शुभंकर डे (-१, ६४वे स्थान), आरएमव्ही गुरुसाईदत्त (-२, ८२वे स्थान), लक्ष्य सेन (-१, ८८वे स्थान), मिथुन मंजुनाथ (-१, ९६वे स्थान) यांची किंचित घसरण झाली आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी आपले २४वे स्थान टिकवून आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी आपले २७वे स्थान राखले आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी एका स्थानाची सुधारणा करत २१वे स्थान प्राप्त केले आहे. याच प्रकारात अश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज यांना सहा स्थानांचा फटका बसला आहे. त्यांची जोडी ३३व्या स्थानी आहे.