थिवी येथील एका मांत्रिकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या आईच्या डोळ्यादेखतच घडला. या प्रकरणी मांत्रिक रमाकांत नाईक याच्यासह पीडित मुलीच्या आईला कोलवाळ पोलिसांनी अटक केली आहे.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. पीडित मुलीची आई सतत त्या मांत्रिकाकडे आपल्या समस्या घेऊन जात होती. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी तिने आपल्या मुलीला देखील सोबत नेले होते. मांत्रिकाने मातेची दिशाभूल करताना मुलीवर विविध संकटे असल्याचे सांगून या संकटांचा नाश करण्यासाठी तिला दैवी शक्ती प्राप्त करून द्यावी लागेल आणि त्यासाठी शरीरसुख देण्याची आवश्यकता आहे, असे मांत्रिकाने पीडितेच्या आईला सांगितले आणि मांत्रिकाच्या भूलथापांना ती बळी पडली व आपल्या पोटच्या मुलीला त्याच्याकडे सुपूर्द करण्यास तयार झाली. त्यानंतर आईच्या समक्षच मांत्रिकाने त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
दुसर्या दिवशी पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग वडिलांना सांगताच त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतल्यानंतर भामट्या मांत्रिकासह पीडितेच्या आईला अटक करण्यात आली.