अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर खुनाचा प्रयत्न

0
6

>> गंभीर जखमी अवस्थेत आढळली मुलगी; मोर्लेतील कामगाराला अटक

सत्तरी तालुक्यातील देऊळवाडा-मोर्ले या ठिकाणी चिरेखाणीवर काम करणाऱ्या एका परप्रांतीय मजुराच्या अल्पवयीन मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल समोर आली. अथक शोधमोहिमेनंतर जंगलात निर्जनस्थळी सदर मुलगी गंभीर जखमी अवस्थेत सापडली. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी चिरेखाणीवर काम करणारा मध्यप्रदेशातील एक कामगार रामसेवक सदू ठाकूर (23) याला अटक केली असून, त्याच्यावर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, आपली 5 वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने वाळपई पोलीस स्थानकात दाखल केली होती. सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ती बेपत्ता होती. कुटुंबीय आणि अन्य कामगारांनी सभोवतालच्या भागामध्ये तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ती सापडू शकली नव्हती. यानंतर वाळपई पोलीस स्थानकावर याविषयीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. सदर मुलीचा शोध घेण्याची शोधमोहीम पूर्ण रात्रभर सुरू होती; मात्र ती कुठेच आढळून आली नाही.

या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान वाळपई पोलिसांना रामसेवक सदू ठाकूर हा या चिरेखाणीवर काम करणारा 23 वर्षीय तरुण गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. यावेळी सदर मुलीचे आपण अपहरण करून तिचा खून केला, अशी कबुली संशयिताने दिली. त्यानंतर रामसेवक ठाकूर याला दोन वेळा घटनास्थळी नेऊन अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तरीही ती सापडू शकली नाही. शेवटी पहाटे शोधमोहीम तीव्र केल्यानंतर जंगलात सदर अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळली. गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या मुलीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तिला ताबडतोब साखळी येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केले व त्यानंतर गोमेकॉत पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सुरुवातीला चौकशीदरम्यान संशयिताने सदर मुलीचे अपहरण व खून केला, अशी कबुली दिली होती; परंतु ती जखमी अवस्थेत सापडली. त्यामुळे पोलिसांनी संशयिताची अधिक सखोलपणे चौकशी असता, सदर मुलीच्या डोक्यावर दगड घातला आणि ती मृत झाल्याचे समजून आपण तिथून पळ काढला, अशी कबुली संशयिताने दिली.

खुनाच्या प्रयत्नामागील कारण अजूनही अस्पष्टच
सदर अल्पवयीन मुलीचा खून करण्याचा प्रयत्न संशयिताकडून करण्यात आला; मात्र तिचे नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. संशयिताने तिचा खून करण्याचा प्रयत्न का केला, यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.