गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी १,२३६ आणि अल्पवयीन मुलां-मुलींनी वाहन चालवल्या प्रकरणी २३६ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या अधीक्षक बोन्सुएट सिल्वा यांनी काल दिली. वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालविणार्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलाने कार चालविल्याने चिखली येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. मोटन वाहन कायद्यानुसार अशा प्रकारच्या अपघातास अल्पवयीन मुलांबरोबर पालक आणि वाहनमालक सुद्धा दंड आणि शिक्षेस जबाबदार आहेत.
अपघाताला अल्पवयीन जबाबदार असल्यास त्या वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना दिला जाणार नाही. तसेच अल्पवयीन मुलाच्या पालकांना ३ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी तुरुंगवासाची तरतूद आहे, सिल्वा यांनी सांगितले.