अर्धशिशीवर होमिओपॅथी

0
74
  • डॉ. आरती दिनकर

१६ वर्षांचा मुलगा यश. त्याला ‘मायग्रीन’ म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होता म्हणून तो होमिओपॅथीच्या उपचारांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये आला होता. दहावीत असताना त्याला अर्धशिशी म्हणजे अर्धडोकेदुखी सुरू झाली. त्याला मी सांगितलं, चष्म्याचा नंबर तपासून घे. त्याने चष्म्याचा नंबर तपासून घेतला, तर त्याला चष्मा लागला नव्हता. अर्धडोकेदुखी मात्र सुरू होती, इतकी की शेवटी तो काहीतरी पेनकिलर घ्यायचा! कुणी म्हणालं, चहा घे! कुणी म्हणालं, डोक्याला लिंबू लाव… पण तेवढ्यापुरतं बरं वाटलं तरी परत त्रास सुरू होई. विशेषतः तो अभ्यासाला बसला किंवा वाचायला बसला की अर्धडोकेदुखीचा खूप त्रास होई.

एवढेच नाही, तर ही डोकेदुखी उजेडाकडे पाहिले तरी सुरू व्हायची. मग तो अस्वस्थ व्हायचा. त्याला थोडा मोठा आवाज आणि उजेडही सहन होत नसे. मात्र उलटी केली की बरं वाटे. परंतु केव्हा केव्हा उलटी झाली तरी बरे वाटत नसे. लक्षणे वारंवार दिसू लागली. कधीकधी नियमित वेळाने येत होती, तर कधी महिन्या-महिन्याने, दर आठवड्याला किंवा दररोजही येत होती. यामुळे तो दिवसेंदिवस खूप अशक्त झाला होता. बर्‍याचदा त्याला झोपही लागत नसे. पण माझ्या लक्षात आले की त्याची स्मरणशक्ती कमी आहे आणि काही वेळेस त्याला चक्करही येत होती. तो म्हणाला, मी एकेक पान चार-चार, पाच-पाच वेळा वाचतो. नंतर अक्षरे फिरल्यासारखी वाटतात. मग अर्धडोकेदुखी सुरू होते आणि अस्वस्थता येते. मी त्याला होमिओपॅथीची औषधे दिली व काही व्यायाम व काय खायचे काय नाही हे सगळे पटवून सांगितले. थोड्याच दिवसांत त्याला आराम वाटला. आता यशची अर्धडोकेदुखी कायमची बंद झाली!
बर्‍याच वेळा लहान-लहान वाटणारी लक्षणे शरीराला खूप त्रास देतात. अर्धडोकेदुखीच्या वेदना असह्य होतात. अशावेळी रोगी डोके घट्ट बांधून घेतो. वेगवेगळी मलमे लावतो. वेदनाशामक गोळ्या घेतो. तरीही म्हणावे तसे बरे वाटत नाही किंवा तेवढ्यापुरते बरे वाटते, पण परत नेहमीचा त्रास सुरू होतो.

हा रोग म्हणजे डोक्यातील ज्ञानतंतूचा शूलच होय. डोकेदुखी अनियमित असते. अर्धशिशीमध्ये वेदना डोक्याच्या एकाच बाजूस असतात. हा रोग बहुधा अपचनाच्या तक्रारी असलेल्यांना जडतो. मूळव्याधी (ळिश्रशी), भुत्तोन्माद (हूीींशीळर) या रोगांमध्ये हा रोग चिन्हरूपाने असतो. बर्‍याचदा स्वतंत्रपणेसुद्धा हा रोग होतो. काहीकाही रोग्यांमध्ये या रोगाचा जोर जास्त झाल्यास मेंदूत रक्तस्त्राव किंवा मस्तिष्कावरणदाह होऊ शकतो. तर काही रोग्यांमध्ये दृष्टीचे विकार, लकवा किंवा शब्द उच्चारता न येणे, वेडेपणा, भूक न लागणे व जठर अंशुल ही चिन्हे उत्पन्न होतात.

काही स्त्रियांना हा त्रास विटाळापूर्वी किंवा पाळी सुरू असताना होतो. डोके दुखते व हे डोके दुखणे कसे असते याचा मला अनेकदा अनुभव आला आहे. पेशंटची जेव्हा मी केस हिस्ट्री घेते तेव्हा लहान लहान वाटणारी लक्षणे डोके वर काढताना दिसतात. मी पेशंटला विचारते, तुम्हाला शौचास साफ होते का? तर ते पेशंट ‘हो’ म्हणतात. तर काही पेशंटांना शौचास साफ होत नाही. काहींचे सर्दी झाली की डोके दुखते. डोकेदुखीचा त्रास लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होत असतो. पण विशेषतः हा तरुण वयातील मुलामुलींना त्रास जास्त जाणवतो.