अर्थव्यवस्थांचा भयाणकाळ

0
234
  • शशांक मो. गुळगुळे

 

‘कोरोना’चे निर्मूलन कधी होईल? याचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा जशी दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या देशांनी उभारी घेतली होती तशी सर्व बाधित देशांना त्यांच्या-त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पाहून उभारी घ्यावी लागेल. पण सर्व देशांना सर्वांना अन्न, औद्योगिक प्रगती, हातांना काम व मजबूत आरोग्य यंत्रणा या बाबींना महत्त्व द्यावे लागेल.

 

‘कोरोना’चा प्रादुर्भाव सुरू झाला चीनमध्ये, तो पसरला आशिया खंडातील चीनच्या जवळच्या भारत, पाकिस्तान, जपान वगैरे देशांत. ऑस्ट्रेलिया खंडात तो पोहोचला नाही. परिणामी ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड बचावले. अमेरिका खंडात थैमान घातले पण बाजूचा कॅनडा सुरक्षित राहिला. आफ्रिका खंडातल्या तुरळक देशांत तो पोचला; पण युरोप खंडातील कित्येक देशांत त्याने धुमाकूळच घातला. ‘कोरोना’ हा पूर्वनियोजित कट असल्यासारखा प्रगत व जागतिक पातळीवर प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांतच फार मोठ्या प्रमाणावर पोचला, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळ्या झाल्या आहेत. जागतिक मंदीचे चटके बसू लागले आहेत व भविष्यात ते अधिक प्रखरतेने बसण्याची शक्यता आहे.

‘कोरोना’ महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था चालू वर्षी एका टक्क्याने आक्रसली जाईल. मूळ अंदाज अडीच टक्के वाढीचा होता; मात्र महामारी बरेच महिने राहिली तर निर्बंध सुरूच ठेवावे लागतील. परिणामी जागतिक अर्थव्यवस्था आणखी आक्रसतील असा अंदाज ‘युनायटेड नेशन्स’च्या (युनो) आर्थिक व सामाजिक विभागाने व्यक्त केला आहे.

जगातील दोनशेपेक्षा जास्त देशांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला असून लाखो लोकांना त्याची बाधा झाली आहे, तर हजारोंचे मृत्यू झाले आहेत. शंभरहून अधिक देशांनी गेला महिनाभर आपल्या राष्ट्रीय सीमा बंद केल्या असून त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. विविध देशांच्या सरकारांनी त्यांच्या जनतेला आर्थिक आधार दिला नाही तर लोकांना रोजचा खर्च करणेही अशक्य होईल व अशा देशांत अनागोंदी माजेल. ‘कोरोना’चा आर्थिक बाजूने जसा विचार व्हायला हवा तसा सामाजिक बाजूनेही विचार व्हायला हवा. मार्च महिन्यापासून जग आर्थिक घसरणीकडून तीव्र आर्थिक मंदीच्या दिशेने फरफटत चालले आहेत. अमेरिकेतून बाहेरील देशांत होणार्‍या जहाज वाहतुकीत मार्चमध्ये निम्म्याने घट झाली. येथील नांगरून ठेवलेल्या जहाजांवरून ज्या वेगवेगळ्या वाहनांची वाहतूक केली जायची त्यात 80 टक्क्यांची घट झाली आहे. जर्मनीत मार्च महिन्यात नवीन कार-नोंदणी मोठ्या प्रमाणात होत असते. गेल्या वर्षाच्या तुलनेत याचे प्रमाण 38 टक्क्यांवर आले आहे, तर ब्रिटनमध्ये या नोंदणीत 44 टक्क्यांची घसरण झाली आहे.

जगातील सर्वात मोठ्या अशा तीन अरब अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. ब्राझिलमधील सेवा उद्योगाने गेल्या चार वर्षांत गाठला नव्हता एवढा तळ गाठला आहे, तर दक्षिण आफ्रिकेतील वाहनविक्रीत 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियात गेल्या तीन दशकांमध्ये मंदीची छाया पडली नव्हती, परंतु आता ऑस्ट्रेलियात नोकर्‍या उपलब्ध नाहीत ही भारतीय तरुणांसाठी दुःखद बातमी आहे. अमेरिकेनेही ‘नॉन-अमेरिकन’ना यापुढे काही काळ नोकर्‍या देणार नाही असे जाहीर केले आहे. अमेरिकेचा विचार केला तर तेथे ‘अति तेथे माती’ झालेली आहे. 2008-2009 च्या जागतिक मंदीपेक्षाही (मनमोहन सिंगसारखे अर्थतज्ज्ञ त्यावेळी देशाचे पंतप्रधान होते म्हणून याची झळ भारताला विशेष बसली नव्हती) यावेळची परिस्थिती भयाण आहे. कारण जागतिक पुरवठा साखळी किंवा ‘ग्लोबल सप्लाय चेन’ विस्कटत आहे. ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. ‘एअरबस’सारख्या महाकाय कंपनीने आपल्या लाखो कामगारांना धोक्याची घंटा दाखविली आहे. या महामारीमुळे बहुतेक देशांत नवे रोजगार तर नजीकच्या भविष्यात निर्माण होणे अशक्य आहे; पण आहे त्या लोकांचे रोजगार टिकणेही अशक्य आहे. आपला देश एवढी वर्षे तरुणांचा देश म्हणून गमजा मारीत होता. आता बेकारीमुळे हेच तरुण छाताडावर बसण्याची शक्यता आहे.

अनेक देशांत मे किंवा जूनपर्यंत लॉकडाऊन सरण्याची शक्यता असून, यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात दोन टक्क्यांची तरी घट अपेक्षित आहे. होंडा मोटर कंपनीने अमेरिकेतल्या आपल्या दहा कारखान्यांतील तात्पुरता ‘लेऑफ’ दिलेल्या आपल्या कामगारांना आता पुढील एक-दोन महिने पगार देता येणार नसल्याचे कळविले आहे. ही परिस्थिती सार्वत्रिक होणार असून यासाठी सर्व बाधित देशांनी व तेथील नागरिकांनी पुढील 2 ते 3 वर्षे आर्थिक शिस्त पाळावयास हवी. ‘कोरोना’ला लवकर आळा न बसल्यास जगभरातील किमान अडीच कोटी लोकांच्या नोकर्‍या जातील, असा इशारा आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या महासंचालकांनी दिला आहे. एकीकडे ‘कोरोना’पासून लोकांचा बचाव करताना अर्थचक्रही चालू ठेवावे लागणार आहे. हे ज्या देशाच्या राज्यकर्त्यांना जमेल ते देश आर्थिक मंदीच्या विळख्यातून बाहेर येतील. सर्व देशांतील राज्यकर्त्यांना उत्पादनेतर खर्च बंद करावे लागतील. पुतळे, स्मारके वगैरे पुढील 10 वर्षे बांधू नयेत, नाहीतर देशाचे नागरिक ‘कोरोना’ने मरण्यापेक्षा उपासमारीने मरतील.

आरोग्य यंत्रणांना आव्हान

‘कोरोना’मुळे अमेरिकेसह अनेक विकसित देशांच्या आरोग्ययंत्रणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकटाशी सामना करीत असताना लॉकडाऊनमुळे बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था ढासळत चालल्या आहेत. जगातील काही देश गरिबी, गृहयुद्ध, निर्वासितांचे लोंढे (जसे आपल्या देशात बांगलादेशचे) आदी समस्यांमुळे बेजार झाले आहेत. दक्षिण सुदान, येमेन, सिरिया, व्हेनेझुएला या चार देशांमध्ये सध्या ‘कोरोना’चा संसर्ग आटोक्यात आहे. या देशांत ‘कोरोना’चा संघर्ष वाढल्यास भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा ‘इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी’ या जागतिक संघटनेने दिला आहे. याशिवाय बांगलादेश, ग्रीस, सिरिया या देशांतील निर्वासित ‘कोरोना’चे मोठे वाहक ठरू शकतात असेही अहवालात म्हटले आहे. जागतिक उत्पन्नात दक्षिण सुदान, येमेन, सिरिया, व्हेनेझुएला या चार देशांचा एकत्रित वाटा केवळ 0.6 टक्के इतका आहे; मात्र जगातील 30 टक्के लोकसंख्या या चार देशांमध्ये राहते. ‘कोरोना’चा मुकाबला करण्याची क्षमता या देशांत नाही. याशिवाय बुर्कीना फासो, सिरिया लियॉन, सेंटर आफ्रिकी रिपब्लिक, सोमालिया या गरीब देशांमध्येही आरोग्ययंत्रणा विस्कळीत असून त्यांना ‘कोरोना’चा मोठा धोका आहे. सिरिया, ग्रीस, बांगलादेशातील निर्वासितांसाठी उभारलेल्या शिबिरांत लाखो लोक दाटीवाटीने राहतात, त्यामुळे या भागात ‘कोरोना’ पसरल्यास संसर्गाचे प्रमाण वुहानपेक्षा चार पट अधिक असेल. त्यामुळे या देशांतील लोकांना डोळ्यात तेल घालून इतर देशांतील लोकांना सांभाळले पाहिजे नाहीतर मानवाच्या मृत्यूच्या प्रमाणात फार मोठी वाढ होईलच, पण जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडतील व जागतिक अर्थव्यवस्थांचे एवढे नुकसान होईल की यातून यादवी निर्माण होईल. मानवातली संस्कृती व मानवता टिकणार नाही.

‘कोरोना’ संसर्गामुळे जगभरातील फूलबाजार कोमेजला असून या क्षेत्राचे कधीही भरून न येणारे सुमारे 8.5 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढे नुकसान होऊ घातले आहे. जगात नेदरलँड, केनिया, इथिओपिया हे देश फूल उत्पादनात आघाडीवर आहेत. फुलांची सर्वात मोठी बाजारपेठ युरोपीय देश असून या देशांतच ‘कोरोना’ने हाहाकार माजविल्यामुळे फुलांची निर्यात ठप्प झाली आहे. फुलांची तोडणी आणि छाटणी करणार्‍या कर्मचार्‍यांना घरी पाठविण्यात आले आहे. नेदरलँडचे अल्समीर अ‍ॅक्शन हाऊस ओस पडले आहे. या लिलाव केंद्रावर दररोज 2 अब्ज फुलांचा लिलाव होतो. मात्र ‘कोरोना’मुळे हॉलंडचे व काश्मीरचे ‘ट्युलिप’ कोमेजले आहे. युरोपीय देशांत ‘कोरोना’मुळे वाहतूक ठप्प आहे. विमानसेवा बंद राहिल्याने आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. देशांच्या सीमा बंद केल्याने स्थानिक बाजारपेठांवरही परिणाम झाला आहे. युरोपीय संघातील देशांबरोबरच अमेरिका, आखात, भारत, जपान येथेही ‘कोरोना’चा प्रसार झाल्याने फुलांची निर्यात थंडावली आहे.

विषाणू संसर्गामुळे जागतिक व्यापार ठप्प झाला असून विविध देशांनी व्यापारांवर घातलेले निर्बंध हे सर्वांसाठी घातक ठरू शकतात. यामुळे काही देशांत साठेबाजी वाढेल तर काही देशांवर उपासमारीची वेळ येईल. सर्वात कमी परकीय चलनसाठा असणारे झिम्बाब्वे, आखातातील देश, येमेन, इराक, लेबनॉन आणि सिरियातील संघर्ष आणखी तीव्र होईल. ‘कोरोना’च्या संसर्गाचा सामना करण्यासाठी ‘डब्ल्यूएफपी’ने वैश्विक मानवतावादी आराखडा तयार केला असून यासाठी साडेतीनशे दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा निधी संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा या संकटातून बाहेर पडण्यासाठी बारा अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा निधी लागेल. वैश्विक आपत्कालीन यंत्रणेला कार्यान्वित करण्यासाठी एवढा निधी गरजेचा आहे. ‘कोरोना’च्या संसर्गामुळे जागतिक अर्थचक्र तर ठप्प झालेच आहे, पण त्याचबरोबर याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसत असल्याने जगातील भूकबळी वाढतील. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकांच्या तोंडचा घास हिरावला जाणार असल्याचे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’कडून सांगण्यात आले आहे. 55 देशांतील 135 दशलक्ष लोकांची रोजीरोटी धोक्यात येईल. 265 दशलक्ष लोकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. आफ्रिका व मध्यपूर्वेतील देशांत संघर्ष होतील, तर उत्तर नायजेरिया, दक्षिण सुदान, सिरिया व येमेन हे देश जीवघेण्या स्थितीत असतील. ‘ग्लोबल रिपोर्ट ऑफ फूड क्रायसिस- 2020’ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. देवाच्या कृपेने या देशांच्या तुलनेत आपल्या देशाची स्थिती बरी आहे. स्वातंत्र्यापासून आपल्या देशात आखल्या गेलेल्या चांगल्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे.

जगात आजघडीला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध आहे. परंतु गरजू देश आणि लोकांपर्यंत त्याचे वितरण करण्याचा मुद्दा गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य (यापुढे याला फार महत्त्व आहे), खुला बाजार आणि पुरवठा साखळी याकडे दुर्लक्ष केल्यास ‘आरोग्य अरिष्टाचे रूपांतर अन्न अरिष्टात होईल’ असा इशारा ‘युनो’च्या ‘एफएओ’ संघटनेने दिला आहे. ‘कोरोना’चे संकट येण्यापूर्वी म्हणजे 2019 मध्ये जगातील सुमारे 135 दशलक्ष लोकांना अन्नसुरक्षेच्या संकटाला सामोरे जावे लागत होते. आता ‘कोरोना’मुळे 183 दशलक्ष लोकांची अन्नान्न दशा होईल.

‘कोरोना’चे निर्मूलन कधी होईल? याचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा जशी दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या देशांनी उभारी घेतली होती (उत्तम उदाहरण जपान) तशी सर्व बाधित देशांना त्यांच्या-त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पाहून उभारी घ्यावी लागेल. पण सर्व देशांना सर्वांना अन्न, औद्योगिक प्रगती, हातांना काम व मजबूत आरोग्य यंत्रणा या बाबींना महत्त्व द्यावे लागेल.