Home Featured अमेरिका – इराण शांती वार्ता निष्फळ

अमेरिका – इराण शांती वार्ता निष्फळ

0

अमेरिकेच्या अवास्तव मागण्या ः इराणचा दावा

इराणने अटी स्वीकारल्या नाहीत ः अमेरिका

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि गेल्या 21 तासांपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील ‘शांती वार्ता’ अखेर निष्फळ ठरली आहे. इराणने आमच्या अटी स्वीकारल्या नाहीत, परिणामी चर्चा निष्फळ ठरली. आम्ही इराणला आमचा सर्वोत्तम प्रस्ताव दिला, परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही अटी स्वीकारण्यास नकार दिला असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी या चर्चेविषयी माहिती देताना सांगितले. तर अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.

इराणसोबत चांगली चर्चा झाली. मात्र आम्ही ठोस निर्णयावर पोहोचलेलो नाही. या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. आम्ही येथे प्रामाणिक हेतूने आलो होतो. परंतु इराण कराराच्या अटी स्वीकारण्यास तयार नाही, अशी माहिती अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स यांनी दिली. जे. डी. व्हान्स यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांती वार्ताच्या बैठकीत काय घडले, याची माहिती दिली.

ही चर्चा फिसकटल्यामुळे अमेरिकेच्या पुढील निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर अमेरिकेने आता कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी मध्य पूर्वेकडे अनेक विमाने पाठवली आहेत.

तर दुसरीकडे, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सिंगापूरकडे जाणाऱ्या दोन युद्धनौकांना त्रास दिला. इराणी बोटींचा सामना अमेरिकन जहाजांशी झाला. नंतर दोन्ही युद्धनौका अरबी समुद्रात सुखरूप परतल्या. इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांनी आयआरजीसीला तात्काळ हल्ला न करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.

अमेरिका होर्मुझमध्ये
नाकाबंदी करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिकी नौदल आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना नाकाबंदी करेल. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवले जाईल आणि त्याची तपासणी केली जाईल, विशेषतः ज्या जहाजांनी इराणला टोल भरला आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. यामुळे इराणच्या आर्थिक शक्तीला धक्का बसेल. अमेरिका कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे आणि गरज पडल्यास युद्ध संपवण्यासाठी कारवाई करेल. यापूर्वी, इराणचे उपसंसद अध्यक्ष हाजी बाबाई यांनी सांगितले होते की, ही सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांनी याला तेहरानची ‘रेड लाईन’ संबोधून येथून जाणाऱ्या जहाजांना इराणी चलनात टोल भरावा लागेल.

ट्रम्प यांची पुन्हा धमकी
पाकिस्तानमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर इराणी शिष्टमंडळही इस्लामाबादहून रवाना झाले. यापूर्वी, व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकी शिष्टमंडळही अमेरिकेला रवाना झाले होते. तर दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्याने डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. त्यांनी इराणला पुन्हा अश्मयुगात पाठवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी इराणला अश्मयुगात पाठवण्याचा दावा करणारा एक लेख शेअर केला आहे.