अमित शहा उद्या गोव्यात

0
110

>> पश्‍चिम विभागीय परिषद

पश्चिम विभागीय राज्यांच्या परिषदेची २४ वी बैठक २२ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथे होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने बैठकीला उपस्थित असतील. पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसेच दमण आणि दीव, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकीय प्रमुख, राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वीची बैठक गांधीनगर येथे गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

१९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याने १९५७ मध्ये पाच विभागीय परिषदांची निर्मिती करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री हे या पाचही परिषदांचे अध्यक्ष तर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतात. राज्यपाल आणखी दोन मंत्र्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करू शकतात. दर वर्षी एका विभागाला बैठकीच्या आयोजनाचा मान मिळतो. विभागीय परिषदेच्या बैठकीत केंद्र आणि राज्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येतो. राज्यांची हद्द, सुरक्षा, पायाभूत सुविधा जसे रस्ते, दळणवळण, उद्योग, पाणी आणि विद्युत, वन आणि पर्यावरण, गृहनिर्माण, शिक्षण, अन्नसुरक्षा, पर्यटन या समस्यांवरही ऊहापोह केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.