>> भाजप प्रदेशाध्यक्षांची माहिती; संघटनमंत्र्यांकडून प्रचाराचा आढावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचारसभा येत्या 1 ते 3 मे या दरम्यान उत्तर गोव्यात होणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा दक्षिण गोव्यात होणार आहे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभा उत्तर गोव्यात घेतली जाणार आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील नेते गोव्यात प्रचारासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हेही प्रचारासाठी दाखल झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि संघटनात्मक कार्याचा आढावा भाजप मुख्यालयात एका बैठकीत येथे काल घेतला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक, भाजपच्या गाभा समितीचे पदाधिकारी व इतरांची उपस्थिती होती.
बी. एल. संतोष यांनी राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचार कार्याचा आढावा घेतला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
भाजपचे संघटनमंत्री दक्षिण गोव्यातील आमदार, भाजपचे प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची मडगाव येथील भाजप कार्यालयात बैठक घेऊन निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहेत. तसेच, म्हापसा येथील भाजप कार्यालयात बैठक घेऊन उत्तर गोव्यातील प्रचाराचा आढावा घेणार आहेत, असे सदानंद तानावडे यांनी सांगितले.