अमित शहांकडून गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगूल

0
86

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे येत्या २० रोजी गोव्यात आगमन होणार असून मतदान केंद्र पातळीवरील सुमारे १० हजार कार्यकर्त्यांना ते संध्याकाळी ४ ते ६.३० या वेळेत मार्गदर्शन करून आगामी २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजवणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ज्या राज्यांमध्ये भाजप सत्तेवर आला तेथे मतदार केंद्र पातळीवरील कार्यकर्त्यांचे फारमोठे योगदान असते. त्यामुळेच पक्षाध्यक्ष शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. २० रोजीच ते संध्याकाळी उशीरा दिल्लीला प्रयाण करतील, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्याची ७० वर्षे साजरी करण्यासाठी देश पातळीवरील कार्यक्रमाचा भाग म्हणून पक्षाने दि. ९ ऑगस्टपासून तिरंगा यात्रा काढली होती. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी प्रभात फेर्‍या, मशाल मिरवणुका आदी कार्यक्रम केले. त्यात सुमारे २१ हजार कार्यकर्ते सहभागी झाले, असे त्यांनी सांगितले. भाजपवर जनतेचा विश्‍वास आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपचेच सरकार असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
२२ रोजी तिरंगा यात्रेचा मुरगावात समारोप
तिरंगा यात्रेचा समारोप सोहळा दि. २२ रोजी संध्याकाळी मुरगाव येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.