>> जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा
अमित पानघळ आणि मनिष कौशिक यांनी रशियाच्या एकटेरिनबर्ग येथे सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देत भारतासाठी दोन पदके निश्चित केली आहेत.
अमित पानघळने ५२ किलो वजनी गटात तर मनिष कौशिकने ६३ किलो वजनी गटात अंतिम चार खेळाडूंत आपले स्थान निश्चित केले आहे.
एशियम गेम्स सुवर्णपदक विजेत्या अमितने उपांत्यपूर्व फेरीच्या बाऊटमध्ये फिलिपिनो कार्लो पालम याच्यावर ४-१ अशा फरकाने मात केली. तर राष्ट्रकूल स्पर्धा रौप्यपदक विजेत्या कौशिकने ब्राझीलच्या वांडरसन डी ओलिवेरा याला ५-० असा एकतर्फी नमविले. उपांत्य फेरीत अमितची लढत कझाकस्तानच्या साकेन बिबोसिनोवशी होणार आहे. बिबोसिनोवने अर्मेनियाच्या युरोपियन सुवर्णपदक विजेत्या आणि सहाव्या मानांकित आर्तुर होव्हानिसयान याला पराभूत करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले आहे. तर मनिष कौशिकची गाठ क्युबाच्या अव्वल मानांकित अँडी गोमेज क्रुझ याच्याशी पडणार आहे. अँडीने रशियाच्या आठव्या मानांकित लिआ पोपोव्ह याला पराभूत करीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
अन्य एक भारतीय मुष्टियोद्धा संजीतला १९ किलो वजनी गटात इक्वाडोरच्या सातव्या मानांकित ज्युलिओ कॅस्टिलो टॉर्रेस याच्याकडून १-४ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.