अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

0
7

मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचे काल निधन झाले. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.

मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. मात्र त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचे अनेकांनी भरभरुन कौतुक केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी नुकतेच ‘सुर्याची पिल्ले’ या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.

व्यक्ती आणि वल्ली या नाटकात पु. ल. देशपांडे यांची भूमिका अतुलने साकारली आणि पु. ल. देशपांडे यांनी ती पाहिली आणि अतुलला शाबासकी दिली होती.
अतुल परचुरे यांनी त्यांच्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, सिनेमा, मालिका विश्व सगळेच गाजवले. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली, वासूची सासू, प्रियतमा, या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. त्याचबरोबर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केले. सलाम-ए-इश्क, पार्टनर, ऑल द बेस्ट : फन बिगिन्स, खट्टा मीठा, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा मराठी सिनेमा ठरला.

अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीने कर्करोगावर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. मात्र कर्करोगानंतरची त्यांची इनिंग दुर्दैवाने फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषेची सखोल जाण असणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत प्रवीण दवणे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.