>> काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी; तालिबानकडून युद्ध समाप्तीची घोषणा
अफगाणिस्तानवर तालिबानने संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर युद्ध संपल्याची घोषणा तालिबानच्या प्रवक्त्यांनी काल केली. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांची देशाबाहेर पडण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. देशातील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत असून, काबूल विमानतळावरही हजारो नागरिकांनी काल गर्दी केली होती. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, विमानाला लटकून जाणार्या तीन नागरिकांचा आकाशातून खाली पडून मृत्यू झाल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. दरम्यान, जवानांसह २०० हून अधिक भारतीय तेथे अडकल्याची माहिती समोर येत आहे.
अफगाणिस्तानचे नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला असल्याने देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय आहे. अनेक लोक या देशातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असून, विमानतळावर झुंबड झाली आहे. अनेक जण विमानाच्या टपावरही चढून प्रवास करण्यास तयार आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनेक नागरिक शक्य तितक्या लवकरात लवकर अफगाणिस्तानातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाबाहेर जाणार्या एका विमानावर नागरिक अक्षरश: तुटून पडल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. काबूल विमानतळावरुन एका प्रवासी विमानाने उड्डाण केले. देशाबाहेर पडण्यासाठी अनेक अफगाणी तरुण या विमानाच्या थेट इंजिनवर बसून प्रवास करत असल्याचे व्हिडिओतून समोर आले. देशाबाहेर पडण्यासाठी त्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू होता. याच दरम्यान या विमानाने उड्डाण केल्यानंतर लँडिंग गिअर पकडून बसलेले नागरिक अचानक आकाशातून खाली पडले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यातून तेथील परिस्थितीची भीषणता समोर आली आहे.
काबूल विमानतळावर पाच जण ठार
अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. विमानात प्रवेश करण्यासाठी चेंगराचेंगरीही झाली. जमावाला पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केला. यावेळी पाच जण ठार झाले असल्याचे वृत्त ‘अल जझिरा’ने दिले आहे. या पाच जणांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला की गोळीबारात झाला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तालिबानच्या वर्चस्वानंतर चीन, पाक खूश
तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर चीन आणि पाकने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्य पूर्ण संबंध विकसित करू इच्छितो, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. अफगाणिस्तानात तालिबानने गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत, अशी प्रतिक्रिया पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.
भारत भूमिका बदलेल : तालिबान
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने भारताबाबत मोठे विधान केले आहे. भारत आपली भूमिका बदलेल आणि आम्हाला साथ देईल, अशी आशा तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने व्यक्त केली आहे. भारत लवकरच आपल्या भूमिकेत बदल करेल, अशी आशा आहे. कारण दोन्ही देशांसाठी हेच फायद्याचे ठरेल, असे तो म्हणाला.
आंतरराष्ट्रीय समुदायाच्या एकजुटीची गरज
अफगाणिस्तानातील परिस्थितीवर काल संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत सोमवारी चर्चा झाली. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट होण्याची गरज आहे. दहशतवादाचा नवा मंच म्हणून अफगाणिस्तानचा वापर होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियओ गुटेरस यांनी केले.
अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आणि मुजाहिद्दीनसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. २० वर्षांचे बलिदान आणि मेहनत फळाला आली आहे. अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे स्वरूप काय असेल, ते लवकरच स्पष्ट होईल. तालिबान संपूर्ण जगापासून दूर राहू इच्छित नाही आणि आम्हाला शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध हवे आहेत.
- मोहम्मद नईम,
प्रवक्ते, तालिबान
अफगाणिस्तानातील स्थिती चिंताजनक : भारत
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी भारताची भूमिका मांडली. दहशतवादी गटांकडून अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी केला जात नाही, तोपर्यंत शेजारी देश सुरक्षित असतील. आम्ही काबूलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चित्र पाहिले आहे. त्यातून लोकांमध्ये दहशत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महिला, लहान मुले संकटात आहेत. विमानतळासह शहरातून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे, असे टी. एस. तिरुमूर्ती यांनी बैठकीत सांगितले.