>> काबूलही घेतले ताब्यात, राष्ट्रपती गनी यांचा राजीनामा
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला असून देशाच्या सर्व सीमा ताब्यात घेतल्या आहेत. याबाबतची माहिती अफगाण अधिकार्यांनी दिली आहे. दहशतवाद्यांनी काबुलच्या कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तर राष्ट्रपती अश्रफ गनी हे देशाबाहेर पळून गेले असल्याचे वृत्त आहे.
तालिबानने सत्ता परिवर्तन करण्याची मागणी केली आहे. त्यावर अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी शिक्कामोर्तब केले आहे. काबूलवर हल्ला होणार नाही. मात्र सत्ता परिवर्तन शांततापूर्वक मार्गाने होईल, असे गृहमंत्री मिर्जकवाल यांनी सांगितले. तसेच तालिबानेही जबरदस्तीने काबूलचा ताबा घेणार नाही. सर्वांना सत्ता परिवर्तन हवे आहे. सत्ता परिवर्तन शांततेत झाले तर कोणाचेही आणि कोणतेही नुकसान होणार नाही, असे सांगितले आहे. यापूर्वी शनिवारी तालिबानने जलालाबादवर ताबा मिळवला होता. यानंतर केवळ काबूल शहर राहिले होते.
त्यावर काल रविवारी त्यांनी ताबा मिळवला. काबूल हे शहर तालिबान दहशतवाद्यांपासून सुरक्षित मानले जात होते. मात्र आता या शहरावरही तालिबानने ताबा मिळवला आहे. जलालाबादवर ताबा मिळवत तालिबानने राजधानी काबूलला देशाच्या पूर्व भागापासून वेगळे केले होते.
जलालाबादच्या राज्यपालांनी कोणताही संघर्ष न करता आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, अफगाणिस्तानला लागून असलेल्या तोरखम सीमेवर पाकिस्तानने कडेकोट सुरक्षा ठेवली आहे. अफगाण पोलिसांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केले असल्यामुळे सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे शेख राशिद अहमद यांनी सांगितले.
राष्ट्रपतींचा राजीनामा
राष्ट्रपती गनी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त काही मीडियांनी दले आहे. तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले आहे. तालिबानमधील दुसर्या क्रमांकाचे नेते मुल्ला अब्दुल बरादर हे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती गनी यांनी शनिवारी देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणात त्यांनी तालिबानचा प्रतिकार करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे काबूलच्या सीमेवर तालिबानींसोबत संघर्ष निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ही शक्यता फोल ठरली.
काबूलहून १२९ प्रवाशांसह
विमान भारतात परतले
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या १२९ प्रवाशांना घेऊन काल एअर इंडियाचे विमान सुरक्षित नवी दिल्लीत पोहोचले. रविवारी रात्री एअर इंडिया एआय२४४ हे विमान दिल्लीला आले. अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी कब्जा केला असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपतीही देश सोडून गेले आहे.
या परिस्थितीत कोणतीही उड्डाणे रद्द करणार नसून उद्या सोमवारीही विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकार्यांनी दिली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या केवळ एअर इंडियाचीच विमाने सुरू आहेत.