अफगाणचा युएईवर विजय

0
68

कर्णधार राशिद खान याने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर अफगाणिस्तानने काल मंगळवारी विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ फेरीतील लढतीत संयुक्त अरब अमिरातीला (युएई) ५ गड्यांनी नमविले.

युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर राशिदने ९ षटकांत ४१ धावा मोजून पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. युएईचा संपूर्ण संघ ४३ षटकांत १७७ धावांत आटोपला. यानंतर अफगाणिस्तानची ५ बाद ५४ अशी दयनीय स्थिती झाली होती. परंतु, सामनावीर गुलबदिन नैब व नजिबुल्ला झादरान यांनी सहाव्या गड्यासाठी १२४ धावांची अविभक्त भागीदारी रचून संघाला विजयी केले. ३५व्या षटकात विजय मिळविल्याने अफगाण संघाने निव्वळ धावगतीत सुधारणा केली आहे. आज बुधवारी स्कॉटलंडने विंडीजचा, गुरुवारी युएईने झिंबाब्वेचा पराभव केला तसेच अफगाणिस्तानने शुक्रवारी होणार्‍या आपल्या सामन्यात आयर्लंडला नमविले तरच या निव्वळ धावगतीचा फायदा होणार आहे. आज विंडीज व स्कॉटलंड यांच्यात विजयी होणारा संघ पुढील वर्षीच्या आयसीसी विश्‍वचषकासाठी पात्र ठरणार आहे. गुरुवारी झिंबाब्वेने विजय प्राप्त केल्यास त्यांचा संघ दुसर्‍या स्थानासह पात्र ठरेल.

काल झालेल्या लढतीत १० वर्षीय राशिदने पाच गडी बाद करत आपल्या वनडे बळींची संख्या ४२ सामन्यांतून ९६ केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत जलद १०० बळी घेणारा गोलंदाज होण्याची त्याला संधी आहे. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क याच्या नावावर आहे. त्याने ५२ सामन्यांत शतकी वेस ओलांडली होती. विश्‍वचषक पात्रता स्पर्धेत सर्वाधिक १५ बळी घेतलेल्या राशिदला काल दौलत झादरान याची चांगली साथ लाभली. झादरानने ४५ धावांत ३ गडी बाद केले. युएईकडून केवळ शैमन अन्वर (६४धावा, ८७ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) व मोहम्मद नाविद (४५ धावा, २० चेंडू, ७ चौकार, १ षटकार) यांनी आश्‍वासक फलंदाजी केली.
धावांचा पाठलाग करताना नैबने ४ चौकार व २ षटकारांसह ९७ चेंडूंत नाबाद ७४ धावा जमवल्या. नजिबुल्लाने ६४ चेंडूंत ६३ धावांची संयमी खेळी करत संघाचा विजयी केले. युएई व अफगाणिस्तानमध्ये काल झालेला सहावा सामना होता. उभय संघांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले आहेत.

संक्षिप्त धावफलक ः संयुक्त अरब अमिराती ः ४३ षटकांत सर्वबाद १७७ (सुरी २२, शैमन अन्वर ६४, उस्मान १३, नाविद ४५, दौलत ४५-३, राशिद ४१-५, मुजीब २६-१, नबी ३३-१) पराभूत वि. अफगाणिस्तान ः ३४.३ षटकांत ५ बाद १७८ (नैब ७४, रहमत १६, नजिबुल्ला नाबाद ६३, नाविद ३७-२, कादीर ३८-२, रझा ३१-१)