- ज.अ.रेडकर.
(सांताक्रूझ)
या दिखाऊ दुनियेसाठी आपणच आपले परतीचे दोर कापले. ‘न घरका न घाटका’ अशी आपली स्थिती झाली आहे. नोकरी नाही आणि हाती पैसा मर्यादित उरलेला. पुढचे जीवन जवळ जवळ अंधःकारमय! पुढे कसे होणार असा विचार करीत करीत निशिकांत झोपी गेला तो परत न उठण्यासाठीच!
काळ कसा बदलेल आणि नशीब कशी पलटी खाईल हे सांगता येत नाही. कालचक्र सतत फिरत राहते. कधी खालचे आरे वर तर कधी वरचे खाली होत राहतात. माणसाचे आयुष्यदेखील तसेच असते. कधी सुख तर कधी दुःख! सुखाच्या वेळी उतायचे नाही, मातायचे नाही आणि दुःखाच्या वेळी हिरमुसले व्हायचे नाही, खचायचे नाही. काही माणसे इवल्याशा यशाने हुरळून जातात आणि ‘जितं मया..’ या तोर्यात वावरू लागतात. आसपासच्या लोकांचा अवमान आणि अपमान करू लागतात. मायेच्या माणसांशी असलेली नाती तोडतात आणि फसव्या जगाच्या आहारी जातात. आपल्याला मिळालेले यश, मिळालेले पद आणि संपत्ती ही कायम आपल्यापाशी राहणार या परीकल्पनेने ते हवेत तरंगतात. पण नशीब जसे देऊन पाहते तसेच ते परत घेऊनदेखील पाहते. निशिकांत याचीदेखील अशीच अवस्था झाली.
निशिकांत हा तसा सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. लहानपणी पितृछत्र हरवलेले. त्याचे वडील- हरिहर, स्थानिक काजू कारखान्यात मुनीमजी होते. परंतु त्यांना हृदयविकाराचा अचानक झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्याची आई- अंजनाबाई सामान्य गृहिणी. तिचे फारसे शिक्षण झालेले नव्हते. कुठे नोकरी मिळण्याची शक्यता नव्हती. पदरी दोन मुले. हरिहर यांच्या निधनानंतर कारखान्याकडून फंडाची जी काही रक्कम मिळाली त्यातून पुढचे सगळे जीवन कसे घालवावे हा यक्षप्रश्न तिच्यासमोर होता. शाळा-कॉलेजमध्ये शिकणार्या निशिकांत आणि अविनाश या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण कसे होणार या विवंचनेत अंजनीबाई होत्या. सुदैवाने एक दिवस अंजनीबाईना त्यांची एक जुनी मैत्रीण भेटली. अंजनीची स्थिती पाहून तिने अंजनीबाईना एक मोलाचा सल्ला दिला तो म्हणजे स्वयं रोजगाराचा!
सरकारने स्टार्ट-अप-इंडिया ही योजना सुरू केली होती. त्यासाठी राष्ट्रीय बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळत होते. कर्जफेडदेखील सुलभ हप्त्यात करता येणारी होती. अंजनीबाईनी सगळे सोपस्कार पूर्ण करून हे कर्ज मिळवले आणि पापड-लोणची-मसाले याचा गृहउद्योग सुरू केला. या कामात सुरुवातीला तिची दोन्ही मुले मदत करायची. पण पुढे मालाला मागणी वाढली आणि त्यासाठी शेजारच्या दोन बायकांना तिने आपल्या सोबत घेतले. या उद्योगातून चांगली प्राप्ती होत गेली. अंजनीबाईंचा आर्थिक प्रश्न अशा रीतीने सुटला. निशिकांत संगणक इंजिनिअर झाला. पदवीपरीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याला एका संगणक कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली होती. तर अविनाश बीएस्सी बीएड होऊन एका शाळेत नोकरीला लागला. सगळे कसे व्यवस्थित झाले. अंजनीबाईंचा जीव भांड्यात पडला.
निशिकांत नोकरीच्या निमित्ताने बंगलोरला गेला. दोन वर्षांनी कंपनीने त्याला आपल्या लंडन येथील ऑफिसमध्ये जाण्याची संधी दिली. प्रत्येक इंजीनिअरचे स्वप्न असते की आपण परदेशी जावे आणि खूप पैसा मिळवावा. निशिकांतलादेखील अशी इच्छा होतीच, पण इतक्या लवकर ही आपली इच्छा पूर्ण होईल असे त्याला वाटले नव्हते. निशिकांत अक्षरशः हुरळून गेला. त्याला आकाश ठेंगणे वाटायला लागले. मनात कितीतरी मांडे खात राहिला. झाले. सगळी तयारी झाली. मुंबई विमानतळावरून रात्री एक वाजता विमान सुटणार होते. अंजनीबाई आपला मुलगा प्रथमच इतक्या दूर जाणार, तिथे त्याचे कसे होईल, पुन्हा तो आपणाला कधी भेटेल की नाही असे विचार मनात येऊन ती माउली कावरी-बावरी झाली होती. परंतु मुलाच्या भवितव्याच्या आड तिला यायचे नव्हते. अविनाश व अंजनीबाई निशिकांतला सोडायला मुंबईला गेली. विमानतळाच्या प्रवेशद्वारातून फक्त प्रवाशांना प्रवेश होता. अंजनीबाईनी मुलाला शेवटचे म्हणून मायेने कवेत घेतले, अविनाशने मोठ्या भावाचे हात हातात घेतले, गदगदल्या स्वरांनी निरोप दिला घेतला गेला. निशिकांत काचेचा दरवाजा ओलांडून निघून गेला. लंडनचे विमान सुटेपर्यंत विमानतळावरच्या प्रवेशद्वारापाशी अंजनीबाई आणि अविनाश डोळ्यात आसवे आणून उभी राहिली. परतीच्या प्रवासात अंजनीबाई आसवे ढाळीत होत्या आणि अविनाश गुमसुम होऊन बसला होता.
मुंबईहून रात्री एक वाजता सुटलेले विमान दहा तासांनी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले. पाहिले पंधरा दिवस त्याची राहण्याची व्यवस्था कंपनीने एका हॉटेलमध्ये केली होती. या पंधरा दिवसात त्याला त्याची राहायची जागा शोधावी लागणार होती. या कामी त्याचे लंडन येथील ऑफिसमधील सहकारी मदत करणार होते. सुदैवाने त्याच्या ऑफिसमधील पण दुसर्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे मूळ गोव्याचे दोन सहकारी भेटले आणि तो त्यांच्याबरोबर त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागला.
दिवस मजेत चालले होते. निशिकांतला त्याच्या आवडीचे काम करायला मिळाले होते. त्याच्या टीममध्ये आणखी तिघे होते. त्यातील एकटा ब्रिटिश तर अन्य दोघे श्रीलंकन होते. कामाच्या बाबतीत किंवा राहण्याचा काही प्रश्न नव्हता. पण जेवणा-खाण्याची पंचाईत व्हायची. भारतीय पद्धतीच्या जेवणाची ज्यांना सवय असते त्यांची परदेशात सुरुवातीला हालत खूपच खराब होते. सततचे जंक फूड खाऊन पोट बिघडते. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा लंडनचे घड्याळ साडे सहा तास पुढे असल्याने झोपेची वेळ देखील बदलून जाते. सुरुवातीला काही दिवस होम सिकनेस येतो. घरची, आपल्या माणसांची, मित्रांची आठवण येत राहते. मन हळवे होते. घरी असताना ज्या गोष्टींची जाणीव होत नव्हती त्या आता प्रकर्षाने जाणवू लागतात. परंतु सगळे बदल माणूस हळूहळू स्वीकारतो आणि नवीन गोष्टी अंगवळणी पडू लागतात. निशिकांतचे देखील तसेच झाले.
निशिकांत आता लंडन शहरात बराच रुळला होता. दोन वर्षांनी तो महिन्याभरासाठी गावी येऊन गेला. तेव्हा त्याच्या आईला, भावाला आणि अन्य नातेवाइकांना कोण आनंद झाला. त्याने आपल्या जवळच्या सर्व नातेवाइकांसाठी आणि मित्रांसाठी अगत्याने भेटवस्तू आणल्या होत्या. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. दिवस आनंदात गेले. महिना कसा संपला हे कुणालाच समजले नाही आणि निशिकांत पुन्हा लंडनला निघून गेला. निशिकांतच्या वागण्या-बोलण्यात आता थोडी आढ्यता आली होती. आपल्या देशापेक्षा परदेश त्याला आवडू लागला होता. लंडनची आधुनिकता, तिथले राहणीमान हे भारतापेक्षा पुढारलेले आहे ते त्याला आवडू लागले. आपण लंडनमध्येच कायम वास्तव्य करावे असे त्याच्या मनाने घेतले. आणखी दोन-तीन वर्षांनी निशिकांत परत इकडे येईल. मग एखादी सुयोग्य मुलगी पाहून त्याचे आपण लग्न लावून देऊ अशी स्वप्ने त्याची आई- अंजनीबाई रंगवीत होती.
पण तसे व्हायचे नव्हते. आणखी तीन वर्षे मागे पडली पण निशिकांत परत भारतात यायचे नाव काढीना. अंजनीबाईंचा जीव टांगणीला लागला. चार-आठ दिवसांनी त्याचे फोनवर बोलणे व्हायचे. ख्याली-खुशाली दिली-घेतली जायची. परंतु माघारी येण्याचा आणि लग्नाचा विषय काढला की निशिकांत फोन बंद करायचा. अंजनीबाई आणि अविनाशला वाईट वाटायचे. पण करणारतरी काय! जवळ असता तर कान पकडता आला असता!
आणखी बराच काळ गेला. अंजनीबाई आता थकल्या होत्या. पूर्वीसारखे त्यांच्याकडून गृहउद्योगाचे काम होईना. गावागावातील अनेकांनी असा उद्योग सुरू केल्याने स्पर्धा वाढली. व्यापार्याकडून होणारी मालाची मागणी घटली. व्यवसाय नुकसानीत जायला लागला. अविनाश म्हणाला, ‘आई थांबव आता हा व्यवसाय. तू खूप कष्ट घेतलेस. आता पुरे! मी कमावतो आहे. आपण आहे त्यात समाधान मानू! अंजनीबाईनी मुलाचा सल्ला मानला. गेली पंधरा वर्षे चालू असलेला व्यवसाय त्यांनी बंद केला. मदतीला असणार्या बायकांना अंजनीबाईने समजावले आणि म्हटले, ‘हा व्यवसाय तुम्ही सुरू ठेवत असाल तर ही सगळी उपकरणे तुम्ही वापरायला घेऊन जा’.
तिकडे निशिकांत पूर्णपणे इंग्रजाळला होता. आपली मातृभूमी आणि मायेच्या माणसांना विसरून गेला होता. त्याच्या कंपनीने त्याला बढती दिली. राहायला सुंदर व स्वतंत्र अपार्टमेंट त्याला मिळाले. त्याने आलिशान गाडी घेतली. मिळणार्या भरपूर वेतनाचा अहंकार त्याला झाला. चंगळवादी जीवनाची त्याला चटक लागली. आपले मूळ कर्तव्य तो विसरला. पितृछत्र पारखे झाल्यावर आपल्या आईने आपणास मोठ्या कष्टाने वाढवले, आपल्या स्वतःची कोणतीही हौसमौज न करता काटकसरीने राहून पैसे साठवले. आपली इंजिनिअरिंगची फी भरली आणि म्हणून मी आज या पदावर पोहोचू शकलो हेदेखील तो विसरून गेला.
पण नियती या सगळ्या गोष्टींकडे कटाक्ष ठेवून असते. एक दिवस अचानक चीन देशातील हुवान शहरातील प्रयोगशाळेतील एका विषाणूचा विस्फोट झाला आणि तो जगभर भराभर पसरला. इंग्लंड हा देशदेखील या विषाणूपासून वाचू शकला नाही. या संसर्गजन्य विषाणूवर कोणताच उपाय नव्हता. परस्परांपासून दूर राहणे, नाका-तोंडावर मास्क लावणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे हा तूर्तास उपाय होता. या विषाणूमुळे रोज हजारो माणसे बाधित होत होती आणि बघता बघता मरण पावत होती. अनेक बंधने घालून, नियम करूनदेखील माणसे बेफिकिरीने वागत होती. शेवटी ब्रिटिश सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केला. सगळे व्यवहार झटक्यात थांबले. बाजार बंद झाले, व्यवसाय बंद पडले. शिक्षणसंस्था बंद, वाहतूक बंद, सगळे बंद!. परिणामी लोकांच्या नोकर्या गेल्या. आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. लोक आपापल्या घरात बंदिस्त झाले. माणसे परस्परांपासून तुटली.
निशिकांतला आता स्वदेशाची आणि आपल्या माणसांची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली. भारतातदेखील या विषाणूची लागण झालेली होती. पण तेथील माणसे एकमेकांना आधार देण्यासाठी आहेत, धीर द्यायला आहेत. आपण मात्र इथे एकटे पडलो आहोत, ना सोबतीला नेहमीचे चंगळवादी मित्र ना स्वतःचे आपले असे कुणी! या दिखाऊ दुनियेसाठी आपणच आपले परतीचे दोर कापले. ‘न घरका न घाटका’ अशी आपली स्थिती झाली आहे. नोकरी नाही आणि हाती पैसा मर्यादित उरलेला. पुढचे जीवन जवळ जवळ अंधःकारमय! पुढे कसे होणार असा विचार करीत करीत निशिकांत झोपी गेला तो परत न उठण्यासाठीच!