अपयश लपवण्यासाठी भाजपकडून आणीबाणी, सर्जिकल स्ट्राइकचे भांडवल

0
192

>> कॉंग्रेस नेते रमाकांत खलप यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागील चार वर्षांत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपने ४२ वर्षांनंतर आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळला आणि सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ व्हायरल केला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

देशातील आणीबाणीच्या दिवसाला काळा दिवस म्हणून साजरा करण्याच्या भाजपच्या निर्णयाचा गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करण्यात अपयश आले आहे. काळा पैसा परत आणण्यात अजून यश प्राप्त झालेले नाही. गेल्या चार वर्षांत काळ्या पैशांत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असा आरोप खलप यांनी केला.

केंद्रीय मंत्री अरुण जेठली यांनी आपल्या लेखात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हिलटरशी केलेली तुलना निषेधार्थ आहे. इंदिरा गांधी यांनी हिटलर सारखी कोणतीही कृत्ये केली नाहीत. इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. देशातील गरिबी हटविण्याला प्राधान्य दिले होते. खालिस्थानची मागणी करणार्‍यांवर योग्य कारवाई करून देशाची एकता, अखंडता कायम राखली आहे. इंदिरा गांधी यांनी काही कारणास्तव आणीबाणी लादली. तसेच २१ महिन्यांनी लोकशाहीच्या पुनरुत्थानासाठी स्वतःच पुढाकार घेतला. आणीबाणी लादल्याबद्दल देशवासीयांची जाहीर माफीसुद्धा मागितली होती, असेही खलप यांनी सांगितले.