रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कृती कार्यक्रम तयार केला असून पुढील पंधरा दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले.
हेल्मेट न वापरणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे आदी गुन्हे करणार्यांना केवळ चलनच देऊन सोडणार नाही तर त्यांना वाहतूक नियम शिकविण्यासाठी पोलीस स्थानकावर आणून बसविणार असल्याचे पर्रीकर यांनी पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी आणलेल्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले.
निष्काळजीपणे वाहने चालविल्यामुळेच अनेक अपघात घडतात. त्यात अनेकांचे बळी जातात. त्यामुळे राणे यांनी आणलेल्या या लक्षवेधी सूचनेबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. सरकार रस्त्यांचे रुंदीकरण करीत आहे. परंतु वाहनचालक नियमांचे पालन करीत नसतात, असे ते म्हणाले. पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले. पोलिसांनाही या विषयाचे प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. वाहतूक नियमांच्या बाबतीत लहानपणीच शिस्त आली पाहिजे त्यासाठी विद्यालयांमध्ये हा विषय लागू करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. दुचाकी वाहनांना झालेल्या अपघातातच अधिक बळी गेल्याचे ते म्हणाले.