>> भरधाव कारची धडक; रुग्णासह तिघे बचावले; रामनगर-कुडतरी येथील घटना
रामनगर, कुडतरी येथे काल कार आणि रुग्णवाहिका या दोन वाहनांतील अपघातानंतर रुग्णवाहिकेने पेट घेतला अन् ती जळून खाक झाली. मात्र सुदैवाने रुग्णासहित तिघे बचावले. ही घटना काल सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
जीए-७-जी-१९०५ ही रुग्णवाहिका कुडचडे येथील सरकारी इस्पितळातून आजारी रुग्णाला घेऊन मडगाव जिल्हा इस्पितळाकडे निघाली होती. रामनगरी येथे अरुंद रस्त्यावर समोरून भरवेगाने निघालेल्या जीए-०८-के-६०३८ या कारची धडक रुग्णवाहिकेला बसली व ती रस्त्यालगत नाल्यात कलंडली. अपघाताच्या आवाजाने गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी रुग्णासहित त्यांचे नातेवाईक, चालकाला बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणात रुग्णवाहिका आग लागली आणि ती पूर्णपणे जळून गेली.
या घटनेची माहिती मडगाव अग्निशामक दलाला मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले व आग विझविली. अग्निशामक दलाचे अधिकारी गील सौजा यांच्या नेतृत्त्वाखाली जवानांनी आग विझविली. त्यासाठी दोन पाण्याचे बंब लागले. कारच्या धडकेने शॉर्टसर्किट होऊन रुग्णवाहिकेला आग लागली. आग लागण्याआधी रुग्णवाहिकेतील सर्वांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. त्यात तिघांना किरकोळ जखमा झाल्या. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी घटनास्थळी पाहणी केली.