अन्ननलिकेचा कँसर

0
2176

डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा)

अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास आधुनिक शास्त्रानुसार शस्त्रकर्म करून आयुर्वेदीय औषधांची उपाययोजना केल्यास व्याधी नक्की आटोक्यात येतो. कॅन्सरमुळे व्यक्त झालेली लक्षणे कमी होतात. रुग्णाची भूक, वजन यात सुधारणा होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

साधारण चाळीशीतला एक रुग्ण ५-६ महिन्यांच्या कालावधीनंतर रुग्णालयात तपासायला आला. केबिनमध्ये आत येताच मला तो थकल्यासारखा वाटला. त्याचं वजनही कमी झाल्यासारखं वाटलं. विचारपूस केल्यावर म्हणाला, ‘हल्ली १५-२० दिवसांपासून जेवणच जात नाही’. भूक लागत नाही का… असे विचारल्यावर म्हणाला, ‘भूक लागते, पण गिळायला त्रास होतो. जेवायलाही खूप उशीर लागतो. प्रत्येक घासानंतर पाणी प्यावे लागते. आता तर पाणी पितानाही त्रास होतो.’ साधारण लक्षणांवरून ‘अन्ननलिकेमध्ये काही वैषम्य आल्याचे अनुमान झाले. म्हणून रुग्णाला ‘एन्डोस्कोपी’ करण्यासाठी पाठवले. एन्डोस्कोपी तपासणीमध्ये अन्ननलिकेमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले. पुढच्या तपासणीअंती हा ट्यूमर कँसरचा होता, असे निश्‍चित झाले. म्हणजेच अंगावर व्याधी का तोलू नये याचे हे जिवंत उदाहरण होय. हा कर्करोग लवकर लक्षात आला असता तर त्यावर नक्कीच जास्त चांगले उपचार करता आले असते. कोणत्याही आजारात प्रथम घरगुती उपचार करून पाहू नये. प्रथम डॉक्टरकडे जावे. त्यांचा सल्ला घेऊन नंतरच व्याधीची सौम्यता लक्षात घेऊन उपचार करावेत.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे ‘वलय’ व ‘गलौघ’ या व्याधी अन्ननलिकेच्या कर्करोगाशी साधर्म्य दाखवणारे आहेत. वलय या व्याधीमध्ये कफामुळे अन्नवह स्रोतसाचे ठिकाणी उन्नत व आगत शोथ निर्माण होतो. त्यामुळे अन्नवह स्रोतसाचा अवरोध होतो. रुग्णाला आहार घेताना अडकल्यासारखे वाटते. सुरुवातीला घन स्वरूपात अन्न घेता येत नाही. केवळ द्रव आहार घेणे शक्य होते. यापेक्षा स्रोतोरोध जास्त झाल्यास रुग्णाला कोणत्याही प्रकारचा आहार घेणे शक्य होत नाही. यामध्ये वेदना नसतात. शरीरपोषणामध्ये व्यत्यय आल्याने रुग्ण कृश व दुर्बल होतो.
गलौघ व्याधीमघ्ये गळ्यामध्ये शोथ उत्पन्न होऊन महास्रोतसाचा (अन्नवह) रोध उत्पन्न होतो. हा शोथ कफ व रक्तदुष्टीमुळे होतो. हा शोथ बाह्य व अभ्यंतर भागी होतो. त्यामुळे रुग्णाला खाता व पिता येत नाही. उदान वायूच्या गतीस अडथळा उत्पन्न होतो. त्यामुळे वाक्‌प्रवृत्ती, श्‍वासोच्छ्वास, जांभया या क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. यासोबत ताप, तंद्रा, लाळ गळणे ही लक्षणे आढळतात.
आधुनिक शास्त्रानुसार या व्याधीमध्ये अन्ननलिकेमध्ये वातकार्बुद येतो. हा व्याधी २० ते ८५ वर्षांच्या कालावधीमध्ये होतो. २५% अर्बुद अन्नलिकेच्या वरच्या टोकाला होतात. हा अर्बुद पॅपिलोफेरस प्रकारचा असल्यास अन्ननलिकेच्या पूर्ण पोकळीचा अवरोध करतो. सिर्‍हस प्रकारचा असल्यास वर्तुळाकार अर्बुद निर्माण होतो. तसेच बरेचदा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा किंवा ऍडिनोकार्सिनोमा आढळतो. अर्बुदाची प्रत्यक्ष वाढ साधारणतः उभ्या दिशेने होते.
अन्ननलिकेच्या कँसरची कारणे ः
– अतिमद्यपानामुळे व धूम्रपानामुळे.
– कुठल्याही स्वरूपातील तंबाखू खाणे व तंबाखूची मशेरी लावणे.
– रोजच्या आहारात फळे व भाज्यांचा अभाव.
– साठवलेले अन्नपदार्थ खाणे.
– अ, ब, ई, जीवनसत्वांची कमतरता.
– अति तिखट व अति मीठ खाणे.
– आनुवंशिक.
अन्ननलिकेचा कँसर हा दुर्धर असतो. पूर्वी हा साठी-सत्तरीच्या लोकांमध्ये दिसून यायचा, पण हल्ली आपल्या देशात तीशी-चाळीशीतच सापडायला लागला
अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे ः
* सुरवातीला छातीच्या मध्यभागी अस्वस्थता जाणवते. अन्न गिळताना थोडा त्रास होतो.
* उचक्या येतात.
* आवाजात बदल होतो.
* अर्बुद जास्त वाढल्यावर सुरवातीला घट्ट अन्न गिळताना त्रास होतो. द्रव अन्न गिळताना त्रास होत नाही.
* नंतरच्या अवस्थेत द्रव अन्न गिळतानाही त्रास होतो.
* रुग्ण कृश व दुर्बल होतो.
* गाठ अन्ननलिकेतील दोन तृतियांश भाग व्यापते. कॅन्सर आत अन्नलिकेला पार छेदून आजुबाजूच्या टिश्यूंमध्ये पसरतो. निदान होईपर्यंत बराच पसरतो.
* अन्न गिळताना खोकल्याची उबळ येते.
* पाठीत/छातीत दुखते. क्वचित रक्ताची उलटी होते.
* हाडे दुखतात.
* कधी कधी पोटात हाताला गाठ लागते.
* मानेतील ग्रंथीची वाढ आढळते.
परीक्षण ः
– पूर्वी या रोगाचे निदान करण्यासाठी बेरियम स्वॅलोचा वापर करायचे.
– एन्डोस्कोपीच्या तपासामध्ये रुग्णाच्या तोंडातून एक ट्यूब अन्ननलिकेत घातली जाते. या ट्यूबच्या टोकाला कॅमेरा असतो व पूर्ण अन्नलिका त्यामुळे डॉक्टरांना पाहता येते. एखादी गाठ असल्यास त्याची बायॉप्सी करून घ्यायची. यावरून कॅन्सरचे निदान करता येते. काही एन्डोस्कोपीमध्ये सोनोग्राफीही करतात. यामध्ये कॅन्सर बाहेर किती वाढला आहे, तो कुठपर्यंत पसरला आहे.. हेही पाहता येते.
– बोन/पेट स्कॅन करून हाडांत/इतरत्र हा कॅन्सर शिरला आहे का ते समजते.
उपाययोजना ः
* रुग्ण डॉक्टरकडे लवकर आलातर कॅन्सर पसरण्यापूर्वीच त्याचे निदान करता येते. अशा वेळी शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेची गाठ काढता येते, बर्‍याचदा अन्नलिका पूर्ण काढावी लागते व जठराची नळी करून अन्न जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते. या शस्त्रक्रिया मोठ्या व जिकीरीच्या असतात पण यशस्वी झाल्यास रुग्णास चांगले जेवता येते.
* शस्त्रक्रिया करणे शक्य नसेल तर दुर्बिणीतून एक स्टेंट टाकून अन्नमार्ग मोकळा केला जातो. लेसरसारखे उपकरण वापरूनही रस्ता मोकळा करता येतो. त्यामुळे रुग्णांना तोंडाने जेवता येते.
* उपाययोजना म्हणून किमोथेरपी व रेडिएशन थेरपीचा उपयोग होतो.
* आयुर्वेदशास्त्राने जरी ही व्याधी असाध्य सांगितली असली तरीपण काही अनुभूत चिकित्सा करता येते.
* औषधीयोजना सुरू करण्यापूर्वी स्निग्ध अनुपानातून विरेचन द्यावे. त्यासाठी वैद्याच्या मार्गदर्शनाखाली दुधात तूप, सैंधव इच्छाभेदी मिसळून विरेचन द्यावे.
* त्यानंतर पुढीलप्रमाणे चिकित्सा करावी.
* सुवर्ण भस्म, ताम्र भस्म, वंग भस्म, नाग भस्म, आरोग्यवर्धिनी सर्व एकत्र घोटून मधासोबत द्यावी. त्यानंतर अभयारिष्ट व पुनर्नवासव द्यावे.
* रात्री निजताना गरम दुधात तूप घालून प्यावे. याप्रमाणे ४ दिवस औषधी योजना करावी. पाचव्या दिवशी पळस पापडी व कृमीकुठार गुळाबरोबर घ्यावी.
* शोधन झाल्यावर योग नं.१ – सुवर्ण भस्म, ताम्र भस्म, वंग भस्म, नाग भस्म, आरोग्यवर्धिनी एकत्र घोटून मधासोबत द्यावे. त्यानंतर अभयारिष्ट, पुनर्नवासव पाण्यासोबत द्यावे. रात्री निजताना हेमगर्भ, आल्याचा रस व मध यातून घ्यावा. याप्रमाणे १ महिना औषध द्यावे.
८ दिवसातून एक वेळा रेचन द्यावे.
* योग नं.२ – अभ्रक भस्म, सुवर्ण भस्म, रौप्य भस्म, वंग भस्म, नाग भस्म.
* योग नं.३ – ताम्र, अभ्रक, कासीस भस्म.
* योग नं.४ – ताप्यादि लोह, वंग भस्म, नाग भस्म, ताम्र भस्म.
* योग नं.५ – त्रिवंग, हेमगर्भ, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, चंद्रप्रभा.
अनुपान – अभयारिष्ट व पुनर्नवासव.
* कॅन्सरमध्ये रसादि धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि सात धातूंना बल देणारी रसायन चिकित्सा महत्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यासारखा सात्विक रसायन आहार, शतावरी, गौक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्मसारखी रसायन औषधे यांचा समावेश होतो.
कॅन्सर प्रतिबंधक उपाय ः
दिनचर्या पालन, ऋतुचर्या पालन, ऋतू व अवस्थासापेक्ष आयुर्वेदोक्त पंचकर्म चिकित्सा, आहारविधी नियमांचे पालन.
अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास आधुनिक शास्त्रानुसार शस्त्रकर्म करून आयुर्वेदीय औषधांची उपाययोजना केल्यास व्याधी नक्की आटोक्यात येतो. कॅन्सरमुळे व्यक्त झालेली लक्षणे कमी होतात. रुग्णाची भूक, वजन यात सुधारणा होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. कॅन्सरचा प्रसार व पुनरुद्भव आटोक्यात ठेवता येतो.