वर्षभरात करणार दीड हजार पोलिसांची भरती

0
111

>> सहा नवी पोलीस स्थानके : पर्रीकर

वर्षभरात राज्यात १५०० पोलिसांची भरती करण्यात येणार असून सहा नवी पोलीस स्थानकेही उभारण्यात येतील. म्हार्दोळ, फातोर्डा, जुवारीनगर, नावेली, बांबोळी व कोलवाळ येथे ही नवी पोलीस स्थानके उभारण्यात येतील. तसेच चांगले प्रशिक्षित पोलीस खात्यात असतील यावर भर देण्यात येईल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल असे पोलीस खात्यातील मागण्यांवर काल विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
राज्यात सध्या ५५८० पोलीस कर्मचारी आहेत. खरे म्हणजे ही संख्या चांगली आहे. मात्र, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने हे पोलीस कमीच पडत आहेत. त्यामुळे नवी भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पोलीस खात्यात शिस्त आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ड्युटीवर असताना दारू पिणे यासारख्या गोष्टी सहन करता येणार नसल्याचे ते म्हणाले. मात्र, त्याचबरोबर चांगले काम करणार्‍या पोलिसांचे कौतुकही व्हायला हवे, असे ते म्हणाले. प्रार्थना स्थळांची मोडतोड सारख्या प्रकरणी पोलिसानी चांगले काम केले याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे ते म्हणाले.