अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या संपूर्ण माघारीची अंतिम मुदत आज संपते आहे. सन २००१ मधील न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधील जागतिक व्यापार केंद्रावरील अकरा सप्टेंबरच्या भीषण हल्ल्यानंतर जागतिक दहशतवादाचा निःपात करण्याचा संकल्प करीत अल कायदाच्या मागावर आणि ओसामा बिन लादेनच्या शोधात अमेरिका अफगाणिस्तानमध्ये शिरली आणि गेली वीस वर्षे तेथे नाटो राष्ट्रांसमवेत तिने अल कायदाशी झुंजत असतानाच नवा अफगाणिस्तान जन्माला घालण्याची प्रचंड खर्चिक मोहीम राबवली. परंतु त्यामध्ये आपला अपरिमित पैसा, मनुष्यबळ, वेळ आणि शक्ती नाहक खर्ची पडत असल्याचे हळूहळू उमगताच तेथून कसा तरी काढता पाय घेण्याचा विचार सुरू झाला आणि शेवटी ज्यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात पहिले पाऊल ठेवले होते, त्या तालिबान्यांचेच पाय धरण्याची आणि त्यांच्याशी हातमिळवणी करण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढवली. पाकिस्तानी तुरुंगातून तालिबानी नेत्यांची सुटका काय करण्यात आली, कतारच्या अमीराच्या मध्यस्थीने त्यांच्याशी वाटाघाटींच्या दीर्घ फेर्या काय चालवण्यात आल्या, परंतु शांततापूर्ण हस्तांतराच्या कागदावरच्या योजना प्रत्यक्षात वेळ आली तेव्हा कुठल्या कुठे उडून गेल्या आणि अमेरिकेने उरलीसुरली लाजही घालवली.
अफगाणिस्तानातून आपल्या माघारीची अंतिम मुदत वाढवून मिळावी ह्या विनंतीलाही तालिबान्यांनी धुडकावून लावल्याने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी निरुपायाने ३१ ऑगस्ट हीच निर्वाणीची मुदत मानण्यास संमती दर्शवली खरी, परंतु गेल्या वीस वर्षांत अफगाणिस्तानमधील अमेरिकी आणि नाटोच्या मोहिमांना साह्य करणार्या लाखो अफगाण व अन्य नागरिकांना ह्या घिसाडघाईने प्राणांतिक संकटात ढकलले आहे. ज्या प्रकारे अमेरिकेने तालिबानशी कतारमध्ये केलेल्या करारावर विसंबून आणि अफगाण फौजा अमेरिकी माघारीनंतरही तालिबान्यांना काही काळ सत्तेवर येण्यापासून रोखून धरतील ह्या विश्वासाने माघारीची कागदोपत्री कृतियोजना बनवली होती, तिचा अंतिम घटनांंमध्ये पार बट्ट्याबोळ उडाल्याने त्याचे अत्यंत भीषण व जिवावर बेतणारे परिणाम अफगाणिस्तानातील लाखो निष्पाप अफगाण व अन्य नागरिकांना आज भोगावे लागले आहेत.
जागतिक दहशतवादाचा निःपात केल्याचा दावा करीत अमेरिकेने अफगाणिस्तानातून एकीकडे काढता पाय घेतला असला तरी तिकडे अल कायदा आणि तालिबानपेक्षाही अधिक आक्रमक असा नवा शत्रू डोके वर काढू लागला आहे, तो आहे आयएस – खोरासान. काबुल विमानतळावर गेल्या आठवड्यात केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात आयएसने आपले अस्तित्व दाखवून दिले. आपली उरलीसुरली लाज राखण्यासाठी अमेरिकेने लगोलग प्रत्युत्तरादाखल कारवाई करीत त्या कटाच्या म्होरक्यांना यमसदनी पाठवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात त्याची सत्यता संशयास्पद आहे. त्यानंतर अमेरिकेने विमानतळाच्या दिशेने निघालेल्या कथित स्फोटकांनी भरलेल्या वाहनावर केलेला द्रोनहल्ला, तसेच अन्य एका आयएसच्या कथित ठिकाणावरील हल्ला ह्या सगळ्याच कारवायांची सत्यताही संशयास्पद आहे. खरोखर आयएस – खोरासानला ह्या कारवायांतून लक्ष्य करण्यात आले की केवळ अमेरिकेतील बायडन प्रशासनाप्रतीचा सध्याचा तीव्र रोष शमविण्यासाठीच हा प्रत्युत्तराच्या तत्पर कारवाईचा देखावा करण्यात आला हे कालांतरानेच उघड होऊ शकेल. अमेरिकेच्या ह्या प्रत्युत्तराच्या कारवायांनंतरदेखील आयएस-खोरासानचे हल्ले थांबलेले नाहीत. काबुल विमानतळावर काल पुन्हा पाच क्षेपणास्त्र हल्ले झाले जे विमानतळावरील क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेमुळे निकामी ठरले, परंतु अफगाणिस्तानवर कोणत्या धोक्याची टांगती तलवार लटकत आहे हे ह्या हल्ल्यांतून स्पष्ट झाले आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडत असताना आयएस खोरासान तेथे अधिक शक्तिमान होणार असेल तर गेल्या वीस वर्षांच्या मोहिमेचे फलित काय? ज्या ‘मवाळ’ तालिबानच्या हाती अमेरिका सत्ता सोपवू पाहते आहे, तिच्याकडून आयएससारख्या अधिक जहाल प्रवृत्ती सत्ता हिसकावून घेणार नाहीत याची काय शाश्वती?
मुळात तालिबानचे नवे ‘मवाळ’ रूपच संशयास्पद आहे. मुल्ला ओमरनंतर नेतृत्व करणारा तालिबान्यांचा म्होरक्या हैबतुल्ला अखुनजादाने अजूनही जगाला दर्शन दिलेले नाही. तालिबानचे सर्व निर्णय अजूनही पाकिस्तानातील क्वेट्याच्या राहबरी शूरामधून होत असतात. तालिबानी निर्णयप्रक्रियेतील जे तीन मुख्य वाटेकरी आहेत, त्यातील मुल्ला ओमरचा मेहुणा मुल्ला अब्दुल घनी बरादर, मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला महंमद याकुब आणि कुख्यात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दिन हक्कानी हे तिघेही कुख्यात दहशतवादी आहेत. अशा संशयास्पद घटकांकडे सत्ता सोपवत अमेरिकेने घेतलेली माघार केवळ अफगाणिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडालाच संकटाच्या खाईत लोटणारी आहे.