अनमोल विचार

0
210
  • पल्लवी दिनेश भांडणकर

आज आपण देवाचे आभारी असलो पाहिजे. या जगात कित्येक कमनशिबी माणसं जन्मतात, व्याधिग्रस्त असतात. आपण फार भाग्यवान आहोत, आपल्याला देवाने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवलंय.

त्या दिवशी इतर सर्व कामे संपवून मी माझ्या चप्पल दुरुस्तीसाठी एका चांभाराकडे गेले होते. रस्त्याच्या एका कोपर्‍यात आपल्या इवल्याशा छत्रीच्या सावलीत तो चांभार एकाग्र चित्ताने आपले धागे गुंतवत होता. माणसांची ये-जा चालूच होती. काही माणसं वेळ पाहून त्याला चप्पल दुरुस्तीसाठी घाई करत होते. पण तो मात्र शांत, एकाग्र व आनंदात होता. वातावरणातील कोणताच गोंधळ जणू त्याला ऐकूच येत नव्हता किंवा तिकडे त्याने अगदी दुर्लक्षच केले होते.

आपल्याही आयुष्यात येतात ना असेच काही प्रसंग ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अगदी फायदेशीर ठरतं. आपल्या कामात त्या दिवशी तो चांभार तसाच व्यस्त होता. हळूहळू माणसांची ये-जा कमी होत गेली. आणि माझ्या चपलेची दुरुस्ती करण्यासाठी मी पुढे सरसावले. चप्पल पाहता पाहता त्याने एका बाईकडे पाहिले. अपंगत्वाने ग्रासलेली एक बाई रस्ता ओलांडण्यासाठी प्रयत्न करत

असताना तो मोठ्याने तिला हाक मारू लागला, ‘‘ये मावशे! सावकाश चल’’ असं तो कोकणीत उद्गारला व माझ्याकडे पाहून म्हणाला की ही मावशी आपल्या ओळखीची. किती त्रास सहन करूनसुद्धा आपलं जीवन अगदी आनंदाने जगते. आज आपण देवाचे आभारी असलो पाहिजे. या जगात कित्येक कमनशिबी माणसं जन्मतात, व्याधिग्रस्त असतात. आपण फार भाग्यवान आहोत, आपल्याला देवाने शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवलंय. अनेक आयुष्यातील पाप-पुण्यं घेऊनच माणूस जन्माला येतो. आपल्या दुःखाचं कारण कधीकधी आपल्यालाच कोड्यात पाडतं. पण आपण मात्र हताश न होता त्या देवाला म्हणावं ‘‘देवा, तेरी लीला तू जाने! हम बस तेरे दीवाने. मेहनत करो.. भगवान का नाम लो.. और मस्त जिओ!’’
ही अशी काही वाक्ये त्या चांभाराकडून त्यादिवशी ऐकताना आयुष्याचं गुपितच जणु त्याने मला पाजलं. हे सारं ऐकताना मी मात्र त्या ज्ञानामृतात मंत्रमुग्ध झाले. पण त्याने कामाची एकाग्रता न डगमगवता माझी चप्पलही मला दुरुस्त करुन दिली. त्याच्या या अनमोल अशा विचारांनी मन प्रसन्न झालं!