अनंतपूर क्रिकेट अकादमीला विजेतेपद

0
97

भार्गव (नाबाद २१) व हर्षवर्धन (नाबाद १५) या शेवटच्या गड्यासाठी ४२ चेंडूंत केलेल्या ३९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अनंतपूर क्रिकेट अकादमीने द्वारका नाशिकचा पराभव करत भिकू पै आंगले स्मृती अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा जिंकली. फातोर्डा मैदानावर हा अंतिम सामना झाला. नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद ट्रंकवाला (२५) व रोहित पुरोहित (३३) यांनी पहिल्या यष्टीसाठी ३९ धावांची भागीदारी केली. त्यांचा स्टार खेळाडू मुस्तसीर पहिल्याच चेंडूवर बाद जालाा. ओंकारने ४३ धावांची शानदार खेळी केली. त्यांनी ४५ षटकांत ७ बाद १६४ धावा केल्या. अनंतपूरकडून तन्वीर जमाल (३१-२) व नागा चरण (२८-२) यांनी चांगली कामगिरी केली.

१६५ धावांचा पाठलाग करताना अनंतपूरचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. केवळ मनदीप (४१) याने प्रतिकार केला. ९ गडी बाद झालेले असताना नवव्या स्थानावरील भार्गव व अकराव्या स्थानावरील हर्षवर्धन यांनी चिवट खेळ करत ४३.५ षटकांत संघाला विजयी केले. बक्षीस वितरणाला प्रा. अडसूळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रिन गावस, ज्युड कार्दोस, अनंतपूरचे प्रशिक्षक युगंधर रेड्डी यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण झाले. मुस्तसीर कांचवाला स्पर्धावीर ठरला. तन्वीर जमाल सर्वोत्तम गोलंदाज तर बी मणिदीप सर्वोत्तम फलंदाज ठरला. भार्गव व हर्षवर्धन यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.